Skip to main content
x

टाटा, जमशेदजी नुसरवानजी

     आधुनिक भारताचा औद्योगिक पाया रचणाऱ्या उद्योगपतींमध्ये जमशेदजींचे नाव प्रथम घेतले जाते. गुजरात येथील नवसारी येथे एका पारशी धर्माच्या पुरोहित घराण्यात जमशेदजी यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण आणि बालपण नवसारीत गेले. वयाच्या चौदाव्या वर्षी ते शिक्षणासाठी मुंबईत आले. मॅट्रिक झाल्यावर एल्फिन्स्टन महाविद्यालयात शिकत असताना त्यांना साहित्याची, वाचनाची, अभ्यासाची आणि व्यासंगाची गोडी लागली. कुशाग्र बुद्धिमत्तेची उत्तम मशागत होऊन नवनिर्माणाचा ध्यास या काळात त्यांच्यामध्ये रुजला आणि जन्मभर त्यांची साथ करत राहिला. ‘ग्रीन स्कॉलर’ म्हणजे त्या काळातील पदवी मिळवताना त्यांनी डिकन्स, थॅकरे, मार्क ट्वेन आदी लेखक झपाटून वाचले. ग्रंथातून ज्ञान मिळवावे, समजून घ्यावे आणि त्याचा उन्नतीसाठी, प्रगतीसाठी उपयोग करावा, हा संस्कार त्यांना मिळाला.

     वडिलांची मुंबईत पेढी होती. जमशेदजींनी छोटी-छोटी कंत्राटे घेऊन व्यवसायाला सुरुवात केली. युरोप व अतिपूर्वेकडील देशांना माल पुरवून त्यांनी भरपूर पैसा व अनुभव मिळवला. मँचेस्टरला भेट दिल्यावर त्यांना कापडनिर्मितीच्या उद्योगात रस उत्पन्न झाला. त्यासाठी अधिक पैसा हवा होता. अ‍ॅबिसिनियाच्या युद्धात जनरल नेपियरला सामग्री पुरवायचे कंत्राट घेऊन त्यांनी पैसे उभे केले. मुंबईतील एक जुनी तेल गिरणी स्वस्तात विकत घेऊन ती आपल्या कौशल्याने त्यांनी कापड गिरणीत परिवर्तित केली आणि दोन वर्षांनी फायद्यात विकून टाकली. नुकत्याच सुरू झालेल्या रेल्वे सेवेचा फायदा घेऊन त्यांनी नागपूरला स्वस्तात पाणथळ जागा घेऊन ‘सेंट्रल इंडिया स्पिनिंग मिल’ काढली तेव्हा त्यांच्यावर अनेकांनी टीका केली; पण त्यांनी हे साहस यशस्वी केले. १८७७ साली व्हिक्टोरिया राणीला भारताची ‘एम्प्रेस’ असा किताब दिला गेला, तेव्हा या गिरणीचे नाव बदलून ‘एम्प्रेस मिल’ ठेवण्यात आले.

     १८८५ साली मुंबईला राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली, तेव्हा जमशेदजी टाटा उपस्थित होते. त्यांनी तेव्हा आणि पुढेही काँग्रेसला भरीव आर्थिक मदत केली. राष्ट्रभक्तीबरोबर त्यांचे मानवांवरील प्रेम पुढे अनेक प्रसंगांत दिसून आले. त्यांचे देशप्रेम हृदयापेक्षा बुद्धिनिष्ठ होते. तरुण वयात त्यांनी चीन, जपान, मध्यपूर्वेतील  देश, युरोप येथे भेटी दिल्या आणि उत्तरायुष्यात अमेरिकाही पाहिली, तिथले उद्योग अभ्यासले. दूरदृष्टी परिपक्व होत गेली आणि कोणत्याही देशाची संपन्नता तीन घटकांवर अवलंबून असते हे त्यांनी अभ्यासाने जाणले.

     स्टील अथवा पोलाद म्हणजे प्रक्रिया केलेले लोखंड. ही यंत्रयुगाची पहिली गरज आहे. ही यंत्रे चालवण्यासाठी स्वस्त वीज, पाण्याच्या प्रवाहावर जनित्रे वापरून उत्पादन करायला हवी ही दुसरी गरज आहे आणि या दोहोंचा वापर करून उद्योग उभे करून संपन्नता आणायला तांत्रिक शिक्षण व त्यातील संशोधन ही तिसरी गरज आहे. त्या वेळच्या शेतीप्रधान संस्कृतीच्या पार्श्वभूमीवर जमशेदजींची दृष्टी अजोड म्हणावी लागेल. त्यांनी स्वप्ने फक्त पाहिलीच नाहीत, तर ती प्रत्यक्षात आणण्यासाठी कृतियोजना आखून त्या अमलातही आणल्या. या तिन्ही क्षेत्रांत देशाला स्वयंपूर्ण करण्यासाठी त्यांनी पहिली पावले टाकली. त्यांच्या परदेश प्रवासाचा प्रमुख हेतू हाच असे. नायगारा धबधबा पाहताना तेथील वीजनिर्मिती कशी होते याची त्यांनी सविस्तर माहिती घेतली. फ्रान्स आणि जपानच्या भेटीत रेशीम किड्यांच्या पैदाशीचे निरीक्षण केले. म्हैसूरला पूर्वी रेशमाचे उत्पादन उत्तम दर्जाचे होत असे हे त्यांच्या वाचनात आले होते. त्याचे पुनरुज्जीवन करण्यात जमशेदजींनी पुढाकार घेतला. सिंध प्रांतात लांब धाग्याचा कापूस लावायची त्यांची कल्पना अशीच यशस्वी झाली. कोणत्याही उद्योगाची पूर्वतयारी वाचनाने, अभ्यासाने, प्रत्यक्ष पाहून करायची त्यांची पद्धत होती. त्यामुळे जिथे अनुकूल परिस्थिती असेल, तिथेच तो उद्योग उभा राही आणि यशस्वी होई.

     इंग्लंडहून जुनी आणि स्वस्त यंत्रे आणून, तंत्रज्ञांची मदत घेऊन ती दुरुस्त करायची आणि वापरायची, असे त्यांनी काही प्रयोग केले. त्यामुळे उत्पादन दर्जा घसरला आणि ते फसले. पहिल्यांदा हे स्वस्तात पडले, तरी कालांतराने दुरुस्ती-देखभालीचा खर्च वाढतो आणि उद्योग महागात पडतो, हा धडा ते अनुभवातून शिकले. नंतर कोणत्याही उद्योगासाठी अत्याधुनिक यंत्रे वापरायला हवीत असा पायंडा त्यांनी पाडला आणि आजही टाटा उद्योगसमूहात तो पाळला जातो. अशा एका साहसात त्यांना अपयश आले आणि समभागांचे भाव गडगडले. तेव्हा त्यांनी आपली सर्व वैयक्तिक संपत्ती पणाला लावून कर्जे उभी केली आणि आठ वर्षांत उत्पादन निर्यात करण्याइतपत व्यवसाय यशस्वी करून दाखवला. त्यांचा उत्कृष्टतेचा ध्यास सर्व उद्योगांत दिसून येई.

     रोज दोन तासांच्या ग्रंथवाचनात खंड पडलेला त्यांना सहन होत नसे. रोज संध्याकाळी घोड्याच्या बग्गीतून आणि नंतर पुढे मोटारीतून मुंबईच्या रस्त्यावरून आपल्या वरिष्ठ सहकाऱ्यांना घेऊन ते फिरायला जात. तेव्हा नव्या उद्योगाच्या योजनांवर सतत चर्चा चाले. इतरांचे  म्हणणे ते लक्षपूर्वक ऐकून घेत आणि मगच स्वत: निर्णय घेत. व्यवस्थापन शास्त्रात आज ज्याला ‘ब्रेनस्टॉर्मिंग’ म्हणून महत्त्व आले आहे, ते वैचारिक चमूकार्य आचरत असत. जमशेदजी काळाच्या पुढे असल्याचे हे निदर्शक आहे.

     जमशेदजींना अनेक विषयांत रस होता. वनस्पतिशास्त्राचे त्यांचे ज्ञान पाहून कलकत्त्याच्या सुप्रसिद्ध  बोटॅनिकल उद्यानाच्या अधिकाऱ्याने चकित झाल्याची नोंद केलेली आहे. आपल्या जन्मगावी, नवसारी येथे त्यांनी प्राणिसंग्रहालय उभे केले. युरोपहून ग्रेहाउण्ड कुत्रे अन् पांढरे मोर आणून त्यांची पैदास करण्याचा बेत त्यांनी आखला होता. अनेकानेक दुर्मीळ झाडे आणून जगवायची हा त्यांचा छंद होता.

     भारतात मुलटी येथे फक्त कच्चे लोखंड तयार होई. इथे उत्तम प्रतीचे पोलाद व्हावे म्हणून त्यांनी पंधरा-वीस वर्षे विविध मार्गांनी प्रयोग चालवले होते. हलक्या खनिज संपत्तीचा अभ्यास करण्यासाठी परदेशी तज्ज्ञही मागवले होते. देशाच्या भूगोलाचा व्यवस्थित आढावा घेऊन सुवर्णरेखा नदीकाठची साकची येथील जागा निश्चित करून टाटा स्टीलचे उत्पादन करायची अतिभव्य योजना त्यांनी १९०२ साली लिहून ठेवली होती. तिथे वसवायच्या शहराचे रस्ते, बागा, मैदाने, घरे यांचे तपशील परिपूर्ण होते. त्यानुसार त्या जागी शहर वसवले गेले तेच जमशेदपूर. आजही ते नियोजनबद्ध  शहर म्हणून नावाजले जाते. टाटांच्या फुटबॉल चमूचा वेश कोणत्या रंगाचा असावा इथवर तपशील त्यांनी नमूद करून ठेवले होते.

    १८९३ सालच्या जुलैमध्ये जमशेदजी आणि स्वामी विवेकानंद यांनी जपानपासून शिकागोपर्यंत बोटीतून एकत्र प्रवास केला. जपानच्या औद्योगिक प्रगतीमुळे विवेकानंद प्रभावित झाले होते. भारताच्या या दोन थोर सुपुत्रांनी देशाच्या उन्नतीची चर्चा त्या भेटीत केली. त्यातून भारतात मूलभूत विज्ञानात संशोधन व्हायला हवे या कल्पनेचे बीज जमशेदजींच्या मनात रुजले. पुढे विवेकानंदांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी तसा उल्लेख केलेला आहे. आपल्या संपत्तीतील तीस लाख रुपये जमशेदजींनी त्यासाठी बाजूला काढून ठेवले. त्यात मैसूरच्या राजाने भर घातली आणि बंगलोरजवळ जागाही दिली. बंगलोरची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स उभी राहिलेली पाहायला जमशेटजी राहिले नाहीत; पण आपले पुत्र दोराब टाटा यांना त्यांनी कल्पना दिलेली होती. टाटा स्टील आणि ही संस्था अशी ही पित्याची दोन्ही स्वप्ने सर दोराबजी टाटा यांनी पुढे पूर्ण केली.

    परदेशी गोऱ्या लोकांना राखून ठेवलेल्या हॉटेलात एतद्देशीयांना, काळ्यांना प्रवेश दिला जात नाही हे शल्य त्यांना इतके डाचले, की त्यांनी जागतिक दर्जाचे हॉटेल मुंबईत उभे करायचा मनसुबा रचला आणि ताजमहाल हॉटेलची संकल्पना पुढे प्रत्यक्षात आली. त्या काळी मुंबई अनेक बेटांत विभागलेली होती आणि दलदलीचा खूप मोठा भाग होता. या शहराचे उत्तम बंदर हे वैशिष्ट्य भरभराटीसाठी योग्य आहे हे हेरून त्यांनी अनेक निरुपयोगी जागा विकत घेऊन त्यावर इमारती उठवल्या. उत्कृष्ट बांधणीच्या अनेक इमारती आजही दिमाखात मुंबईचे वारसा वैभव (हेरिटेज) दर्शवीत उभ्या आहेत.

     कोणतेही कायदे अस्तित्वात नसताना, जमशेदजींनी आपल्या कामगारांसाठी अनेक कल्याणकारी योजना आखून त्या कार्यवाहीत आणल्या. कामाचे तास कमी करणे, कापड गिरण्यांमध्ये आर्द्रताशोषक यंत्रे बसवणे, उत्तम वेतनमान देणे, पिण्यासाठी पाणी पुरवताना गाळणी यंत्रे बसवणे, अपघात भरपाई, घरे बांधणे आदी अनेक बाबतींत त्यांचा मानवतावादी दृष्टिकोन दिसून येई. टाटा कामगारांच्या दोन-तीन पिढ्या त्यांच्यासाठीच काम करत असल्याचे आज दिसते, त्याचे मूळ हेच आहे.

     आपल्या बहुविध उद्योगाचे जाळे व्यवस्थित चालावे म्हणून १८८७ सालच्या सुमारास त्यांनी ‘टाटा सन्स’ ही शिखर संचालक संस्था आणि इतर तिच्या अखत्यारित येणार्‍या पण स्वतंत्रपणे काम करणार्‍या घटक संस्था असे सुनियोजित व्यवस्थापकीय रूप दिले. त्यामुळे उद्योगाचा नवनव्या क्षेत्रात पाय रोवायचा मार्ग सुकर झाला. उद्योगाची विविधता आणि उत्पादनाची गुणवत्ता, त्याचबरोबर उद्योगातील नैतिकता पाहणे शक्य झाले. १८९५ सालच्या सुमारास त्यांनी कंपन्यांच्या फायद्याचा काही भाग बाजूला काढून टाटाच्या पहिल्या धर्मादाय न्यासाची (चॅरिटेबल ट्रस्ट)ची स्थापना केली. भारतातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देऊन परदेशी शिक्षण घ्यायची सोय या न्यासामुळे शक्य झाली. ही त्या उद्योग समूहाची पुढे संस्कृती बनली. त्यात दोराब टाटा आणि नंतर टाटा समूहाचे अध्यक्ष जे.आर.डी. टाटा यांनी अनेक पटींनी भर घातली. आज टाटा स्मारक कर्करोग रुग्णालयासह प्रचंड मोठ्या प्रमाणावर टाटांतर्फे धर्मादाय न्यासाच्या साहाय्याने सामाजिक कार्य केले जाते. कंपन्यांच्या फायद्याचा भाग समाजाला परत केला जातो.

     कठोर प्रशासक, न्यायप्रिय, दयाळू, वास्तवात येतील अशी स्वप्ने पाहणारा द्रष्टा आणि औद्योगिक संस्कृतीचा भक्कम पाया रचणारा देशभक्त, अशी त्यांची ओळख इतिहासात कायम राहील.

प्रा. माधुरी शानभाग

टाटा, जमशेदजी नुसरवानजी