Skip to main content
x

फुटाणे, रामदास दत्तात्रेय

     रामदास दत्तात्रेय फुटाणे यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे झाला. १९५९साली ते एस.एस.एसी. झाले. प्रारंभी १९६१ ते १९७३ या काळात ते चित्रकला शिक्षक होते. नंतर चित्रपट-निर्मिती, लेखन व दिग्दर्शन ह्यांकडे वळले. ‘सामना’ (१९७५) या चित्रपटाचे ते निर्माते होते. ‘सर्वसाक्षी’ (१९७९) या चित्रपटाचे कथालेखन व दिग्दर्शन त्यांनी केले.  ‘सुर्वंता’ (१९९४) हा त्यांनी दिग्दर्शित केलेला आणखी एक चित्रपट होय. त्यांच्या ह्या तीनही चित्रपटांना राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळ्यांवरचे विविध पुरस्कार लाभले.

     फुटाण्यांचा मूळ पिंड एका सर्जनशील कवीचा असून ‘विडंबन काव्य’ हा त्यांचा विशेष आवडीचा काव्यप्रकार आहे. आत्तापर्यंत त्यांचे ‘कटपीस’ (१९६९), ‘सफेद टोपी लाल बत्ती’ (१९८६), ‘चांगभलं’ (१९९०), ‘भारत कधी कधी माझा देश आहे’ (१९९७) आणि ‘फोडणी’ (२०००) असे पाच कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत.

     मराठी विडंबन काव्यपरंपरेतील ही कविता लोकगीते-लोकनाट्य, तुकोबा-रामदास, मर्ढेकर-अत्रे-बांदेकर-पुल इत्यादींच्या विडंबन प्रवृत्तीशी नाते सांगणारी आहे. परंतु, पूर्वपरंपरेपेक्षा फुटाण्यांचे विडंबनीय द्रव्य वेगळे आहे. ते संभ्रमित जीवनमूल्यांच्या चौकटीत अडकलेले आहे. ही कविता म्हणजे समकालीन वास्तवाचा मर्मभेदक ऐवज म्हणता येईल. समकालीन वास्तवातील सांस्कृतिक पर्यावरणाच्या मूल्यसंभ्रमाचे अधोरेखन आणि चित्रदर्शित्व व कोटिक्रमाचे झळझळीत दर्शन ही या कवितेची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत.

     फुटाण्यांनी आजवर अनेक महत्त्वाची पदे भूषविलेली आहेत. त्यात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्षपद (१९८०-१९९४), पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्षपद (१९९५-१९९७), महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्यदत्व (१४ एप्रिल १९९६पासून २०००पर्यंत), जागतिक मराठी परिषदेचे अध्यक्षपद ह्या काही उल्लेखनीय पदांचा उल्लेख करता येईल आहेत.

     गोवा कला अकादमीचा ‘काव्यहोत्र पुरस्कार’ फुटाणे यांना २०१६ साली प्राप्त झाला आहे. 

     याबरोबरच मराठी कलाकार व साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी विविध पुरस्कार योजनांची आखणी केली. बृहन्महाराष्ट्र व महाराष्ट्रातील ग्रामीण भागात मराठी कविताकथनाचे कार्यक्रम करून मराठी कवितेच्या प्रचार-प्रसारासाठी व अभिवृद्धीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. अनेक नव्या कवींना प्रोत्साहन देण्यात त्यांनी पुढाकार घेतला.

     फुटाणे मराठीतील एक विडंबन-भाष्य कवी म्हणून सर्वदूर परिचित आहेत.

     - डॉ. शोभा रोकडे

फुटाणे, रामदास दत्तात्रेय