Skip to main content
x

आरफळकर, हैबतबाबा

     श्रीक्षेत्र आळंदीहून आषाढी महायात्रेसाठी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे पायी जाणारा लाखो वारकऱ्यांचा ‘संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा’ हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वातील एक अभूतपूर्व प्रबोधन भक्तिसोहळा आहे. या सोहळ्याचे प्रवर्तक म्हणून ह.भ.प. हैबतबाबा यांना ‘मालक’ या नावाने मान दिला जातो.

     हैबतबाबा आरफळकर यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कृष्णानदीकाठचे ‘आरफळ’. त्यांचे आडनाव पवार; पण आरफळचे म्हणून त्यांचे ‘आरफळकर’ हेच आडनाव रूढ झाले. हैबतबाबांचा जन्म १७५० साली झाला. उमेदीच्या काळात ते ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांच्या दरबारी सेवेत दाखल झाले. दरबारी सेवेतून निवृत्ती घेऊन ते महाराष्ट्र मायभूमीकडे परत येतानाच सातपुडा पर्वतरांगेत दरोडेखोरांनी त्यांच्या लवाजम्यावर अचानकपणे सशस्त्र हल्ला केला, हैबतबाबांना कैद करून ठेवले व बाकीच्यांना ठार केले. हैबतबाबांची लहानपणापासून संत ज्ञानेश्वरांवर निष्ठा होती. त्यांनी ज्ञानेश्वर माउलींचा धावा केला आणि आश्चर्य म्हणजे दुसऱ्या दिवशी दरोडेखोरांच्या प्रमुखाला पुत्रप्राप्ती झाल्याच्या आनंदात त्याने हैबतबाबांना सोडून दिले. आपला हा पुनर्जन्म आहे व तो ज्ञानेश्वर माउलींच्या कृपेनेच आपल्याला लाभला असा भाव त्यांच्या मनी दाटून आला व यापुढील सर्व आयुष्य आळंदीत राहून ज्ञानेश्वर माउलींच्या सेवेत समर्पित करण्याचा त्यांनी संकल्प केला.

     हैबतबाबा आळंदीत आले व इंद्रायणी नदीतील सिद्धबेटावर राहून नामसाधना करू लागले. पुढे पुरामुळे त्यांना गावकऱ्यांनी ज्ञानदेव समाधी मंदिरातील एका ओवरीत राहण्यास भाग पाडले. रात्री शेजारतीनंतर पहाटेच्या काकड आरतीपर्यंत हैबतबाबा वीणा घेऊन ज्ञानदेव समाधीपुढे भजन करीत. त्यांची तल्लीनता व ईश्वरी अनुसंधान विलक्षण होते.

     १८२३ दरम्यान त्यांनी आळंदी येथून आषाढी यात्रेसाठी पंढरपूरला पायी जाणारा श्री ज्ञानेश्वर पालखी सोहळा सुरू केला. लष्करी सैनिकी शिस्तीने सोहळ्याची आखणी केली. बेळगाव जिल्ह्यातील ‘अंकली’चे सरदार शितोळे यांच्याकडून त्यांनी ज्ञानेश्वर पालखीसाठी घोडे, पालखी, अब्दागिरी असा लवाजमा मिळवला. वासकर महाराज, खंडोजीबाबा, आळंदीकर, शेडगे अशा अनेक वैष्णव भक्तांचे त्यांनी पालखी सोहळ्यास सहकार्य घेतले.

     हा पालखी सोहळा गेली पावणेदोनशे वर्षे अव्याहत चालू आहे. या सोहळ्यात सुमारे लाख-दीड लाख वारकरी आळंदी ते पंढरपूर, वीस दिवस भजन करीत ऊन-वारा-पाऊस यांची तमा न करता चालत जातात. पालखी सोहळा हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे.

     पालखी सोहळा स्थिरस्थावर झाल्याचे पाहून हैबतबाबांना धन्यता वाटली व त्यांचे डोळे पैलतीरी लागले. वृद्धापकाळामुळे वयाच्या ८६ व्या वर्षी, १८३६ साली, कार्तिक वद्य अष्टमीच्या दिनी त्यांनी इहलोकीचा निरोप घेतला. पंढरपूरला संत नामदेवांची समाधी जशी विठ्ठल मंदिराच्या महाद्वारातील पायरीवर आहे, तशी हैबतबाबा यांची समाधी आळंदीच्या ज्ञानेश्वर समाधी मंदिराच्या महाद्वारातील पायरीवर बांधण्यात आलेली आहे. ‘हैबतबाबांची पायरी’ व ‘हैबतबाबांची ओवरी’ या आजही त्यांच्या कार्याचे पुण्यस्मरण घडवीत आहेत.

विद्याधर ताठे

आरफळकर, हैबतबाबा