Skip to main content
x

ठाकूर, किशोर काशिनाथ

          स्वत:ला कामात झोकून देत गरजेपुरत्या व्यावसायिक कामांसोबतच सातत्याने दर्जेदार नावीन्यपूर्ण शिल्प-निर्मिती करणारे शिल्पकार म्हणून किशोर काशिनाथ ठाकूर प्रसिद्ध आहेत. राकट, दणकट, शिल्पकाराला शोभणारी, ब्रॉन्झची वाटणारी त्यांची देहयष्टी आहे; पण स्वभाव मात्र साधा, मवाळ अन् बुजरा आहे!

          आई काशीबाई आणि वडील काशिनाथ नावजी ठाकूर हे शेतकरी दांपत्य रायगडमधील पेण तालुक्यातील उम्बर्डे गावातील आपल्या छोट्याशा शेतात राबायचे आणि मिळालेल्या उत्पन्नावर गुजराण करायचे. चार मुले व दोन मुली अशा सहा अपत्यांपैकी किशोर सर्वांत लहान व सर्वांचे आवडते होते. कुठल्याही कलेचा वारसा नसलेल्या कुटुंबात जन्मलेले किशोर यांना कलेची आवड उपजतच होती. वारसा होता तो गणपतीच्या मूर्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या पेण या गावचा!

          लहानपणापासूनच गणपतीच्या मूर्तींच्या कारखान्यात काम करणाऱ्या किशोर यांच्या कामातला सफाईदारपणा बघून इतर कारागीर त्यांना कलेचे शिक्षण घेण्याचा सल्ला द्यायचे. मुंबई शहरात राहणाऱ्या नातेवाइकांकडून त्यांना ‘बान्द्रा स्कूल ऑफ आर्ट’ या कला महाविद्यालयाची माहिती मिळाली. तेथे त्यांनी ‘आर्ट टीचर डिप्लोमा’ केवळ शिक्षकाची नोकरी मिळू शकेल या उद्देशाने १९७७ साली पूर्ण केला. तेव्हा तेथील प्राध्यापक ईश्‍वर शेट्टी यांनी त्यांच्यातील कलागुण पारखून त्यांना सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथे शिल्पकलेचे शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले. जे.जे. स्कूलचा शिल्पकला विभाग बघून भारावलेल्या किशोर यांनी तेथे प्रवेश घेतल्यानंतर तेथील वास्तववादावर भर असलेल्या शास्त्रोक्त पद्धतीच्या अभ्यासात ते गढून गेले. विद्यार्थिदशेतील महत्त्वाची बक्षिसे मिळवत १९८१ साली त्यांनी शिल्पकला विभागातली ‘जी.डी. आर्ट’ ही पदविका पूर्ण केली. तेथे त्यांना शिल्पकला विभागाची शिष्यवृत्ती मिळाली.

          धातुकामात आवड असल्यामुळे त्यांनी १९८७ साली ‘मेटल क्राफ्ट’ या विभागातील ‘जी.डी. आर्ट’ पदविका प्राप्त केली.

          शिक्षण घेत असताना ते चुनाभट्टी येथील झोपडपट्टीत, आपल्या मोठ्या बहिणीकडे राहायचे. तेथील परिस्थिती, आपले गाव आणि लखलखणारे मुंबई शहर या विरोधाभासावर मनन करत शिक्षणाचे महत्त्व जाणणारे किशोर तेथील चाळीतल्या मुलांना शिकवायचे. म्हणून तेथील लहानथोर मंडळी प्रेमाने आणि आदराने त्यांना ‘मास्तर’ म्हणत.

          किशोर ठाकूर यांचे शिल्पकाम चाळीत सुरू झाले. चाळीतले होतकरू तरुण मदतीला स्वत:हून हजर असायचे. त्या काळात सभोवतालच्या जीवनातील अनुभवांमधून पडलेल्या असंख्य प्रश्‍नांचे निराकरण करण्यासाठी चिंतनात्मक शिल्पे घडविण्यास त्यांनी सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात त्यांच्या या प्रयत्नाला चित्रकार गोपाळ आडिवरेकरांचे योग्य मार्गदर्शन लाभले.

          १ जून १९९८ रोजी आशा गावंड हिच्याशी विवाहबद्ध झाले. सहजपणे कोणातही न मिसळणारे, परिस्थितीची जाणीव ठेवणारे, प्रामाणिकपणा अंगी असलेले किशोर हे कुशलतेने कुठल्याही माध्यमात, प्रकारात आणि आकारात काम करू शकतात. ते व्यावसायिक कामात फारसे रमले नाहीत. त्यापासून अलिप्त राहून ते गरजेपुरते काम स्वीकारतात. तरीही त्यांनी केलेल्या व्यावसायिक कामातील काही शिल्पे उच्च कलाकृतीच्या दर्जाची आहेत. वीस फूट उंच स्क्रॅप धातूमधील ‘विश्‍वरूपदर्शन’ हे शीर्षक असलेल्या शिल्पाकृतीमध्ये दशावताराचे रूप वापरून त्याच्या मधल्या पोकळीचा वापर ठळकपणे श्रीकृष्णाचे आणि अस्पष्टपणे ब्रह्माचे रूप दाखविण्यासाठी त्यांनी मोठ्या कल्पकतेने केला आहे. तसेच पाच फूट उंचीची ब्रॉन्झ धातूमधील गणपतीची मूर्ती ! यातील दैवी भाव आणि वैशिष्ट्यपूर्ण रूप यांसाठी हे शिल्प उल्लेखनीय आहे. सध्याच्या जीवनातील सवंगता आणि चंगळवादाच्या पार्श्‍वभूमीवर नावीन्याचा शोध घेणारे त्यांचे मन सतत आत्मपरीक्षण करते. अशा संस्कृतीवर मूकपणे भाष्य करणाऱ्या उपेक्षितांना व श्रमिकांना ते आपल्या शिल्पातून साकार करतात. आपली प्रत्येक कलाकृती स्वतंत्र विचाराची आणि आशयाशी सुसंगत अशा माध्यमात असावी याकडे त्यांचा कल असतो. आवश्यक त्या ठिकाणी ते सुलेखनाचाही वापर करतात. अशा कलाकृती बक्षीसपात्रही ठरत गेल्या. त्यांपैकी १९८० मध्ये आणि १९८३ ते ८६ ही सतत चार वर्षे असे एकूण पाच वेळा महाराष्ट्र शासनाचे राज्य पुरस्कार विविध माध्यमांतील त्यांच्या शिल्पाकृतींना मिळाले. १९८८ मध्ये त्यांना ‘सेकण्ड इंटरनॅशनल एशियन-युरोपियन आर्ट बिनाले’ या प्रदर्शनामध्ये सहभागाची संधी मिळाली. १९९१ मध्ये त्यांना राजस्थान ललितकला अकादमी ऑफ आर्ट या विभागीय केन्द्राचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

          भारतातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या ‘आंतरराष्ट्रीय त्रैवार्षिक’ (त्रिनाले) या सातव्या प्रदर्शनात त्यांचा सहभाग होता. त्यात त्यांनी ‘हिटलर’चा प्रतीकात्मकतेने वापर केलेला होता. मारणारे व मरणारे सैनिक आणि सामान्य जीव, नवीन पिढीचा जन्म अशा आशयाची ‘डूम्स डे’ हे शीर्षक असलेली ही शिल्पाकृती लक्ष वेधणारी होती. किशोर ठाकूर यांना २००४ साली ललितकला अकादमी, नवी दिल्ली यांच्याकडून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यातील त्यांची ‘पॉवर’ ही कलाकृती या सिरीजमधील बुल आणि पँटचा प्रतीकात्मक वापर करून ब्राँझमध्ये साकारलेली होती.

          किशोर ठाकूर यांची अकरा प्रदर्शने झाली. त्यांपैकी २००८ मध्ये त्यांच्या जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथील प्रदर्शनातील नवकलेच्या प्रवाहातल्या अस्तित्वाची जाण असलेल्या मिश्र माध्यमातील कलाकृती विशेष गाजल्या. उदाहरणार्थ, ‘व्टिन टॉवर’चा भास निर्माण करणारा, अंडी विकणारा सायकलस्वार आणि काचेच्या बांगड्यांचा हार असलेली फ्लेक्स पोस्टरच्या संस्कृतीवर प्रकाशझोत टाकणारी उपहासात्मक कलाकृती. गरजेपुरती व्यावसायिक कामे करत स्वान्तसुखाय कलानिर्मितीत रमणारे किशोर ठाकूर पेणजवळच्या उम्बर्डे या गावी कार्यरत आहेत.

- रवी मंडलीक

 

ठाकूर, किशोर काशिनाथ