तेंडुलकर, रमेश अच्युत
रमेश अच्युत तेंडुलकर यांचा जन्म अलिबागजवळच्या वैश्वी या गावी झाला. प्राथमिक व माध्यमिक शालेय शिक्षण अलिबागला झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी व नोकरीसाठी १९४७-१९४८ मध्ये ते मुंबईत आले. सिद्धार्थ महाविद्यालय, मुंबईमधून बी. ए. ची पदवी तर्खडकर सुवर्णपदकासह प्राप्त केली. १९५४ मध्ये मराठी विषयात एम. ए.ची पदवी मुंबई विद्यापीठातून न. चिं. केळकर सुवर्णपदकासह प्राप्त केली. १९४८ ते १९५४ या काळात नोकरी करता-करता शिक्षण घेतले. काही काळ पोलीस विभागातही काम केले.
याच दरम्यान महाविद्यालयीन जीवनक्रमात काव्य-लेखनाला व समीक्षा-लेखनाला प्रारंभ झाला. कुसुमाग्रजांच्या कवितांचा व व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला. तेंडुलकरांनी १९४८ साली याच प्रभावातून काव्य-लेखनाला सुरुवात केली. त्यांनी बी. ए.च्या वर्गात असताना दादरच्या छबिलदास शाळेच्या गच्चीत प्रा. माधव मनोहर ह्यांच्या उपस्थितीत कुसुमाग्रजांवर व्याख्याने दिली. हा एक प्रकारे काव्य समीक्षेचा प्रारंभबिंदू ठरला. पहिला समीक्षा लेख जानेवारी १९५२च्या ‘साहित्य’ या द्वैमासिकात ‘इंदू तूच तुझ्यापरीः माधव जूलियनः विरहतरंग’ या शीर्षकाने प्रकाशित झाला. ‘कुसुमाग्रजः कालचे आणि आजचे’ या ‘हंस’ १९५५ च्या अंकातील लेखाने तेंडुलकरांचे नाव साहित्यविश्वापुढे आले. बोरकर, पाडगावकर, करंदीकर इत्यादी तत्कालीन कवींच्या प्रभावामुळे ‘कविता’ या वाङ्मय प्रकाराकडे विशेष ओढा होता. ‘सत्यकथा’ या प्रतिष्ठित वाङ्मयीन नियतकालिकामधून १९५५ पासून नियमितपणे कविता प्रसिद्ध होऊ लागल्या. १९५४ ते १९५७ या काळात ‘मौज’ साप्ताहिकातून विविध पुस्तकांवर त्यांनी परीक्षणे लिहिली.
दरम्यान १९५५ मध्येच सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये मराठी विषयाचे अधिव्याख्याता म्हणून ते रुजू झाले व त्यांच्या प्रदीर्घ अध्यापन सेवेची सुरुवात झाली. १९६७मध्ये मुंबईच्याच कीर्ती महाविद्यालयामध्ये मराठी विभाग प्रमुख पदावर रुजू झाले. पुढे १९९० मध्ये सेवानिवृत्त होईपर्यंत तिथेच त्यांनी मराठी साहित्याच्या व भाषेच्या अध्ययन-अध्यापनाचे कार्य निष्ठापूर्वक केले. १९६९मध्ये मराठी संशोधन मंडळाचे संचालक म्हणूनही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांनी सांभाळली. मुंबई मराठी साहित्य संघाच्या अमराठी भाषकांसाठी चालणार्या भाषा साहित्य वर्गांसाठी त्यांनी जवळजवळ तीन दशके अध्यापनाचे कार्य केले. मराठी वाङ्मयाच्या कोशकार्यातही ते सक्रिय सहभागी राहिले.
त्यांचे पहिले समीक्षा लेखांचे पुस्तक ‘गीतभान’च्या रूपाने १९८२ मध्ये प्रकाशित झाले. यातील भा.रा.तांबे, पु. शि. रेगे, अनंत काणेकर, इंदिरा संत, बा. भ. बोरकर, ग. दि. माडगूळकर इत्यादींविषयीची त्यांची काव्य-समीक्षा त्यांच्या सूक्ष्म, मर्मग्राही, रसिकतापूर्ण आणि प्रसन्न समीक्षा शैलीचा प्रत्यय देते. ‘मराठी रोमँटिक काव्यप्रतिभा’ (१९९९) व ‘बालकवींची कविता: तीन संदर्भ’ (१९९९) ही दोन पुस्तकेही मराठी काव्य-समीक्षेत मोलाची ठरतात. आधुनिक मराठी काव्यातील रोमँटिसिझमच्या प्रभावाची तेंडुलकरांनी केलेली चिकित्सा मराठी समीक्षेत दुर्मिळ ठरते. त्याचप्रमाणे केशवसुत, गोविंदाग्रज आणि मर्ढेकर यांच्याशी असलेला बालकवींच्या काव्यजाणिवेचा अंतरंग-संबंध तीन स्वतंत्र शोधलेखांतून त्यांनी उपरोल्लिखित पुस्तकात प्रभावीपणे उलगडून दाखविला आहे.
समीक्षकाप्रमाणेच त्यांच्या संशोधक वृत्तीचा प्रत्यय त्यांच्या काही साक्षेपी संपादनांमधूनही आपल्याला येतो. या संपादित ग्रंथांमध्ये ‘चौकोनी आकाश’ (अनंत काणेकरांच्या कविता, १९७४), ‘कविता दशकाची’ (८०च्या दशकातील दहा प्रातिनिधिक कवी, १९८०), ‘मृण्मयी’ (इंदिरा संत यांच्या निवडक कविता, १९८१) ‘आठवणीतल्या कविता’, भाग १ ते ४ (१९८९, १९९३, १९९५), ‘मराठी संशोधन’ खंड १३ व १४ (१९८१), ‘काव्यसरिता’ (१९५०), या ग्रथांचा समावेश होतो. तेंडुलकरांनी प्रारंभीपासून लिहिलेल्या कवितांचा ‘मानस-लहरी’ हा संग्रह त्यांच्या निधनानंतर असस प्रकाशन (त्यांच्या चिरंजीवाने काढलेली प्रकाशन संस्था) तर्फे प्रकाशित झाला. त्यांचे मराठी कवितेवरील व्यासंगपूर्व समीक्षालेखन विविध नियतकालिकांतून वेळोवेळी प्रकाशित झाले. त्यांनी ‘साहित्य: अध्यापन आणि प्रकार’ या ग्रंथात लिहिलेला कविता या वाङ्मय प्रकारातील दीर्घ लेख एकूणच मराठी काव्य-समीक्षेच्या प्रांतात मौलिक व ऐतिहासिक ठरावा असा आहे.
प्रसिद्धी पराङ्मुख वृत्तीच्या तेंडुलकरांना ‘सचिन तेंडुलकर’ या त्यांच्या जगप्रसिद्ध क्रिकेटपटू पुत्रामुळे उत्तरायुष्यात प्रसिद्धी मिळाली, तरी त्यांच्या निरलस, सोज्ज्वळ आणि साध्या व्यक्तित्वपैलूंच्या खुणा त्यांच्या संपूर्ण जीवनक्रमात उठून दिसतात. तेंडुलकरांच्या ‘गीतभान’ला महाराष्ट्र राज्याचा उत्कृष्ट वाङ्मनिर्मितीचा पुरस्कार प्राप्त झाला. २ मे १९९९ ला अनंत काणेकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘लोकसत्ता’ दैनिकात लिहिलेला लेख हा त्यांचा अखेरचा लेख ठरला.
- डॉ. राजेंद्र नाईकवाडे