Skip to main content
x

शर्मा चरण मोतीलाल

     भारतीय पारंपरिक लघुचित्र-कलेचा समृद्ध वारसा लाभलेल्या घराण्यात, राज-स्थानातील नाथद्वारा येथे चरण मोतिलाल शर्मा यांचा जन्म झाला. आई प्रभाबेन यांच्या कलासंस्कारांनी युक्त असे बालपण घालविल्यानंतर त्यांनी उदयपूर विद्यापीठातून १९७४ मध्ये चित्रकलेतील पदवी व १९७६ मध्ये मुंबईतील सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून ग्राफिक्समध्ये पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला.

धैर्य, चिकाटी व एकाग्रता हे चरण शर्मा यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष आहेत. त्यांना लघुचित्रकलेच्या अखंड साधनेमुळे हे गुण आत्मसात करता आले. जलरंगाचे पारदर्शकत्व व प्रवाहीपणा त्यांच्या आचारविचारांत आहे. प्रख्यात चित्रकार एफ.एन. सूझा यांनी ‘भारतातील दहा उत्कृष्ट चित्रकारांपैकी एक’ असे संबोधून त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला आहे.

सुरुवातीला लघुचित्रे व नंतर आधुनिक ते समकालीन कला असा कलाप्रवास करणारे शर्मा अतिशय प्रभावी रेखांकन व रंगलेपनासाठी प्रसिद्ध आहेत. चित्रकला व ग्रफिक्स या कला माध्यमांत त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. लघुचित्रकलेतील पारंपरिक चित्रपद्धतीला छेद देऊन चित्र अथवा मुद्राचित्रांच्या माध्यमांद्वारे एखाद्या विषयाकडे किती विविध प्रकारे पाहता येते, याचे त्यांनी समर्थपणे दर्शन घडवले.

चित्राच्या माध्यमाची क्षमता अजमावून पाहणे ही त्यांच्या प्रयोगशीलतेची मुख्य दिशा राहिलेली आहे. चरण शर्मांच्या चित्रांत अलीकडच्या काळात ठरावीक विषय पुनरावृत्त होतात. गौतम बुद्ध ही त्यांतली जास्त मध्यवर्ती व मूलभूत संकल्पना होय. सुरुवातीच्या त्यांच्या ‘पेबल्स’ व ‘पपेट्स’ या चित्रमालिकाही विशेष गाजल्या. या सर्वच चित्रांना वैचारिक अधिष्ठान होते.

कलेला जीवनाचा अविभाज्य घटक मानणार्‍या चरण शर्मांच्या चित्रांतून सकारात्मक विशुद्ध आनंद देणारा सश्रद्ध मानवतावादी दृष्टिकोन व्यक्त झाला आहे. त्यांची चित्रे कोणत्याही विशिष्ट पठडीत बसणारी नाहीत.

त्यांनी जवळजवळ पंधरा समूह व पंचवीस एकल चित्रप्रदर्शनांमधून आपली चित्रे प्रदर्शित केली आहेत. राजस्थान ललित कला अकादमीचे ‘ग्रफिक अवॉर्ड’ त्यांना १९७२ मध्ये मिळाले. १९८३ मध्ये राजस्थान अकॅडमीचा पुरस्कार मिळाला. त्यांचा १९७२ मध्ये ‘फ्रेस्को म्यूरल’ या एशियन इंटरनॅशनल ट्रेड फेअरमध्येही सक्रिय सहभाग होता. सिंगापूर येथे १९९३ मध्ये युनायटेड ओव्हरसीज बँक ग्रूपतर्फे आयोजित चित्रस्पर्धेत त्यांच्या चित्राला ‘पेन्टिंग ऑफ द इयर’ हा किताब मिळाला. राजस्थानातील ‘महाराणा मेवाड’ हा प्रतिष्ठेचा सन्मान त्यांना १९९७ मध्ये प्राप्त झाला. चरितार्थासाठी चित्रकलेलाच पूर्णपणे वाहून घेतलेल्या चरण शर्मांची गौतम बुद्धाच्या जीवनावर आधारित चित्रे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर रसिकांच्या कौतुकास पात्र ठरली आहेत. मुंबई, नवी दिल्ली, उदयपूर, हैदराबाद, ऑस्ट्रेलिया, हाँगकाँग, दुबई, सिंगापूर, सॅन् फ्रॅन्सिस्को, बूडापेस्ट, व्हिएन्ना, येथे त्यांनी चित्रप्रदर्शने भरविली. चित्रप्रदर्शनासाठी त्यांनी परदेशी दौरे केले.

त्यांनी १९९६ मध्ये ‘आस्था के आश्‍चर्य’ यचित्रपटाचे दिग्दर्शनही केले. भारतात व परदेशांत त्यांच्या चित्रांची कलासमीक्षा झालेली आहे. त्यांच्या चित्रात जुनी संस्कृती व आधुनिक दृष्टिकोन यांचा अद्भुत मेळ दिसतो.

- पंकज भांबुरकर

 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].