Skip to main content
x

सोनटक्के, नारायण श्रीपाद

नानासाहेब

      पल्या भारतराष्ट्राची प्राचीनतम, पवित्रतम व श्रेष्ठ विद्या म्हणजे ‘वेदविद्या’. या वेदविद्येच्या अध्ययनासाठी निर्माण केलेल्या वैदिक संशोधनाचे प्रथमपासून ते अखेरपर्यंतचे अथक सेवक म्हणजे ना. श्री. सोनटक्के. त्यांना सर्व जण ‘नानासाहेब’ म्हणत असत. त्यांनी जीवनभर वैदिक संशोधन मंडळाची विविध अंगांनी सेवा केली. तो काळ ब्रिटिश आमदानीचा म्हणजे पारतंत्र्याचा होता. मेकॉलेसाहेबांनी भारतात आंग्लपद्धतीची शिक्षण व्यवस्था आणली. अशा वेळी ज्यांना भारतीयत्वाचा, भारतीय शिक्षण पद्धतीचा अभिमान होता, त्यांनी राष्ट्रीय शिक्षण योजना स्वीकारली. त्या योजनेचा अवलंब करून बी.ए. समकक्ष विशारद व एम.ए. समकक्ष पारंगत असे अभ्यासक्रम सुरू केले. नानासाहेब स्वत:चा परिचय करून देताना गमतीने ‘मी ‘टिम’चा ‘वावि’ आहे’, असे म्हणत. म्हणजे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे वाङ्मयविशारद. त्यांचे सहकारी प्रा. वाग्वैद्य चिं. ग. काशीकर हे ‘टिम’चे पारंगत होते. सोनटक्के व काशीकर ही दुक्कल वैदिक संशोधन मंडळाचे दोन आधारस्तंभ.

     काशीकरांनी संस्थेत मुख्यत्वे अध्ययन व संशोधन केले. पण ‘संस्था’ म्हटली म्हणजे तिची आर्थिक स्थिती बळकट करण्याचे कार्य संस्थाचालक, आजीव सदस्य यांनाच करावे लागते. ते मुख्यत्वे नानासाहेबांनी केले. त्यांना हरिभाऊ जोशींची साथ होती. सिंधुताई धडफळे यांनी मंडळाला आर्थिक मदत केली.

     डॉ. त्र्यं. गो. माईणकर हे मंडळाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष झाले होते. ते दिल्ली विद्यापीठात संस्कृत विभाग प्रमुख होते. नानासाहेबांनी त्यांना सेवकांच्या पगारवाढीबाबत व मंडळाच्या इतर आर्थिक बाबतीत साहाय्य करण्याची विनंती केली. दिल्ली मंत्रालयावर असल्याने माईणकरांनी हे काम केले. त्याचे श्रेय त्यांच्याकडे विनंतीकरून हे काम करवून घेणार्‍या नानासाहेबांना जाते. नानासाहेब व गुरुवर्य यांच्यात ‘भाविकता’ हा समान धागा होता. चाकूरीच्या आश्रमात स्त्रिया वेदाध्ययन-वेदपठण करायच्या. त्यांना वेद शिकवण्यासाठी नानासाहेब जायचे. एकदा ते माईणकरांना सोबत घेऊन गेेले आणि महाराजांचे दर्शन दोघा भाविकांनी घेतले.

     नानासाहेबांनीच मंडळाच्या प्रकाशनासाठी अल्पदरात व आगाऊ पैसे न देता कागदाची असंख्य रिळे श्री. पारखे यांच्याकडून मिळवली.

     याचा अर्थ नानासाहेब संस्थेतील अध्ययनाचे काहीच काम करत नव्हते असे नाही, तर आजीव सदस्यांमधील श्रमविभाजनानुसार काशीकर-धर्माधिकारी हे दोघे अध्ययनात अधिक तर नानासाहेब व हरिभाऊ हे अर्थाजनात अधिक लक्ष घालायचे. आजमितीस वैदिक संशोधन मंडळ हे राष्ट्रीय संस्कृत संस्थानाकडून प्रगत अध्ययन केंद्र म्हणून मान्यता पावले आहे.

     १९५६साली वैदिक संशोधन मंडळाकडून सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या पटांगणावर वाजपेय याग करण्यात आला. त्याच्या संयोजनात नानासाहेबांचा मोठा सहभाग होता.

     वैदिक संशोधन मंडळाने पारित केलेल्या नानासाहेबांच्या निधनोत्तर शोक ठरावात त्यांच्या विशेष योगदानाचा निर्देश न चुकता केला आहे.

     पुणे विद्यापीठ स्थापन होण्याच्या आधी पुण्यातील सर्व महाविद्यालये व संशोधनसंस्था मुंबई विद्यापीठाशी संलग्न होत्या. पदव्युत्तर संस्कृत परीक्षेसाठी वेदांबरोबर त्याला पूरक असणारा अवेस्ता हाही अभ्यासक्रमात होता. आजमितीस पुण्यात भांडारकर संस्था, संस्कृत प्रगत अध्ययन केंद्र, पुणे विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, डेक्कन महाविद्यालय यांपैकी कुठेच अवेस्ता शिकवण्याची व अवेस्ताविषयक संशोधनाची सोय उपलब्ध नव्हती.

     सोनटक्के महर्षींनी ‘भारत-इराण संश्लेष!’ (हे देवीसिंग चौहान यांच्या एका ग्रंथाचे शीर्षक आहे.) घडवून आणणारा वेदसाहित्यासह अवेस्तासाहित्य (पहलवी-पांझर यांसह) मंडळात सुरू केला. एर्वद्, मा. फ. कांगा यांच्यासह संपूर्ण अवेस्ता व खोर्रे-अवेस्ता यांचे देवनागरीतील खंड त्यांनी मंडळातर्फे प्रकाशित केले. ते स्वत: अवेस्ता शिकले. एखाद्या अवेस्ता पुरोहिताने म्हणावे तसे त्या उच्चारात विविध समारंभांत अवेस्तातील काही गाथांचे पठण ते करू लागले. पूर्वी अवेस्ता-गुजराती असा कांगांचा कोश होता पण तो अपुरा वाटल्याने मंडळातर्फे अवेस्ता-आंग्ल कोशाची सुरुवात केली.

     डॉ. म. अ. मेहेंदळे यांच्याकडून ‘झरतुष्ट्राच्या गाथा’ हे पुस्तक लिहवून मंडळातर्फे प्रकाशित केले. याचे सर्व श्रेय नानासाहेबांच्या प्रोत्साहनास जाते.

     पूर्वी मंडळाकडे मोठी प्रशस्त इमारत नव्हती. आज टिळकस्मारक मंदिर आहे तिथे एक जुनी इमारत होती. त्यातील काही खोल्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने वैदिक संशोधन मंडळास दिल्या होत्या. पुढे गुलटेकडीला टि. म. वि.च्या प्रशस्त जमिनीवर वैदिक संशोधन मंडळाची तीन मजली प्रशस्त इमारत उभारली आहे. या इमारतीच्या उभारणीतही नानासाहेबांचा सिंहाचा वाटा होता. हुबळी, रत्नागिरी येथील अवेस्ता व झरतुष्ट्रीय धर्मविषयक ‘खारावाला’ यांच्या वार्षिक मालिकेत एक पुष्प नानासाहेबांनी बांधले होते.

नलिनी धडफळे

सोनटक्के, नारायण श्रीपाद