थत्ते, राम अनंत
शिल्पकार
अजिंठ्यातील जगप्रसिद्ध लेण्यांच्या उत्कृष्ट देखभालीबद्दल पंडित नेहरूंकडून शाबासकीची थाप मिळवणारे व भारतात रंगीत कपबश्यांची प्रथा (ट्रेंड) प्रथम आणणारे नाशिकचे ज्येष्ठ शिल्पकार म्हणजे राम अनंत थत्ते हे होत. प्रायोगिकता हा स्थायिभाव, नवीन माध्यमे, नवीन संकल्पना यांत सतत कार्यमग्न असणारया राम अनंत थत्ते यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे झाला. आई उमाबाई व वडील अनंत नारायण थत्ते यांचा शिवणयंत्रांचा व्यवसाय होता. त्यांचे बालपण मालेगाव येथे गेले. चौथीनंतर पुढील शिक्षणासाठी ते नाशिकला पेठे विद्यालयात दाखल झाले. मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथे शिल्पकला विभागात प्रवेश घेतला. दुसरया वर्षी त्यांना दरमहा ३४ रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली.
वाचनाची अतिशय आवड असल्याने थत्ते जे.जे.च्या ग्रंथालयात भरपूर वाचन करत. जगप्रसिद्ध शिल्पकार ‘जेकब एप्स्टीन’ यांचे आत्मचरित्र त्यांच्या हाती पडले व त्यातून त्यांना नवी दृष्टी लाभली. अंतिम वर्षाला असताना राम थत्ते यांच्या ‘स्वातंत्र्यदेवी’ या शिल्पाकृतीस सुवर्णपदक मिळाले.
त्यांची १९५६ मध्ये पुरातन वास्तुशास्त्र विभागातून, अजिंठा लेण्यांची देखभाल करण्यासाठी चित्रकार म्हणून नेमणूक झाली. ते १९५९ पर्यंत अजिंठ्यात कार्यरत होते. या काळात पुरातत्त्व खात्याच्या संग्रहालयातील दुर्मीळ इंग्रजी व इतर भाषिक ग्रंथांचे त्यांनी वाचन केले. चित्रांचे संरक्षण व संवर्धन करण्याचे शास्त्रही ते शिकले.
त्यांनी १९५९ ते १९६४ पर्यंत महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठ, बडोदा (वडोदरा) येथे पुरातत्त्व खात्यात नोकरी केली. विद्यापीठातील त्यांचे काम बघून सौराष्ट्रातील परशुराम पॉटरीजचे गणपुले यांनी आपल्या कंपनीत संकल्पनकार (डिझाइनर) म्हणून त्यांना पाचारण केले. या काळात थत्तेंनी भारतात प्रथमच रंगीत ‘टी सेट्स’ करण्यास सुरुवात केली. त्या वेळी हिंदी चित्रपटांनीही रंग धारण करायला सुरुवात केली होती. साहजिकच, या चित्रपटांमधून त्यांनी खास डिझाइन केलेले ‘टी सेट्स’ आवर्जून वापरले जात. त्याचबरोबर सॅनिटरी वेअरमध्ये वीस नवीन आकारांची भांडी, खेळणी, फुलदाण्या यांचीही त्यांनी नावीन्यपूर्ण डिझाइन्स केली. पंचवीस वर्षे काम केल्यावर १९९० मध्ये निवृत्तीनंतर ते नाशिकला स्थायिक झाले. नाशिकमध्ये त्यांनी स्वत:चा स्टूडिओ सुरू केला.
मूलाकारावर भर देणारी भारतीय संस्कारांतील आधुनिकता हे त्यांच्या कलाकृतींचे वैशिष्ट्य आहे. पुण्याच्या नॅशनल इन्शुअरन्स अकॅडमीत अठरा पुतळ्यांच्या माध्यमांतून भारतीय संस्कृतीची ओळख सांगणारे भव्य थीम पार्क, याशिवाय ‘मारवा गोवा पोर्ट ट्रस्ट’ येथे ‘नौकानयनाचा इतिहास’ यांसारखी त्यांची महत्त्वाची कामे, रस्त्यात उभारलेली शिल्पे आणि अनेक उपाहारगृहे, शिक्षणसंस्था, बंगले, उद्याने येथे निरनिराळ्या प्रकारची शिल्पे त्यांनी साकारली आहेत.
राम थत्ते यांना १९५६ ते १९६१ पर्यंत राज्य कला प्रदर्शनांमध्ये सलग सहा वेळा पारितोषिके मिळाली. अजिंठ्याच्या सहवासातून त्यांनी ‘अजिंठा’ हे पुस्तक मराठी व इंग्रजी या दोन भाषांमधून लिहिले. शिल्पकलेशिवाय दृश्यकलेवरील लेखन व व्याख्यानांद्वारे थत्ते कलाप्रसारासाठी कार्यरत आहेत.