Skip to main content
x

चितळे, दत्तात्रेय दिवाकर

मामासाहेब चितळे

     दत्तात्रेय दिवाकर ऊर्फ मामासाहेब चितळे यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील लिंब-गोवा या गावी एका सामान्य कुटुंबात झाला. घरातील प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना केवळ मॅट्रिकपर्यंतच शिक्षण घेता आले. नंतर त्यांनी 1913 मध्ये टपाल खात्यात हंगामी नोकरी केली. त्यानंतर त्यांनी शिक्षण खात्यात कारकुनाची नोकरी पत्करली. परंतु या दोन्ही नोकर्‍यांमध्ये त्यांचा जीव रमला नाही. चितळे यांचा शिक्षण खात्यातील त्यांचे वरिष्ठ गणपत साने यांच्याशी चांगला संबंध होता आणि त्यांच्यामुळे मामासाहेबांचा कॉसमॉस सोसायटीशी परिचय झाला आणि त्यांची 1918 मध्ये संस्थेच्या सचिवपदी नेमणूक झाली. त्यांनी सरकारी नोकरी सांभाळून हे काम विनावेतन केले. त्यांनी सरकारी कायदे, नियम व अटी यांचा सूक्ष्म अभ्यास करून संस्थेच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

     कॉसमॉस सोसायटीच्या कार्यकर्त्यांनी 1917 मध्ये पुणे सेंट्रल को-ऑप. बँकेची स्थापना केली. मामासाहेब चितळे यांनी 1921 पासून या बँकेच्या कारभारातही लक्ष घातले. तेथेही त्यांनी 5-6 वर्षे विनावेतन काम केले. त्यांची 1933 मध्ये बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी निवड झाली. या पदावर त्यांनी सलग 16 वर्षे काम केले.

     चितळे 1949 मध्ये निवृत्त झाले. परंतु त्यानंतर ते दोन वर्षे बँकेचे सल्लागार म्हणून कार्यरत होते. पुणे मर्चंटस् को-ऑप. बँक, पुणे जिल्हा लँडमौबोज बँक, पुणे पीपल्स को. ऑप बँक, पूना रिटेलर्स (गुडस् सप्लाय) को. सोसायटी, पुणे मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडार, सिव्हिल इंजिनिअर्स को-ऑप असोसिएशन, मॉडेल को. हौसिंग सोसायटी, लाँग लाईफ को. हौसिंग सोसायटी, पुणे जिल्हा खरेदी-विक्री संघ इत्यादी संघांची स्थापना करण्यात मामासाहेब यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

     मामासाहेब चितळे यांना मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व बँक ऑफ महाराष्ट्राच्या प्राथमिक सभासदत्वही मिळाले होते. सहकाराचा प्रचार करण्यासाठी व सहकारचे शिक्षण देण्यासाठी निघालेल्या महाराष्ट्र सहकारी संस्थेचे सचिव म्हणून ते कार्यरत होते. त्यांनी 1926 मध्ये पर्यवेक्षक व बँक अधिक्षकांसाठी पहिला शिक्षण वर्ग घेतला. ते 1961-62 पर्यंत या शिक्षणकार्यात मग्न होते. प्रा.वा.गो.काळे यांच्या अध्यक्षतेखाली 1937 मध्ये सहकारी चळवळींचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या त्रिसदस्य समितीतील एक सदस्य म्हणून मामासाहेब चितळे यांचा समावेश होता.

     चितळे 1951 मध्ये पुणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सेवेतून निवृत्त झाले. त्यांचा ज्ञानाचा उपयोग राज्यातील सहकारी चळवळींना व्हावा म्हणून त्यांना वैकुंठभाई मेहता आणि चिन्मुळगुंद यांनी आमंत्रित केले. तसेच ते महाराष्ट्रीय मंडळ, शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थांचेही सभासद होते. पुणे नगर वाचन मंदिर व जॉली क्लब या संस्थांवरही ते पदाधिकारी म्हणून कार्यरत होते.

- संपादित

चितळे, दत्तात्रेय दिवाकर