Skip to main content
x

बेडेकर, वासुदेव नारायण

     डॉ. वासुदेव नारायण बेडेकर स्त्री रोग तज्ज्ञ होते. पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय व मुंबईच्या वाडिया महाविद्यालयामध्ये त्यांचे शिक्षण झाले. डॉक्टरांनी १९५५ मध्ये ठाण्यातील विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्षस्थान स्वीकारले आणि १९५७ मध्ये डॉ. बेडेकर विद्यामंदिराची स्थापना करून माध्यमिक शिक्षणाची सोय केली. वस्ती वाढू लागली आणि उच्च शिक्षणाची गरजही तीव्रतेने भासू लागल्याने डॉक्टरांनीं कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (१९६९), विधी महाविद्यालय (१९७२) स्थापन केले. पुढच्याच वर्षी औद्योगिक व्यवस्थापन सुरू केले. इंग्रजी माध्यमाची शाळा (१९७६) स्थापन करून १९८३ मध्ये तंत्रनिकेतन, १९९९ मध्ये व्यवस्थापन पदवी अभ्यासक्रम (बी. एम. एस) आणि २००० मध्ये ग्रंथालय व माहितीशास्त्र पदवी अभ्यासक्रम (बी. लिब.) अशी ज्ञानाची दालने उघडून विद्याप्रसाराचे कार्य केले.

     ठाण्यातील या शिक्षण संस्थातून १३ हजारहून अधिक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय डॉ. बेडेकरांनी केली. भारत सहकारी बँकेच्या मुख्य शाखेनंतर, ठाणे पूर्व, पोखरण, चंदनवाडी येथे शाखा काढल्या. अलीकडेच मुलुंड व घाटकोपर येथेही या बँकेच्या शाखांची स्थापना केली.

     डॉ. शाहू रसाळांच्या ‘सहयोग फाऊंडेशन’ ने डॉ. बेडेकरांचा ‘रुग्णमित्र’ म्हणून गौरव केला. ‘स्वार्थ जाळूनी कृतार्थ’ अशा शब्दात डॉ. बेडेकरांच्या कार्याचे वर्णन माजी शिक्षणमंत्री सुधीर जोशी यांनी केले. आपल्या जुन्या नव्या सहकाऱ्यांविषयी आणि संस्थांच्या प्राचार्यांविषयी डॉक्टर कृतज्ञता व्यक्त करतात.

     डॉक्टरांच्या वयाच्या ८० व्या वर्षी डॉ. शुभा चिटणीसांनी ‘स्मृतिलहरी’ नावाचे त्यांचे आत्मचरित्र शब्दांकित केले.

- वि. ग. जोशी

संदर्भ
१.      चिटणीस  डॉ. शुभा ;  ‘यशवंत’; परचुरे प्रकाशन गिरगाव, मुंबई ; १० एप्रिल २००५.
बेडेकर, वासुदेव नारायण