वराडे, सुधाकर दामोदर
सुधाकर दामोदर वराडे यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे झाला. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले शालेय शिक्षण नूतन विद्यालय, मलकापूर येथून पूर्ण केले. त्यांचे वडील भूमिहीन शेतमजूर होते. एका मुलास अभियंता, दुसऱ्यास शेती पदवीधर तर तिसऱ्यास आधुनिक वैद्यकशास्त्रापर्यंतचे शिक्षण देऊन आपल्या पायावर उभे केले. वराडे वडिलांचा व्यवसाय सांभाळत. ते १९६६मध्ये एस.एस.सी. परीक्षेत गुणवत्ता यादीत १४व्या क्रमांकावर आले. त्यांनी १९७०मध्ये अकोला येथील कृषी महाविद्यालयातून बी.एस्सी. (कृषी) ही पदवी परीक्षा प्रथम वर्गात प्राप्त केली व १९७३मध्ये जबलपूर येथील जवाहरलाल नेहरू कृषी विश्वविद्यालय, उद्यानशास्त्रातील एम.एस्सी. (कृषी) ही पदवी प्रथम क्रमांकाने मिळवली. पदवी अभ्यासक्रमासाठी त्यांना राष्ट्रीय शिष्यवृत्ती तर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी जवाहरलाल नेहरू कृषी विश्वविद्यालयातून शिष्यवृत्ती मिळाली होती.
वराडे यांनी १९७४मध्ये बा.सा.को.कृ.वि., दापोली येथे पुल ऑफिसर म्हणून नोकरीस सुरुवात केली. त्यांची म.फु.कृ.वि.त उद्यानविद्या साहाय्यक प्राध्यापक या पदावर निवड झाली व पुढे कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयात याच पदावर नियुक्ती झाली. येथे त्यांनी भाजीपाल्याच्या नवीन वाणांच्या बहुस्तरीय चाचण्या घेतल्या व त्यावर आधारित प्रबंध म.फु.कृ.वि.स सादर करून त्यांनी उद्यानशास्त्रातील पीएच.डी.ची पदवी प्राप्त केली. त्यांना १९९३मध्ये नेदरलँड सरकारची शिष्यवृत्ती मिळाली व त्यांनी भाजीपाला लागवडीसंबंधी अत्याधुनिक तंत्राचे प्रशिक्षण घेतले. त्यांनी १९८५-९० या कालावधीत विषय-विशेषज्ञ म्हणून संशोधनाचे निष्कर्ष शेतकऱ्यांच्या शेतावर राबवणे हे कृषी विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे कार्य केले. त्यांनी १९९०-९४ या कालावधीत कांदा-पैदासकार म्हणून काम करत असताना कांद्याच्या परदेशी निर्यातीस वाव असलेल्या ‘फुले सुवर्णा’ व ‘फुले सफेद’ या जाती निर्जलीकरणासाठी निर्माण केल्या. साठवणुकीत कांद्याचे कमीत कमी नुकसान व्हावे यासाठी त्यांनी चाळीमध्ये योग्य सुधारणा करून इतर तंत्राचे प्रमाणीकरण केले. त्यांनी १९९४ नंतर राहुरी येथेच वरिष्ठ भाजीपाला पैदासकार म्हणून काम करत असताना इतर सहकाऱ्यांच्या मदतीने मिरचीच्या फुले ज्योती, फुले सूर्यमुखी, फुले मुक्ता, वांग्याची खास भरितासाठी ‘फुले हरित’, काकडीची ‘फुले शुभांगी’, तर कारल्याच्या ‘फुले ग्रीन गोल’, ‘फुले उज्ज्वला’, ‘फुले प्रियांका’ या नवीन जाती विकसित केल्या. त्यांनी भेंडीच्या ‘फुले कीर्ती’, वाल घेवड्याची ‘फुले गौरी’, ‘फुले अश्विनी’, पडवळाच्या ‘फुले वैभव’, हळदीच्या ‘फुले स्वरूपा’ या जाती विकसनात सहभाग घेतला. त्यांनी एम.एस्सी.च्या २० व पीएच.डी.च्या १० विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक म्हणून काम केले. या विद्यार्थ्यांच्या संशोधनातून ग्लॅडिओलसच्या ‘फुले प्रेरणा’, ‘फुले तेजस’ व ‘फुले निलरेखा’ या जाती प्रसारित केल्या.
त्यांनी म.फु.कृ.वि.च्या उद्यानविद्याशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून काम करत असताना डाळिंबाच्या ‘भगवा’ या जातीची शिफारस केली. त्याचप्रमाणे रोपवाटिकेचे व भाजीपाल्याच्या बीजोत्पादनाचे कार्यक्रमही मोठ्या प्रमाणावर राबवून महाराष्ट्राच्या उद्यान विकासासाठी सुधारित जातींच्या फळझाडांची कलमे व भाजीपाला बियाणे पुरवले. त्यांचे १५० शास्त्रीय लेख विविध नियतकालिकांत व १०० विस्तारविषयक मराठी लेख प्रसिद्ध झाले. ते उद्यानविद्या विभागप्रमुख या पदावरून ३१ जुलै २०१० रोजी निवृत्त होऊन पुण्यात स्थायिक झाले.