सबनीस, विकास लक्ष्मण
‘विकास सबनीस’ अशा स्वाक्षरीसह असलेली राजकीय टीकाचित्रे अनेकांनी पाहिली असतील. तब्बल पन्नास वर्षे राजकीय टीकाचित्रे हाच आपला पेशा स्वीकारणारे सबनीस’, अशी त्यांची ठळक ओळख म्हणता येईल. मराठीत तरी हा पेशा म्हणून सातत्य ठेवणारे फारच थोडे चित्रकार आहेत.
विकास लक्ष्मण सबनीस यांचा जन्म मुंबईतील दादर येथे झाला. सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून उपयोजित कलेची (अप्लाइड आर्ट) पदविका त्यांनी १९७१ साली संपादन केली. कलामहाविद्यालयामध्येे ‘व्यंगचित्रकला’ हा विषय शिकविला जात नाही. सबनिसांच्या पाहण्यात आलेली व्यंगचित्रे त्यांना खुणावत होती. त्यांचे पहिले व्यंगचित्र १९६८ मध्ये ‘मार्मिक’ या साप्ताहिकात प्रकाशित झाले. नामवंत व्यंगचित्रकार व राजकीय नेते बाळासाहेब ठाकरे यांची मार्मिकमधली राजकीय टीकाचित्रे त्यांना प्रेरणा देत. सबनीस ‘फुलबाग’च्या अशोक माहीमकरांनाही असेच श्रेय देतात.
विकास सबनिसांच्या चित्रांचा ‘मार्मिक’मधला सहभाग १९८५ नंतर वाढत गेला. सबनिसांचे चित्रकलेचे शिक्षण झाले असल्यामुळे रेखाटनातील सफाई सहजच आली. चित्रसमूहाची रविवारची जत्रा व मोठी चित्रे प्रकाशित होऊ लागली. शिवाय, पॉकेट कार्टून्सच्या स्वरूपात दै.‘सकाळ’, ‘लोकसत्ता’, ‘नवशक्ती’ अशा मराठी दैनिकांतून त्यांची अनेक चित्रे प्रकाशित झाली. विविध विषयांवर विनोदी चित्रांच्या माध्यमातून टीका-टीप्पणी करणारे एक कॉलमी सदर हे पॉकेट कार्टून्सचे स्वरूप. ज्येष्ठ व्यंगचित्रकार लक्ष्मण यांनी ते प्रथम रुजविले. ‘यू सेड इट’ हे त्याचे शीर्षक असे. विविध मथळे देऊन अनेक वृत्तपत्रांनी हा प्रकार स्वीकारला .
सबनिसांनी केवळ मराठी नियतकालिकांसाठीच काम केले नाही, तर अनेक इंग्रजी वृत्तपत्रांसाठी त्यांनी व्यंगचित्रे काढली . स्टाफ कार्टूनिस्ट म्हणून त्यांनी १९८० ते १९८७ ही सात वर्षे ‘मिड-डे’मध्ये काम केले. ‘ब्लिट्झ’, ‘डेली’, ‘फ्री प्रेस जर्नल’ अशा इंग्रजी वृत्तपत्रांसाठीही त्यांनी व्यंगचित्रे काढली. यामुळे देशातील व परदेशांतील राजकीय टीकाचित्रांच्या क्षेत्राशी त्यांचा संबंध आला. मॅक्स मुल्लर भवन या जर्मन संस्थेनेही सबनिसांच्या व्यंगचित्रांचा वापर केला .
राजकीय टीकाचित्रांसाठी ‘अर्कचित्र’ (कॅरिकेचर) रेखाटनाचे कौशल्य आवश्यक असते. नामवंत व्यक्तीचे ते मुक्त रेखाचित्र असते. व्यक्तीची ओळख अबाधित ठेवूनही चेहऱ्याचे विरूपीकरण अशी ती कसरत असते. विकास सबनिसांनी अनेक नामवंतांची अर्कचित्रे काढली त्यापैकी माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम, उद्योगपती रतन टाटा, ज्योती बसू अशी काही नावे सांगता येतील. त्या- त्या वेळच्या सर्व राजकीय नेत्यांची अर्कचित्रेही सबनिसांनी सफाईने रेखाटली .
विकास सबनिसांचा राजकीय टीकाचित्रांचा प्रवास अवघड व आडवळणाचा होता. त्यातून त्यांनी मार्ग काढला. अशा क्षेत्रातील चित्रकाराची रेषेवर हुकमत हवी, वाचन हवे, बदलते राजकीय प्रवाह ओळखता आले पाहिजेत. हे प्रवाह साधे नसतात. गढूळ व स्वच्छ प्रवाह बेमालूम मिसळलेले असतात. ही भेसळ ‘एक्स-रे’च्या नजरेने ओळखून, चित्रांतून त्यावर प्रकाश टाकावा लागतो. चांगले टीकाचित्र तयार होण्यासाठी इतक्या शर्ती आहेत. म्हणूनच अनेक दैनिकांना चांगली टीकाचित्रे मिळणे अवघड जाते. राजकीय टीकाचित्रांच्या माध्यमाची एक उणीवही आहे. चित्रविषय शिळा झाला की त्या चित्राचे महत्त्व संपते. त्या चित्राचे नंतर केवळ त्या घटनेचा एक दस्तऐवज, हे रूप राहते. राजकीय टीकाचित्रांचे हे स्वरूप विकास सबनीस यांनी ओळखले .
व्यंगचित्र माध्यमाची ओळख सामान्य रसिकांसाठी व्हावी म्हणून विकास सबनिसांनी ‘गोष्टी व्यंगचित्रांच्या’ हे कार्यक्रम, प्रात्यक्षिके व भाषणे यांच्या मदतीने सादर केले. त्यांचे असे शेकडो कार्यक्रम झालेले आहेत. ‘कार्टूनिस्ट्स कंबाइन’ या मराठी व्यंगचित्रकारांच्या संघटनेचे ते काही काळ अध्यक्ष होते.
त्यांनी ‘युरोप, आय लव्ह यू’ हे युरोपच्या दौऱ्याचे सचित्र पुस्तक लिहिले . तसेच ‘व्यंगनगरी’ हे त्यांचे व्यंगचित्रे असलेले त्यांचे पुस्तक हे उत्तम व्यंगचित्रांचा नमुना आहे..
त्यांना दिवाळी अंकांतील सर्वोत्कृष्ट व्यंगचित्रांचे पुरस्कार मिळाले. मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे ते त्यांना दिले गेले. उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर, अमेरिकन ज्येष्ठ व्यंगचित्रकार रॅनन ल्युरी यांचे गौरवपूर्ण अभिप्राय त्यांच्या चित्रांना लाभले आहेत.
सुमारे सहा फूट उंचीचे लक्षवेधी विकास सबनीस व त्यांची चष्म्यातून दिसणारी भेदक नजर हा अर्कचित्राला एक विषय ठरू शकेल. त्यांच्या उपक्रमांत त्यांची पत्नी भारती व अॅनिमेशन क्षेत्रात काम करणारा त्यांचा मुलगा परिमल ह्यांचा सहभाग असे. अशा ह्या यशस्वी व्यंगचित्रकाराचे वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने मुंबईत निधन झाले.
- शि.द. फडणीस