बढे, राजा नीळकंठ
भावगीते, चित्रपटगीते, नाट्यगीते, क्रांतिगीते, लावण्या, पोवाडो यांद्वारे मराठी मुलखात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करणारे कवी राजा बढे मराठी चित्ररसिकांमध्ये कमालीचे लोकप्रिय झाले ते १९४३ साली प्रदर्शित झालेल्या ‘रामराज्य’ या चित्रपटातील गीतांद्वारे. ‘रामराज्य’मधली गीते, तसेच ‘त्या चित्तचोरट्याला का आपुला म्हणू मी’, ‘हसले मनी चांदणे’, ‘दे मला गे चंद्रिके प्रीती तुझी’, ‘हसतेस अशी का मनी, चांदणे शिंपीत जाशी’, ‘कळिदार कपूरी पान, माझिया माहेरा जा’ या गीतांनी राजा बढे यांचे नाव सर्वदूर पोहोचवले.
प्रेमकाव्यातले राजे, गझलरचनाकार म्हणून विख्यात असलेले राजा बढे चित्रपट व्यवसायात १९४० साली पार्श्वनाथ आळतेकरांच्या प्रेरणेने आले. मुंबईत येऊन आळतेकरांच्या सिर्को फिल्म्समध्ये त्यांनी दोन वर्षे उमेदवारी केली. सिर्को फिल्म्स अल्पायुषी ठरली आणि पुढे ‘भरतभेट’च्या वेळी बढे यांनी प्रकाश पिक्चर्समध्ये नोकरीला सुरुवात केली. ‘रामराज्य’ या त्यांना नाव मिळवून देणाऱ्या चित्रपटाची गीते लिहिण्याची संधी त्यांना मिळाली, ती या पुढच्या प्रवासात. निर्माता विजय भट्ट यांना ‘रामराज्य’ची गीते स्वा. सावरकरांकडून लिहून हवी होती. सावरकरांनी भट यांना राजा बढे यांचे नाव सुचवले. राजा बढे यांच्या लेखणीने नवा आविष्कार, नवा चमत्कार घडवला. ‘रामराज्य’मधली ‘लाडक्या राणीला लागले डोहाळे’, ‘उचल पाऊले आश्रम हरिणी’, ‘कसले स्वप्न तुला पडले’, ‘सृजन घे परिसा रामकथा’, ‘वसंत फुलला मनी सखे’ ही गाणी कमालीची गाजू लागली आणि बढे यांचे नावही गाजू लागले.
याआधी १९४१ मध्येही बढेंनी ‘हरी सहकारी रे आमुचा’, ‘लपलासी कुठे सावळिया’ यासारखी सावरकरांसह अनेकांच्या सहज ओठावर येणारी गाणी महात्मा विदुरांसाठी लिहिली होतीच. प्रसंगनिष्ठ रचनेत आकर्षकता, भावपूर्णता, सोपेपणा, उत्कटता, नादमयता आणणाऱ्या बढे यांचे हे कसब त्यांच्या सर्वच रचना प्रवासात सातत्याने जाणवत राहते.
बढे यांनी १९४९ साली ‘गळ्याची शपथ’ या फेमस चित्र संस्थेच्या सामाजिक-विनोदी चित्रपटासाठीही गीते लिहिली. कोंडिबा या नावाने विनोदी कविता करणाऱ्या बढेंमधला खट्याळ-मिश्कील गीतकार या चित्रपटातून समोर येतो. १९५०मध्ये ‘मायामच्छिंद्र’ या चित्रपटासाठी बढेंनी फक्त एका आठवड्यात सात गाणी लिहिली. ‘कलगीतुरा’ या लावणीप्रधान चित्रपटासाठी लावण्या लिहिल्या, ‘राजगडचा राजबंदी’ या स्वत:च निर्मिलेल्या चित्रपटासाठी ‘दार उघड बये दार उघड’ हा पोवाडा लिहिला. बढे यांनी ‘भल्याची दुनिया’, ‘कारस्थान’, ‘घरचं झालं थोडं’, ‘नायकिणीचा सज्जा’, ‘माझी आई’, ‘संत बहिणाबाई’, ‘गळ्याची शपथ’ अशा पौराणिक, सामाजिक, ऐतिहासिक चित्रपटांसाठी विविधरंगी गीतलेखन केले. ‘राम जोशी’ चित्रपटातली ‘शालूवरती आलं पाखरू, नका हाणू गोफणी, घरधनी’ ही लावणीही बढे यांचीच.
राजा बढे यांच्या कविता आणि स्वत: राजाभाऊ यांना लावण्यांचे देणे लाभले होते. देखण्या व्यक्तिमत्त्वाबरोबरच अभिनयगुणही अंगी होतेच. बढे यांनी आळतेकरांकडे काही काळ अभिनयाचे आणि व्हॉईस कल्चरचे धडेही घेतले होते. यामुळेच महेश कौल या नामवंत दिग्दर्शकाच्या प्रकाश पिक्चर्सच्या ‘अंगुरी’ या हिंदी चित्रपटात बढेंनी अभिनयही केला. चित्रपटांबरोबरच नाट्यक्षेत्रातही त्यांनी स्वत:ची मुद्रा उमटवलेली आहे. १९४४ साली त्यांनी रंगभूमीवर काम करायला प्रारंभ केला. ‘माझ्या कलेसाठी’, ‘सारस्वत’ या लिटल थिएटर्सच्या नाटकांमधून त्यांनी प्रमुख भूमिका केलेल्या आहेत. मामा वरेरकर यांनी ज्या मोजक्या कवींना नाट्यपदलेखनासाठी प्रवृत्त केले, त्यात बढे यांचे नाव अग्रक्रमाने समाविष्ट होते. ‘शहाणी माणसं’, ‘महाराणी पद्मिनी’, ‘धाडिला राम तिने का वनी’, या नाटकांसाठी त्यांनी पदरचना केल्या. आजही त्यांची नाट्यपदे लोकप्रिय आहेत.
राजा बढे यांनी आकाशवाणी केंद्रात संगीत विभागात १९५६ ते १९६२ या काळात काम केले. आकाशवाणीतल्या सात वर्षांत त्यांनी केलेली अजोड कामगिरी म्हणजे कृष्णाबाई मोटे यांच्यासमवेत आकाशवाणीसाठी केलेली नटसम्राट बालगंधर्व यांच्या नाट्यगीतांची ध्वनिमुद्रणे. अनेक अडचणींवर मात करून ही ध्वनिमुद्रणे पार पाडण्यात आली. त्यांनी ११ श्रुतिका आणि १२ सांगीतिकाही लिहिल्या. आकाशवाणीवरून १९४१ सालच्या सुमारास ध्वनिक्षेपित झालेली ‘वसंतोत्सव’ ही पहिलीच सांगीतिका राजा बढे यांचीच. १९५६ ते ६२ या काळात बढेंनी आकाशवाणीसाठी शेकडो भावगीते लिहिली. बढेंच्या काळात लता मंगेशकर, आशा भोसले, तलत मेहमूद, सी. रामचंद्र, सुधीर फडके या प्रख्यात कलावंतांनी तुटपुंज्या मानधनाकडे न पाहता आकाशवाणीसाठी वेळ दिला.
पुढच्या काळात बढेंनी सरिता चित्र नावाची संस्था सुरू केली आणि राज्य सरकार, महानगरपालिका यांच्यासाठी छोटेछोटे माहितीपट तयार केले. स्वानंद चित्र ही त्यांनी बंधू बबनराव यांच्या सहकार्याने स्थापन केलेली दुसरी संस्था. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी ‘रायगडचा राजबंदी’ हा ऐतिहासिक चित्रपट काढला. वेगवेगळी कार्यक्षेत्रे आपलीशी करणाऱ्या बहुआयामी बढे यांच्यावर स्वातंत्रवीर सावरकर, पु.भा.भावे यांचा अत्यंत प्रभाव होता. साहित्यक्षेत्राव्यतिरिक्त अनेक चळवळींमध्ये सक्रिय असणाऱ्या बढे यांनी लिहिलेले आणि शाहीर साबळे यांनी गायलेले म्हणून ‘जयजय महाराष्ट्र माझा’ हे महराष्ट्र गीत म्हणून अजरामर झाले. या गीताने बढे यांचा लौकिक महाराष्ट्रबाहेरही पोहोचला.