Skip to main content
x

थौमस, पप्पी कुझवेलील

     प्पी कुझवेलील थॉमस यांचा जन्म केरळात मुथुकुलम येथे झाला. बडोदा येथून संग्रहालय विद्या आणि प्राचीन इतिहास व पुरातत्त्व या विषयांत पदव्या संपादन करताना थॉमस यांनी प्राचीन काळातील गोवंशासंबंधी संशोधन केले. पुरातत्त्वीय प्राणिविज्ञानाच्या क्षेत्रातील एक आद्य अभ्यासक असणार्‍या डी.आर. शाह यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले होते. याच विषयात काम करत राहून त्यांनी डेक्कन कॉलेजमधून १९७७ मध्ये डॉक्टरेट संपादन केली. त्यांच्या प्रबंधाचा विषय प्रागैतिहास काळातील पुरातत्त्वीय प्राणिजीवन असा होता. याच काळात त्यांनी पुरातत्त्वीय प्राणिविज्ञानाला अत्यावश्यक असलेले विविध प्राण्यांचे सांगाडे जमवले व हाडांवरून प्राणी ओळखण्याची पद्धत विकसित केली. यानंतर २००७ मध्ये निवृत्त होण्याअगोदरच्या तीस वर्षांच्या सेवा काळात त्यांनी पुरातत्त्वीय प्राणिवैज्ञानिकांची नवी पिढी तयार केली. पुण्यात डेक्कन कॉलेजात पुरातत्त्व विभागात वेगवेगळ्या वैज्ञानिक विषयांच्या ज्या संशोधन प्रयोगशाळा आहेत, त्यांमधील पुरातत्त्वीय प्राणिविज्ञान (archeozoology) या विषयाची प्रयोगशाळा निर्माण करण्याचे श्रेय पी.के. थॉमस यांना दिले जाते.

     प्राचीन काळातील प्राणी, पशुपालन व विविध कालखंडांतील अर्थकारणात प्राण्यांचे स्थान या संबंधातील त्यांचे ६० शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी बागोर व बालाथल (राजस्थान), भीमबेटका (मध्य प्रदेश), दमदमा (उत्तर प्रदेश), वीरापुरम (आंध्र प्रदेश) व कुंतासी (गुजरात) अशा अनेक राज्यांमधील पुरातत्त्वीय स्थळांवरील प्राणी अवशेषांचा अभ्यास केला. तथापि महाराष्ट्रातील ताम्रपाषाणयुगाच्या (Chalcolithic) व महापाषाणयुगाच्या (Megalithic) पुरातत्त्वीय स्थळांच्या संबंधातील त्यांचे संशोधन विशेष महत्त्वाचे आहे. माहूरझरी, रायपूर, खैरवाडा व भागीमोहरी या महापाषाणयुगीन स्थळांमध्ये मिळालेल्या घोड्यांच्या दफनांबद्दलचे त्यांचे निष्कर्ष विशेष उल्लेखनीय आहेत. भारतीय पुरातत्त्वाच्या संबंधात मैलाचा दगड मानल्या जाणार्‍या इनामगाव येथील उत्खननात मिळालेल्या प्राण्यांच्या सर्व अवशेषांचा त्यांनी अभ्यास केला. पुरातत्त्वीय प्राणिविज्ञानातल्या सर्व आधुनिक पद्धतींचा वापर करून त्यांनी अनुमाने काढली. त्यांचे हे संशोधन प्राचीन काळातील पर्यावरण व त्यातील बदल यांचा मागोवा घेण्यासाठी उपयोगी ठरले. काटेकोर निरीक्षणांचा वापर करून प्राचीन काळातील मानव व प्राणी यांच्यामधील नातेसंबंध समजून घेतल्यास त्यामधून किती महत्त्वाची माहिती मिळते, हे थॉमस यांनी दाखवून दिले.

     थॉमस दीर्घकाळ आय.ए.सी.झेड. (IACZ) या पुरातत्त्वीय प्राणिविज्ञानातील आंतरराष्ट्रीय संस्थेचे पदाधिकारी होते. तसेच आय.एस.पी.क्यू.एस. (ISPQS)  या पुरातत्त्वातील प्रतिष्ठित संस्थेचे ते दीर्घ काळ महासचिव होते.

डॉ. प्रमोद जोगळेकर

थौमस, पप्पी कुझवेलील