Skip to main content
x

थिटे, गणेश उमाकांत

     णेश उमाकांत थिटे हे संस्कृतचे एकनिष्ठ, गाढे अभ्यासक असून संस्कृत विद्येच्या विविध अंगांचा अभ्यास व विशेषतः वेदविद्या तसेच वैदिक कर्मकांड या विषयांचे मौलिक चिंतन आणि संशोधन करणारे प्राच्यविद्या पंडित म्हणून प्रसिद्ध आहेत. डॉ. थिटे यांचा जन्म, शिक्षण आणि अध्यापन तसेच संशोधन कार्य पुणे याच नगरात झाले. न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे बालमुकुंद संस्कृत महाविद्यालय, संस्कृत पाठशाळा, पुणे विद्यापीठ या संस्थांमधून त्यांचे शिक्षण झाले.

     एस.एस.सी. परीक्षेत त्यांना संस्कृतमध्ये प्रथम क्रमांक आणि अनेक पारितोषिके, शिष्यवृत्त्या मिळाल्या. त्यात सर्वात महत्त्वाची म्हणजे १९६०मध्ये त्यांना पहिल्या क्रमांकाची जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळाली. त्यांनी  पुणे विद्यापीठातून ‘Sacrifice in Brahmana Texts’ या प्रबंधावर पीएच.डी. मिळाली. विविध प्रकारच्या अध्ययनवृत्ती स्वीकारीत पुढे पुणे विद्यापीठाच्या संस्कृत विभागात प्रपाठक (रीडर) आणि प्राध्यापक (प्रोफेसर), तसेच विभागप्रमुख म्हणून काम करून त्यांनी २००४मध्ये सेवानिवृत्ती स्वीकारली. सेवानिवृत्तीनंतर भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरात  मानद संग्रहाध्यक्ष (Honorary Curator) म्हणून त्यांनी कार्य केले. सध्या ‘महाभारताची सांस्कृतिक सूची’ या प्रकल्पातील ते प्रधान संपादक म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांनी अध्यापन कालात १७ विद्यार्थ्यांना पीएच.डी.चे मार्गदर्शन केले.

     डॉ. थिटे यांच्या संशोधनकार्याची थोडक्यात ओळख करून देणे महत्त्वाचे ठरेल. रूढ, प्रचलित मतांच्या, प्रवाहाच्या उलट जाऊन वेगळे, मौलिक विचार त्यांच्या सर्व ग्रंथांत आणि लेखांमध्ये मांडलेले दिसतात. या प्रबंधात असा मुख्य विचार मांडला आहे की ब्राह्मणग्रंथात आपातत: जरी कर्मकांडाचा विस्तार आणि गुंतागुंत दिसत असली, तरी तेथे नियमांच्या शब्दश: पालनाला महत्त्व नसून त्यामागील तत्त्वाला, आशयाला, श्रद्धेला महत्त्व दिले आहे. ‘Medicine: its magicoreligious aspects according to the Vedic and later Literatire (Pune1981)या ग्रंथात तसेच “Music in the Veda,its magicoreligious significances(Delhi,1996) या ग्रंथात अनुक्रमे आयुर्वेद आणि संगीत या विषयांचा अन्य अभ्यासकांप्रमाणे ‘शास्त्रेतिहास’ किंवा ‘कलेतिहास’ या दृष्टीकोनातून अभ्यास न करता ‘धर्मेतिहास’ या दृष्टीकोनातून अभ्यास केला आहे. आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये आढळणारी ‘आदिम’ विचारधारा तसेच संगीतविषयक विवेचनातूनही भारतीय विचारसरणीतील आदिम प्रवाह या दोन्ही ग्रंथांतून स्पष्ट केले आहेत. ‘यज्ञ : काल, आज, उद्या’ (पुणे २०००) या मराठी पुस्तकात कर्मकांडाची अपरिहार्यता, वैदिक विचारसरणीत आणि कर्मकांडात असलेले काम आणि क्रोध (वेदोत्तर काळात बौद्ध विचारसरणीच्या परिणामामुळे यांना शत्रू मानले जाते) यांचे महत्त्वाचे स्थान, अभिचार आणि प्रायश्चित्ती यांचा घनिष्ठ संबंध, पशुयागातील हिंसा, यज्ञाविषयी अपव्ययाच्या कारणावरून होणार्‍या टीकेतील फोलपणा, यज्ञात होणार्‍या तडजोडी, सध्याच्या काळातील यज्ञ आणि इतर कर्मकांडाची स्थिती, वेद तसेच वैदिक कर्मकांडाचे गेल्या काही वर्षात झालेले पुनरुज्जीवन, वेदाध्ययनाचे आणि वैदिक कर्मकांडाचे भवितव्य यासारख्या अनेक विषयांवर मार्मिक, मौलिक आणि तटस्थ वास्तववादी असे चिंतन व्यक्त केले आहे. याशिवाय ‘आपस्तंब श्रौतसूत्र’ आणि ‘कात्यायन श्रौतसूत्र’ या ग्रंथांचे इंग्रजी अनुवाद (अनुक्रमे दिल्ली २००५ आणि २००८), ‘यज्ञ : आशय आणि आविष्कार, (पुणे १९७९), ‘चार्वाकसमीक्षा, (पुणे १९७८)’ हे संपादित ग्रंथही प्रकाशित झाले आहेत. जर्मनमधून इंग्लिशमध्ये भाषांतर केला गेलेला Windisch या लेखकाचा ‘History of Sanskrit Philology’ (Delhi 2009) तसेच Meyer या लेखकाचा ‘ Festivals in India’ (Delhi 2012) याचाही उल्लेख  महत्त्वाचा ठरेल. फ्रेंचमधील वेदविषयक काही भाषांतरित ग्रंथ अजून अप्रकाशित आहेत.

     विविध नियतकालिकांतून किंवा गौरवग्रंथातून प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या लेखांची संख्या सुमारे दोनशेहूनही अधिक आहे. त्यातील काही प्रमुख निष्कर्ष थोडक्यात नोंदवणे उपयुक्त ठरेल. हे निष्कर्षही संस्कृतच्या इतर अभ्यासकांच्या विचारप्रवाहाच्या विरुद्ध जाणारे आहेत. ‘संस्कृतमध्ये Nature या अर्थी शब्द नाही. निसर्ग, प्रकृती यांचे मूळ अर्थ वेगळे आहेत. ज्याप्रमाणे अत्यंत आरोग्यसंपन्न माणसाला आपणास हृदय, मेंदू, यकृत यासारखे अवयव असतात याची जाणीव नसते, त्याप्रमाणे संस्कृतमधील कवींना ‘पर्यावरण’विषयक जाणीव नव्हती. ‘प्रदूषण’ माहीत नव्हते, कारण प्रदूषणच नव्हते. म्हणून प्राचीन भारतातील पर्यावरण-विचार ही कल्पना कालविपर्यासावर आधारलेली आहे.’ ‘प्राचीन भारतात विज्ञान आणि तंत्रविद्या (आयुर्विद्येसह) शूद्रांचे विषय मानले होते आणि या विषयांना अत्यंत हीन स्थान होते. या उलट वेदविद्या, कर्मकांड, तत्त्वज्ञान, व्याकरण यांना सर्वोच्च स्थान होते आणि ते विषय ब्राह्मणांकडे सोपवले होते. दैनंदिन जीवनात जो विषय जितका जास्त उपयोगी, तो सर्वात नीच स्थानावर आणि जो सर्वात कमी उपयोगी असा विषय (व्याकरण) हा सर्वात श्रेष्ठ मानला गेला होता.’ ‘वैदिक यज्ञांपैकी अश्वमेध, पुरुषमेध, सर्वमेध, सहस्रसंवत्सरसत्त्र — इतकेच नव्हे, तर राजसूय, व्रात्यस्तोम, गोसव यांसारखे यज्ञ, महाव्रत यांसारखे विधी अनेक दृष्टींनी शब्दश: करणे कठीण असल्यामुळे हे यज्ञ काल्पनिकच मानावे लागतील.

      इतिहासकालीन शिलालेख, नाणी किंवा अभिजात संस्कृत साहित्य यांमध्ये हे यज्ञ केल्याचे उल्लेख आले असले, तरी त्यांची विश्वसनीयता संदिग्ध आहे. आपली प्रसिद्धी वाढवण्यासाठी राजांनी त्यांच्या भाटांकरवी असे उल्लेख कृत्रिम रीतीने करवून घेतले असावेत. मात्र प्रत्यक्षात ते शब्दश: करणे अशक्य आहे,’ ‘पंचतंत्रातील कथा प्रौढ अशा राजकुमारांना सांगितल्या असल्या, तरी प्रत्यक्षात त्या राजाने आपले राज्य कसे सांभाळावे किंवा वाढवावे हे सांगण्यासाठी नसून राजदरबारी सेवकांनी आपले स्थान कसे टिकवून धरता येईल आणि दुर्बल प्राण्यांनी किंवा व्यक्तींनी सबळ प्राण्यांच्या जगात स्वत:ला कसे जगवता येईल ते सांगण्यासाठी उपयुक्त आहेत. दुर्बल प्राण्यांनी सबल प्राण्यांची वंचना करून स्वसंरक्षण करावे. वंचना, दंभ म्हणजेच गनिमी कावा हाच दुर्बलांना जगण्याचा आधार कसा होतो, ते पंचतंत्रात शिकवले आहे. त्यामुळे धार्मिक साहित्यात आढळणारी, ‘पुण्याचा विजय आणि पापाचा पराजय’ ही कल्पना पंचतंत्रात उलट स्वरूपात आढळते. तेथे पुण्याचा पराजय आणि पापाचा विजय दाखवला आहे.’ ‘भारतीय अभ्यासक सर्व जुन्या कल्पना, ग्रंथ किंवा विचारवंतांचे विचार आजही प्रस्तुत (relevant) आहेत असे दाखवण्याचा प्रयत्न करतात. हे एक प्रस्तुततेचे वेड (relevance-mania) आहे. त्या त्या व्यक्तींच्या जन्म-मृत्युदिनी असे विचार प्रकट होतात. यातील तार्किक विसंगती लोकांच्या लक्षात येत नाही.  मोठ्या व्यक्तींचे मोठेपण आजच्या प्रस्तुततेच्या निकषावर न मोजता ऐतिहासिकतेच्या निकषांवर मोजले पाहिजे.’ ‘संस्कृत भाषा धर्म भाषा, अभिजात भाषा किंवा देववाणी म्हणून प्राचीन भारतीय ऐतिहासिक ठेवा ह्या स्वरूपात जपली आणि अभ्यासली पाहिजे. तिला लोकभाषा किंवा दैनंदिन व्यवहाराची भाषा करण्याचा प्रयत्न अनावश्यक आहे. त्यामुळे संस्कृतचे ‘संस्कृतत्व’ नष्ट होईल आणि तिचे प्रदूषण होईल. संस्कृत प्रचारकांनी संस्कृतचा प्रचार केला नसून जे आधीच प्रचारात होते ते संस्कृत आपल्या फायद्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी वळवले. देवभक्ती, देशभक्ती, (महापुरुष)-देहभक्ती आणि अनुकरण यांच्यावर अर्वाचीन संस्कृत साहित्य आधारलेले आहे. त्याला प्रतिभेची बैठक नाही.’ ‘भारतीयांचे वेदाध्ययन फलगामी आहे, तर पाश्चात्त्यांचे वेदाध्ययन मूलगामी आहे’ यासारखे अनेक विचार डॉ. थिटे यांनी संकीर्ण लेखांमधून किंवा अन्यत्र मांडले आहेत. त्यांच्या लेखनाची सूची, तसेच त्या लेखनातील प्रमुख विचारांचे संकलन ‘Problems in Vedic and Sanskrit’ (  संपादक Maitreyee Deshpande,Delhi 2004) या ग्रंथात (पृ. ३८७-४१२) पाहावयास मिळेल.

      डॉ. थिटे यांना उज्जैन येथील महर्षी सांदीपनी वेदविद्या प्रतिष्ठानतर्फे वेदवेदाङ्ग पुरस्कार, देशस्थ ऋग्वेदी शिक्षणोत्तेजक सभेचा ऋग्वेद पुरस्कार, तसेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे इंदिरा बेहरे सुवर्ण पदक असे पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी पूर्व जर्मनी, स्वित्झरर्लंड, नेदरलँड्स, फ्रान्स, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, रुमानिया यासारख्या देशातील चर्चासत्रात भाग घेणे किंवा अध्यापन कार्य करणे या प्रकारचे कार्य केले. सप्टेंबर २०१६मध्ये त्यांच्या गौरवार्थ अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात एक वेदविषयक चर्चासत्र आयोजित केलेगेले होते.

डॉ. थिटे यांच्या मौलिक विचारसरणीचे एक चिन्ह म्हणून त्यांनी पूर्वी कधीही कुणीही न वापरलेले नव्याने बनवलेले काही शब्द उल्लेखिता येतील.

उदाहरणार्थ,Animalism,heno-ritualism,henoism,relevance-mania,archeosophy,philovedism, विदूषिका इत्यादी.

मैत्रेयी देशपांडे

थिटे, गणेश उमाकांत