Skip to main content
x

सोमण, भास्कर सदाशिव

    भास्कर सदाशिव सोमण यांचा जन्म ग्वाल्हेर येथे झाला. त्यांचे वडील वकील होते. पुढे त्यांच्या वडिलांनी सांगली संस्थानातील न्यायखात्यात मुन्सफ म्हणून नोकरी केली व नंतर राजीनामा देऊन काँग्रेसच्या राजकारणामध्ये भाग घेतला. भास्कर सोमण यांचे प्राथमिक शिक्षण बेळगावातील म्युनिसिपल शाळा क्र.२, टिळक महाविद्यालय, चिंतामणराव विद्यालय, सरदार विद्यालय या सर्व शाळांमध्ये झाले. ‘सरकारी शाळा सोडा’ या राष्ट्रीय चळवळीतील धोरणानुसार त्यांनी टिळक महाविद्यालयात प्रवेश घेतला. मॅट्रिकला असताना त्यांनी त्यांच्या आतेभावाच्या सल्ल्यावरून डफरीनवरच्या नौसेनेच्या प्रशिक्षणासाठी तयारी सुरू केली. डफरीनची परीक्षा यशस्विरीत्या उत्तीर्ण झाल्यावर ते १९२९मध्ये डफरीनवर दाखल झाले.

     डफरीनच्या तीन वर्षांच्या कालावधीत त्यांनी एस.एस. जलवीर या व्यापारी जहाजावर दोन महिने शिल्डिंग अ‍ॅप्रेंटिसशिप केली. १९३२च्या सुमारास रॉयल इंडियन मरीनमध्ये भारतीय तरुणांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. नौसेनेच्या प्रशिक्षणासाठी डार्टमाऊथ येथील अकॅडमीमध्ये डफरीनच्या चार कॅडेट्सकरिता जागा राखून ठेवण्याचा प्रस्ताव मंजूर झाला. त्या वेळी सोमणांनी रॉयल मरीनची प्रवेश परीक्षा देण्याचे ठरवले व ते त्यामध्ये उत्तीर्ण झाले. डफरीनचे प्रशिक्षण पुरे झाल्यावर १४ मार्च १९३२ रोजी ते इंग्लंडला रवाना झाले.

     इंग्लंडमध्ये त्यांचे सुरुवातीचे प्रशिक्षण एच.एम.एस. इरॅबस या प्रशिक्षण नौकेवर झाले. पुढे पाकिस्तानी नौदलाचे प्रमुख झालेले एच.एम.एस.चौधरी यांच्याशी सोमणांची तेथेच भेट झाली. या प्रशिक्षण नौकेवर असतानाच सोमणांनी नौसेना प्रशिक्षणाबरोबरच वैमानिक होण्याचा परवानाही मिळवला. मिडशिपमन सागरी प्रशिक्षणाकरिता त्यांची एच.एम.एम. व्हर्सटाइल या विनाशिका प्रकारातील जहाजावर नेमणूक झाली. त्यानंतर त्यांना पोर्टस्मथ आणि वेमथ येथील शिक्षण केंद्रांमध्ये विविध प्रकारचे प्रावीण्याचे शिक्षण मिळाले. परदेशातील प्रशिक्षण आटपून ते अडीच वर्षांनी ऑगस्ट १९३४मध्ये भारतात परतले. त्या वेळी त्यांची नेमणूक रॉयल मरीनमध्ये सब-लेफ्टनंट या हुद्द्यावर झाली. भारतात त्यांची प्रथम नियुक्ती कॉर्नवॉलिस या युद्धनौकेवर झाली. तेथे काही काळानंतर ते फर्स्ट लेफ्टनंट झाले. डलहौसी हे प्रशिक्षण जहाज अपुरे पडू लागल्यावर रॉयल मरीनने कराचीजवळच्या मनोरा या बंदराच्या परिसरात एच.एम.आय.एस. बहादूर हे प्रशिक्षण केंद्र स्थापन केले. तेथे सोमण भरती अधिकारी म्हणून दाखल झाले.

     दुसऱ्या महायुद्धात सुरुवातीला कॉर्नवॉलिस हे जहाज एडनजवळ सागरी पहारा करण्याच्या कामावर होते. त्याच जहाजावर सोमण पुन्हा फर्स्ट लेफ्टनंट म्हणून आले. त्यांच्या तीन वर्षांच्या कॉर्नवॉलिसवरील सेवाकाळात बेरबरा बंदरामध्ये भारतीय सैन्याच्या एका दलाची सुटका आणि एडनजवळच्या समुद्रात तीन इटालियन पाणबुड्यांचा विनाश या प्रमुख घटना घडल्या. युद्धकाळात त्यांच्यावर नाविक दलाकरिता भरती करण्याची जबाबदारी टाकण्यात आली. काही काळानंतर त्यांची खैबर या युद्धनौकेवर कमांडिंग ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली आणि लेफ्टनंट कमांडर या हुद्द्यावर त्यांची बढती झाली. त्यांनी २३ जुलै १९४२ रोजी खैबरची अधिकारसूत्रे ग्रहण केली. दरम्यानच्या काळात त्यांनी भूसेना व वायुसेना यांच्याबरोबर संयुक्त कारवाईचे प्रशिक्षणही पूर्ण केले.

    दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अटलांटिक महासागरामध्ये व्यापारी जहाजांना संरक्षण देणार्‍या ‘कॉनव्हॉय एस्कॉर्ट ग्रूप’चे काम खैबरने केले. नंतर खैबरची सूत्रे नव्या कॅप्टनकडे सुपूर्त करून सोमण दि.१ जून १९४३ रोजी ‘आय.एन.एस. हमला’वर दाखल झाले. त्या वेळी मंडपम येथे असलेल्या या नौसेना प्रशिक्षण  केंद्रामध्ये भूसेना आणि नौसेना यांच्या संयुक्त कारवाईचे प्रशिक्षण दिले जात असे. आग्नेय आशियातील युद्धक्षेत्रामध्ये या कारवाया करण्याच्या दृष्टीने याची तयारी सुरू होती. पण प्रत्यक्षात ती कारवाई झालीच नाही.

     महायुद्ध संपल्यानंतर जगभर विखुरलेली सैन्यदले आणि त्यांची सामग्री मायदेशी रवाना करणे सुरू झाले. ब्रिटिश सैन्यदलाची कामे ‘सी ट्रान्सपोर्ट ऑर्गनायझेशन’  या संघटनेमार्फत करण्यात आली व सोमण त्यामध्ये सहाय्यक वाहतूक अधिकारी म्हणून काम करू लागले. २६ ऑगस्ट १९४५ रोजी त्यांची नेमणूक ‘ड्राफ्टिंग कमांडर ऑफ नेव्ही’ या पदावर झाली. त्यानंतर  कमांडरच्या हुद्द्यावर बढती मिळाली. १९४६ मध्ये मुंबईतील नौदल उठावाच्या वेळी मुंबईत त्यांनी धीरोदत्त भूमिका घेेतली. त्याच सुमारास त्यांची कॅप्टन या हुद्द्यावर बढती झाली.

     स्वतंत्र भारतामध्ये नौसेना अधिकारी आणि जवानांच्या मनुष्यबळ विकासाबाबतच्या अभ्यासामुळे ‘चीफ ऑफ पर्सोनेल’ म्हणून भास्कर सोमण यांची नौसेना मुख्यालयात बदली झाली. त्यांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी या पदाची सूत्रे हाती घेतली. नाविक दलाच्या मालमत्तेची भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाटणी होत असताना सोमण यांचे योगदान महत्त्वाचे होते. नौसेनेच्या आधुनिकीकरणाचा पाया घालताना नौसेना उभारणी, मनुष्यबळ विकास, पुरवठा व्यवस्थापन यावर त्यांनी विशेष भर दिला. डायरेक्टर ऑफ पर्सोनेल, चीफ ऑफ अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अशा विविध पदांवर नौसेना मुख्यालयात काम केल्यावर तेे पुन्हा सागरी आघाडीवर गेले.

     पुढे सोमण यांची बदली एच.एम.आय.एस. जमना या जहाजावर कमांडिंग ऑफिसर म्हणून झाली. पुढे ७ ऑक्टोबर १९५१ रोजी आय.एन.एस. दिल्ली या त्या वेळच्या सर्वांत मोठ्या युद्धनौकेवर ते कमांडिंग ऑफिसर म्हणून गेले; पण दोनच महिन्यांनी त्यांची बदली आय.एन.एस. सिरकार्सवर झाली. पूर्व किनाऱ्यावर कार्यरत असताना विशाखापट्टणम हे गौण मानले गेलेले अविकसित बंदर, अग्रगण्य व प्रमुख नाविकतळ बनू शकेल हे त्यांच्या लक्षात आले. भारताच्या पूर्व किनार्‍याच्या संरक्षणाचा हा बालेकिल्ला आहे हे त्यांनी जाणून त्याप्रमाणे त्यांनी पावले उचलली. कोचीच्या परिसरातील आय.एन.एस. वेंडुतुथीवर  त्यांची कमांडिंग ऑफिसर म्हणून १२जानेवारी१९५४ रोजी बदली झाली. त्याचप्रमाणे ते कोची बंदराचे कमोडोर-इन-चार्ज झाले. या पदावर ते ध्वजाधिकारी होते.

     ते कोचीत असताना भारतात विखुरलेल्या नौसेनेच्या सर्व विशेष शिक्षणसंस्था कोचीत आणण्याचा आणि नौसेनेचे स्वत:चे विमानदल (नेव्हल एव्हिएशन) उभारण्याचा भारतीय नौसेनेने निर्णय घेतला. ह्या दोन्ही बाबी मूर्त स्वरूपात आणण्यात सोमणांनी मौलिक योगदान दिले. मुंबई बंदराचे कमोडोर-इन-चार्ज म्हणून त्यांनी १९५६ ते १९५७ दरम्यान काम पाहिले. याच सुमारास ते रिअर अ‍ॅडमिरल झाले.

     गोवामुक्तीसाठी पार पडलेल्या ‘ऑपरेशन विजय’ (१९६१) मधील यशस्वी कामगिरीनंतर सोमण यांची वाटचाल सर्वोच्च पदाकडे होऊ लागली. गोवामुक्ती मोहिमेत तत्कालीन भूसेनेचे दक्षिण विभाग प्रमुख लेफ्टनंट जनरल जितेंद्रनाथ चौधरी यांच्याबरोबर सोमण यांनी चढाईचा आराखडा बनवला होता. फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इंडियन फ्लीट  (फोसिफ) म्हणून त्यांची दि.१६ एप्रिल १९६० रोजी नियुक्ती झाली होती. देशातील सर्वांत मोठ्या युद्धनौकेवरून फोसिफ आपला कार्यभार सांभाळतो. सोमण यांनी आय.एन.एस. म्हैसूरवरून कार्यभार सांभाळला म्हणून त्यांना ‘फोसिफ म्हैसूर’ असे संबोधण्यात आले. आय.एन.एस. विक्रांत नौसेनेत दाखल झाल्यावर त्यांचे पद ‘फोसिफ विक्रांत’ म्हणून ओळखले जाऊ लागले. ‘फोसिफ’ म्हणून त्यांनी २६ महिने कार्यभार सांभाळला.

     एप्रिल १९६०मध्ये ते व्हाइस अ‍ॅडमिरल असतानाच भारतीय नौसेना प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. जून १९६६मध्ये ते सेवानिवृत्त झाले.

- शशिकांत पित्रे

अविनाश पंडित

सोमण, भास्कर सदाशिव