Skip to main content
x

राजेशिर्के, प्रकाश अर्जुन

       दृश्यकलेच्या प्रसार आणि प्रचारासाठी प्रयत्नशील असलेले कलाकार प्रकाश अर्जुन राजेशिर्के. यांनी कोकणातील दुर्गम भागातील विद्यार्थी दृश्यकलेच्या शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी परिश्रमपूर्वक सावर्डे येथे ‘सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट’ हे मान्यताप्राप्त कलामहाविद्यालय सुरू केले व तेथे ते सातत्याने कलाप्रदर्शने, कलाजत्रा, कार्यशाळा, प्रात्यक्षिके, चर्चासत्रे, व्याख्याने, परिसंवाद असे उपक्रम आयोजित करीत असतात. त्यांचा जन्म चिपळूणजवळील कोसबी - सावर्डे येथे झाला. त्यांच्या आईचे नाव मालती. राजेशिर्के यांचे शालेय शिक्षण मुंबईत गिरगाव येथे झाले व त्यानंतर १९७५ मध्ये त्यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून जी.डी. आर्ट (धातुकाम) अभ्यासक्रम पूर्ण केला.

अभ्यासक्रमाव्यतिरिक्त सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडास्पर्धा इत्यादींमध्ये राजेशिर्के सहभागी होत. जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांना शंकर पळशीकर, नागेश साबण्णवार, नारायण सोनावडेकर, बी.एन.सुखडवाला इत्यादी निष्णात शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले. जी.डी. आर्ट पूर्ण होताच १९७६ मध्ये त्यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या चित्रकार-शिल्पकार सहाध्यायींचा ‘प्रभुत्व’ ग्रुप स्थापन केला व त्यांचे जहांगीर कलादालनात एकत्रित प्रदर्शन भरविले.

राजेशिर्के यांनी विविध माध्यमांत चित्र-शिल्प-धातुकामनिर्मिती केली व महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शन, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, बॉम्बे आर्ट सोसायटी, ललित कला अकादमी या संस्थांच्या वार्षिक कलाप्रदर्शनांत पारितोषिके मिळवली. मुंबईतील डोंगरी येथील ‘आशा सदन’ या सरकारी उपक्रमाच्या वास्तूत त्यांनी एक भव्य भित्तिचित्र साकारले. कलासाधना करीत असतानाच ते दृश्यकला क्षेत्रात क्रियाशील राहिले. दैनिक ‘सकाळ’, ‘नवशक्ति’, ‘रत्नागिरी टाइम्स’ या वृत्तपत्रांतून त्यांनी कलाविषयक स्तंभलेखन केले, तसेच विविध कलाविषयक नियतकालिकांत दृश्यकला क्षेत्रातील घडामोडींविषयी लेखन केले.

कोकणात कलेचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असून निसर्गचित्रणाची प्रत्यक्ष स्पर्धा भरविण्याचा त्यांनी केलेला उपक्रम चांगलाच लोकप्रिय ठरला असून आज इतर अनेक संस्था त्यांचे अनुकरण करताना दिसतात.

मान्यवर कलाकारांच्या जवळपास साडेतीनशे कलाकृती असलेले एक कलादालनही त्यांनी सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट कलामहाविद्यालयात सुरू केले. महाराष्ट्रातील बारा कलामहाविद्यालयांना सरकारकडून अनुदान मिळावे यासाठी त्यांनी पाठपुरावा करून २००५ मध्ये सरकारकडून या सर्व कलामहाविद्यालयांना वार्षिक अनुदान मंजूर करून घेतले.

मुंबई विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ यांच्या नवीन कला अभ्यास निर्मिती समिती व परीक्षा समितीचे ते सदस्य आहेत.

अठरा वर्षे सावर्डे येथील सह्याद्री स्कूल ऑफ आर्टच्या प्राचार्यपदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडून जून २०१० मध्ये ते निवृत्त झाले. सध्या सावर्डे येथे स्थायिक होऊन ते वाचन, चिंतन, मनन, लेखन, कलानिर्मिती व उदयोन्मुख कलाकारांना मार्गदर्शन व सहकार्य करतात.

- डॉ. गोपाळ नेने

 

 

राजेशिर्के, प्रकाश अर्जुन