Skip to main content
x

राऊत, हरीश

       हरीश राऊत यांचा जन्म ठाणे जिल्ह्यातील बोर्डी या गावी झाला. बोर्डी हे निसर्गाचे वरदान लाभलेले गाव आहे. हरीश राऊत यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट येथून १९५२ मध्ये रेखाचित्रकला व रंगचित्रकला विषयात पदविका संपादन केली. त्यांनी जहांगीर आर्ट गॅलरी येथे भरवलेल्या पहिल्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्या वेळेस प्रसिद्ध चित्रकार आरा यांचे चित्र ५०/- रुपयांना, एम.एफ. हुसेन यांचे चित्र १००/- रुपयांना आणि राऊत यांचे चित्र ७५/- रुपयांना विकले गेले होते! या काळात गॅलरीचे भाडे दिवसाला ७/- रु. होते आणि गॅलरीसुद्धा सहज उपलब्ध होत असे.

हरीश राऊत यांनी एकूण ५३ एकल प्रदर्शने भरवली. यात मुंबई, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन ही महत्त्वाची शहरे, तसेच कॅनडा आणि ओटावा या देशांचा समावेश आहे. त्यांनी अनेक मोठ्या प्रदर्शनांतून सहभाग घेतला आणि महत्त्वाची बक्षिसे प्राप्त केली, ती अशी : सुवर्णपदक, अकॅडमी ऑफ फाइन आर्ट, कलकत्ता (१९६२); गव्हर्नर्स सिल्व्हर मेडल फॉर बेस्ट एंट्री, बॉम्बे आर्ट सोसायटी (१९६८); अकॅडमी ऑफ इंडियन आर्ट अमृतसर, (१९६१); १९६० - १९६५ मध्ये कालिदास प्रदर्शन, उज्जैन येथे रौप्यपदक; ‘सिल्व्हर प्लाक’ टागोर प्रदर्शन (१९६१); आर्ट सोसायटी ऑफ इंडिया (१९७०); महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (१९७१).

राऊत यांची चित्रे देशात व परदेशांत अनेकांच्या संग्रही आहेत. ‘कला हे सौंदर्याचे स्थान आहे. कलेने नेहमीच नजरेला आणि मनाला प्रसन्नता प्रदान केली पाहिजे’, असा राऊत यांचा कलेबद्दलचा दृष्टिकोन होता.

‘‘देवाने या सृष्टीत अनेक सुंदर आणि चांगल्या गोष्टींची निर्मिती केली आहे. त्यांची चित्रे काढणे हे एक आव्हान आहे. जीवनातील प्रत्येक गोष्टीला एक उजळ बाजू असते. त्याच गोष्टीचा विचार केल्यास जीवन सफल होईल. निराशाजनक आणि नकारात्मक बाजूचा विचार कशासाठी? जीवनातील फक्त चांगल्या गोष्टींचा विचार करावा. जीवन हे जगण्यासाठी आहे. माझ्या चित्रात जीवनातील क्रूरता आणि बीभत्सतेला कोणतेही महत्त्व नाही. फक्त सौंदर्य आणि सौंदर्य महत्त्वाचे; जीवनातील सत्य हे सौंदर्यहीन असेल तर ते मला नको, मी सौंदर्याच्या कल्पनांमध्ये रममाण होणेच पसंत करेन,’’ असे ते सांगत.

हरीश राऊत यांनी विविध संघटनांचा कार्यभार सांभाळला आणि आपली कारकीर्द यशस्वी केली. ते १९६२ ते १९८७ या काळात बॉम्बे आर्ट सोसायटीचे  सचिव होते. त्यांनी १९६८ ते १९८८ या काळात जहांगीर आर्ट गॅलरीचे कार्यकारिणी सदस्य म्हणून काम केले. महाराष्ट्र राज्याच्या कला सूचना समितीवर त्यांनी १९७८ ते १९८२ पर्यंत काम केले. १९८४ ते १९८८  या काळात ललित कला अकादमीचे ते कार्यकारिणी सदस्य होते.

हरीश राऊत हे हाडाचे कार्यकर्ते कलावंत होते. नवोदित कलावंतांना सदैव मदत आणि आस्थापूर्वक मार्गदर्शन करणे हा दुर्मीळ गुण त्यांच्याकडे होता. बॉम्बे आर्ट सोसायटीचे पूर्वीचे मानाचे स्थान कायम राहावे म्हणून त्यांनी आपले जीवन समर्पित केले. या सोसायटीचा हिशेब पाहणे, आश्रयदाते शोधणे, प्रसिद्धी करणे ही सगळी कामे ते स्वतःच करायचे. कार्यालय उघडण्यापासून ते बंद करेपर्यंत त्यांची पूर्णवेळ उपस्थिती असे. चित्रकारांची चित्रे विकून त्यांना त्याचा मोबदला लवकरात लवकर देणे हे ते स्वतःचे कर्तव्य मानत असत.

- शिरीष मिटबावकर

 

राऊत, हरीश