Skip to main content
x

बहुलकर, श्रीकांत शंकर

     पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील बहुळ या खेड्यात यांचा जन्म झाला. तेथील प्राथमिक शिक्षणानंतर पुणे शहरात माध्यमिक शिक्षण झाले. संस्कृत विषय घेऊन स.प.महाविद्यालयातून बी.ए. उत्तीर्ण होऊन नंतर पुणे विद्यापीठातून वेद विषयात एम. ए. तसेच अथर्ववेदातील भैषज्य या विषयावर पीएच.डी.ची पदवी त्यांनी संपादन केली. रा. ना. दांडेकर, चिं. ग. काशीकर, शि. द. जोशी, ग. बा. पळसुले, पु. द. नवाथे इत्यादी ख्यातनाम विद्वानांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्येही त्यांनी अध्ययन केले. तिथे पं. वामनशास्त्री भागवत यांच्या कार्याचा मोठा प्रभाव त्यांच्यावर पडला. जपान देशातील नागोया विद्यापीठात संशोधन आणि अध्यापन यांकरीता १९७८-७९मध्ये त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. तेथून परत आल्यानंतर डेक्कन महाविद्यालयातील संस्कृत कोश प्रकल्पामध्ये त्यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.

     १९८१मध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या श्रीबालमुकुंद संस्कृत महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि या विभागाचे प्रमुख तसेच प्राध्यापक म्हणून २००९पर्यंत ते कार्यरत होते. सारनाथ (जि. वाराणसी, उत्तर प्रदेश) येथील केंद्रीय उच्च तिब्बती अध्ययन विश्वविद्यालयातील ‘दुर्लभ बौद्ध ग्रंथ संशोधन प्रकल्प’ याचे संचालक आणि मुख्य संपादक म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. प्राच्यविद्येच्या क्षेत्रातील अनेक संस्थांशी त्यांचा घनिष्ठ परिचय असून अनेक संस्थांच्या अधिकार मंडळावर त्यांनी काम केलेले आहे. बृहन्महाराष्ट्र प्राच्यविद्या परिषदेचे संस्थापक सचिव म्हणून काम पाहिले .

     जपान, कॅनडा, डेन्मार्क, जर्मनी, द नेदरलँडस, रोमानिया, फिनलँड, रशिया, अमेरिका इत्यादी देशांमध्ये व्याख्याने, परिषदा यांकरीता त्यांचा प्रवास झालेला आहे. आजवर कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठ, जर्मनीतील फ्राय विद्यापीठ, तसेच हार्वर्ड विद्यापीठ या ठिकाणी त्यांना अध्यापनाकरता पाचारण करण्यात आले आहे. संस्कृतचे ‘राष्ट्रीय अधिव्याख्याता’ म्हणून भारत सरकारने त्यांना १९८६-८७मध्ये सन्मानपूर्वक नियुक्त केले होते. एकूण ११ विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी.ची पदवी संपादन केली आहे. बहुलकर यांचा प्रबंध ‘मेडिकल रिच्युअल इन द अथर्ववेद ट्रॅडिशन’ या नावाने प्रकाशित झालेला असून त्या विषयावर त्यांनी पुढेही मोठे संशोधन केले आहे. अथर्ववेदीय कौशिकसूत्राच्या कौशिक पद्धति या ग्रंथाचे ते एक संपादक होते. पवित्रेष्टि या यज्ञाची माहिती सांगणाऱ्या ‘इंडियन फायर रिच्युअल’ या ग्रंथाचे ते सहलेखक आहेत.

     अथर्ववेद आणि आयुर्वेद यांच्या तौलनिक अभ्यासाच्या क्षेत्रात त्यांचे काम जागतिक ख्यातीचे आहे. डेन्मार्क शासनाच्या अर्थसाहाय्याने ध्वनिमुद्रणाच्या माध्यमातून वेदांचे जतन करण्याच्या कामी पुढाकार घेऊन त्यांनी ते ध्वनिमुद्रण वेदशास्त्रोत्तेजक सभा या संस्थेकडे सुपुर्द केले. आहारशास्त्र हा त्यांच्या अभ्यासाचा विषय असून या विषयाची संशोधन-सूची त्यांनी संपादित केली आहे. याचबरोबर विविध विषयांवरचे सुमारे सत्तर शोधनिबंध त्यांच्या नावावर जमा आहेत. बौद्धविद्या विशेषत: तिबेटी बौद्ध परंपरा हा विषय प्राच्यविद्येच्या मोजक्याच भारतीय अभ्यासकांनी हाताळलेला आहे. १९७७-७८मध्ये जपानमध्ये असताना बहुलकर यांनी तिबेटी भाषेचा अभ्यास केला. तेथील प्राध्यापक ताचिकावा तसेच पुण्यातील वि.वि. गोखले यांच्याबरोबर त्यांनी तिबेटी ग्रंथांचे अध्ययन केले.

     १९८५मध्ये त्यांनी भावविवेकाच्या ‘मध्यमक-हृदय-तर्क-ज्वाला’ या ग्रंथाच्या पहिल्या प्रकरणाचे अनुवादासहित संपादन करण्याच्या कामी त्यांनी डॉ. वा. वि. गोखले यांना साहाय्य केले. ‘गुह्यसमाज-तंत्र’ या महत्त्वाच्या तंत्रग्रंथावरील चंद्रकीर्तीची ‘प्रदीपोद्योतन’ नामक टीका संपादित करण्याचा प्रकल्प त्यांनी हाती घेतला. कालचक्रतंत्र या ग्रंथाची विमलप्रभा ही संस्कृत टीका प्रकाशित करण्याच्या सारनाथ येथील उच्च तिब्बती अध्ययन संस्थेच्या उपक्रमाचे ते अध्वर्यू होते. तसेच त्या संस्थेच्या ‘धी:’ या संशोधन-नियतकालिकाचे संपादकही होते. बौद्ध स्तोत्रसाहित्याचाही त्यांचा मोठा अभ्यास आहे. ‘श्रद्धा-त्रय-प्रकाशन’ या नावाचे त्यांचे संस्कृत काव्य खुद्द दलाई लामा यांच्याकडून वाखाणले गेले आहे.

     बहुलकर हे एक श्रेष्ठ दर्जाचे कवी असून आजवर त्यांनी सुमारे १५ रचना केल्या आहेत. संस्कृतातील गद्य आणि पद्य या दोन्ही काव्यप्रकारांवर त्यांची चांगली हुकमत आहे. अभिजातता, व्याकरणशुद्धता, लयबद्धता आणि वृत्तबद्धता, सोपेपणा आणि प्रासंगिक तसाच शाब्दिक सूक्ष्म विनोद ही त्यांच्या लेखनाची (आणि भाषण-संभाषणाचीही) वैशिष्ट्ये म्हणून सांगता येतील. ‘मुलगी झाली हो’ या पथनाट्याचे ‘अर्थो हि कन्या’ या नावाने त्यांनी केलेले भाषांतर अतिशय गाजले होते.

     पुणे विद्यापीठातील पाली आणि बौद्धविद्या अध्ययन विभागात अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम पाहिले. साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांना त्यांच्या साहित्यातील कामाबद्दल प्राप्त झाला. याखेरीज २०२१ मध्ये ऑक्सफर्ड सेंटर फॉर हिंदू स्टडीजतर्फे फेलो होण्याचा बहुमान त्यांना प्राप्त झाला तसेच डॉ.रा.चिं.ढेरे संस्कृती संशोधन केंद्रातर्फे ग.मा.माजगावकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

डॉ. श्रीनंद बापट

बहुलकर, श्रीकांत शंकर