Skip to main content
x

सरदेसाई, नरहर गोपाळ

    भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था ज्या चार मुख्य आधारस्तंभांवर उभी राहिली, पैकी एक न.गो. सरदेसाई. पुण्यामध्ये प्राच्यविद्येचा अधिकृत अभ्यास सुरू होण्याआधी, इ.स. १९१५ मध्ये शुक्रवार पेठेत ‘ओरिएंटल बुक हाउस’ नावाची संस्था स्थापन करून त्यामधून प्राच्यविद्येचे अनेक चिकित्सापूर्ण ग्रंथ सर्व महाराष्ट्रभर पोहोचविण्याचे काम सरदेसाई घराण्याने केले. नरहर गोपाळ त्यांपैकी महत्त्वाचे होत.

     डॉ. नरहर गोपाळ सरदेसाई यांचे प्रारंभिक शिक्षण पंढरपूर येथील त्यांच्या आत्या राधाबाई पाध्ये यांच्याकडे झाले. पाध्ये घराणे पंढरपूरचे त्या काळचे भूषण, पं. काशीनाथ अनंत उपाध्याय ऊर्फ बाबा पाध्ये पंढरपूरचे एक विद्वान आणि कर्तृत्वसंपन्न व्यक्तिमत्त्व. ‘धर्मसिंधू’ नावाचा ग्रंथ लिहून ते नाव अजरामर झाले. श्रीविठ्ठल मंदिराची संपूर्ण व्यवस्था, रचना, शास्त्रार्थ बाबा पाध्ये पाहत असत. श्रींच्या नित्य-नैमित्तिक उपासना-अर्चनांची योजना त्यांनी त्या वेळी घालून दिली, जी आजतागायत चालू आहे. बाबा जसे धर्मशास्त्रकार होते, तसेच ते संस्कृत पंडितही होते. ‘विठ्ठल सहस्रनाम’, ‘विठ्ठलाष्टक’ अशी अनेक स्तोत्रे त्यांनी रचली. बाबा उत्तम कीर्तनकार होते. न.गो. यांनी नंतरचे शिक्षण आत्याच्या इच्छेनुसार मुंबईत जाऊन वैद्यकीय पदवी घेऊन पूर्ण केले. १९७० साली त्यांनी विदर्भातील यवतमाळ येथे स्वतःचा दवाखाना सुरू केला. लवकरच त्यांना मलाया देशातील पिनँग या ठिकाणी साहाय्यक सर्जन म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तेथील वास्तव्यात इचलकरंजीचे संस्थानाधिपती यांच्याबरोबर जावा, सुमात्रा, बाली अशा जवळच्या देशांचा दौरा करण्याची संधी मिळाली.

    या दौर्‍यामध्ये त्यांनी हिंदू संस्कृती, साहित्य, धर्म, चालीरीती आदींचा अभ्यास केला. रामायण-महाभारतावरील त्यांची श्रद्धा जाणून घेतली, नोंदवून ठेवली. यातूनच त्यांना प्राच्यविद्याभ्यासाची गोडी लागली. त्याच सुमारास पुण्यातील डेक्कन कॉलेजचे संस्कृत विद्वान डॉ. श्रीपाद कृष्ण बेलवलकर यांच्याशी नात्याचे संबंध आले. संस्कृतची गोडी वाढली. ‘वैद्यकीय शास्त्र-निष्णात’ म्हणून त्यांचा बोलबाला मागे पडला व ‘प्राच्यविद्या अभ्यासक’ म्हणून नाव समोर आले. १९१५-१६ साली पुण्यातील आनंदाश्रमात संस्कृत विद्वानांची बैठक झाली, त्यामध्ये महापंडित सर रामकृष्ण गोपाळ भांडारकरांच्या गौरवार्थ एखादी संस्था स्थापन करण्याचे ठरले. सरांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त ६ जुलै १९१७ रोजी ‘भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था’ स्थापन झाली. या सर्वांमध्ये न.गो. यांचा प्रामुख्याने सहभाग होता. परदेशातून परतल्यावर त्यांनी प्रथम १९१५ साली प्राच्यविद्येला वाहिलेले प्रकाशन पुण्यात सुरू केले.

     भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था स्थापन झाल्यावर प्रथम डॉ. बेलवलकर, डॉ. सरदेसाई या विद्वानद्वयींनी प्रयत्नपूर्वक सर भांडारकरांचा सुमारे साडेतीन हजार दुर्मीळ ग्रंथांचा संग्रह संस्थेकडे आणला आणि सर्वसामान्यांना हे भांडार खुले झाले. आज नव्वदहून अधिक वर्षे झाली. उत्तम प्रकारे हा संग्रह जपला आहे. त्याचे शास्त्रीय वर्गीकरण डॉ. बेलवलकरांचे निकटवर्ती स्नेही प्रा. रं.द. वाडेकर यांनी करून दिले. पुढे हळूहळू संस्थेच्या ग्रंथसंग्रहात वाढ झाली. आज सुमारे तीस हजार दुर्मीळ हस्तलिखिते आणि एक लाख दहा हजार ग्रंथ संस्थेकडे आहेत. त्याचा ‘श्रीगणेशा’ डॉ. न.गो. यांनीच केला. त्यानंतरच्या सुमारे वीस वर्षांच्या काळात त्यांनी संपूर्ण भारतभर प्रवास केला. तत्पूर्वी १९१९ साली भांडारकर संस्थेच्या पुढच्या बाजूस, बेलवलकरांच्या निवासस्थानामधील मैदानावर पहिल्या प्राच्यविद्या परिषदेचे अधिवेशन भरले होते. आता या परिषदेची चाळीसहून अधिक अधिवेशने भारतभर भरली. डॉ. दांडेकर आणि तत्पूर्वीच्या प्राच्यविद्या पंडितांच्या प्रयत्नांमुळे ‘आंतरराष्ट्रीय प्राच्यविद्या परिषदे’चेही एक अधिवेशन दिल्लीत भरले होते. अलीकडील पंधरा वर्षांत भांडारकर संस्थेच्या कर्मचार्‍यांच्या प्रयत्नांमुळे ‘बृहन्महाराष्ट्र प्राच्यविद्या परिषदे’ची सात-आठ अधिवेशने महाराष्ट्र-मध्यप्रदेशात भरली होती. त्या काळी अत्यंत खडतर असणारी, कैलास-मानसरोवर यात्राही त्यांनी केली होती. पूर्वीच्या नारायण पेठेमधील त्यांच्या निवासात संस्कृत भाषा शिकवण्याचे ते वर्गही त्यांनी नंतरच्या काळात संस्कृत प्रेमाखातर चालू केले होते. रोज पहाटे ते संस्कृत श्लोकांची संथा देत असत. त्या काळात नव्या पिढीला संस्कृतची गोडी लावण्याचे काम त्यांनी आवडीने केले.

     डॉ. राधाकृष्ण आणि बॅरिस्टर विद्याधर सरदेसाई हे त्यांचे चिरंजीव तेवढेच गाजले. विद्याधर यांचे चिरंजीव डॉ. एच.व्ही. सरदेसाई यांना चालू जमान्यात अग्रणी वैद्यकशास्त्रविशारद मानले जाते.

वा.ल. मंजूळ

सरदेसाई, नरहर गोपाळ