Skip to main content
x

तुळपुळे, शंकर गोपाळ

     डॉ.शंकर गोपाळ तुळपुळे यांचा जन्म पुणे येथे झाला. एम.ए. पदवी प्राप्त झाल्यावर त्यांनी बेळगाव, धारवाड आणि सोलापूर येथे मराठीचे अध्यापन केले. ‘यादवकालीन मराठी भाषा’ या विषयावरील प्रबंधास त्यांना पीएच.डी. मिळाली. पुणे विद्यापीठात ते मराठी विभाग प्रमुख होते. जर्मनीतील हायडलबर्ग विद्यापीठाचे अभ्यागत प्राध्यापक हा सन्मान त्यांना प्राप्त झाला. प्राचीन मराठी भाषेच्या संदर्भात तुळपुळे यांनी केलेले संशोधन वाङ्मयाच्या इतिहासात अत्यंत मोलाचे ठरते.

‘पांच संतकवी’, ‘प्राचीन मराठी गद्य’, ‘प्राचीन मराठी कोरीव लेख’, ‘मराठी ग्रंथनिर्मितीची वाटचाल’, ‘महानुभाव पंथ आणि त्याचे वाङ्मय’, ‘भक्तीचा मळा’, ‘महानुभाव पद्य’, हे ग्रंथ त्यांनी लिहिले. गुरुदेव रानडे उर्फ रा.द.रानडे हे त्यांचे गुरू होते. त्यांच्यासंबंधी त्यांनी ‘गुरुदेव रानडे: चरित्र आणि तत्त्वज्ञान’ हा ग्रंथ लिहिला.

‘लीळाचरित्र’, ‘दृष्टान्तपाठ’, ‘ऋद्धिपूरवर्णन’, ‘श्रीकृष्णचरित्र’, ‘मराठी निबंधाची वाटचाल’, ‘माधवस्वामीकृत योगवासिष्ठ’ या ग्रंथाचे टीपा शब्दसंग्रह, प्रस्तावना यांसह संपादन केले. महानुभाव वाङ्मयाचा त्यांचा सखोल अभ्यास होता.

साहित्य परिषदेच्या ‘मराठी वाङ्मयाचा इतिहास: खंड:१’ या ग्रंथाचे त्यांनी संपादन केले. डॉ.अ‍ॅन फेल्डहाउस यांच्या सहकार्याने त्यांनी प्राचीन मराठी शब्दकोशाचे अवघड काम पूर्णत्वास नेले. सुमारे ६००० प्राचीन मराठी शब्दांचा कोश तयार केला. त्यात ज्ञानेश्वरी-अनुभवामृत, नामदेवांचे अभंग, महानुभाव-कालीन वाङ्मय, संतसाहित्यातील मराठी शब्दांची व्युत्पत्ती, सुबोध मराठीत तसेच इंग्रजीत अर्थ, लिप्यंतर, स्पष्टीकरणार्थ अवतरणे यांचा समावेश केला. संशोधन वृत्ती, आध्यात्मिक ओढ, प्रखर बुद्धीमत्ता, कार्यप्रवणता, मराठी भाषेचे प्रेम या गुणांनी ते संपन्न होते. पंचवीस मौल्यवान ग्रंथ हे त्यांचे संस्मरणीय योगदान आहे.

- श्याम भुर्के

तुळपुळे, शंकर गोपाळ