Skip to main content
x

देगलूरकर, गोरक्ष बंडामहाराज

     दगड-धोंड्याच्या महाराष्ट्रामध्ये कलाकारांनी वेरूळ-अजिंठासारख्या लेणी व अंबरनाथ-खिद्रापूर येथे उभारलेल्या मंदिर स्थापत्यासारख्या अनेक कलाकृती निर्माण केल्या. मध्ययुगीन कालखंडात परकीय आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेला हा ठेवा यथायोग्य रितीने अभ्यासणाऱ्या संशोधकांमध्ये डॉ. गोरक्ष बंडामहाराज देगलूरकर यांचे नाव अग्रभागी असलेले दिसते. मराठवाड्यातील हिप्परगा, ता. लोहारा, जि. लातूर येथे जन्म झालेल्या डॉ. देगलूरकरांच्या जीवनात भक्ती आणि ज्ञान यांचा परस्पर मेळ झालेला दिसतो. पैतृक घराण्यातून वारकरी म्हणजेच भागवत भक्तीचा मिळालेला वारसा तसेच मातुल घराणे म्हणजेच पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी एक असलेल्या सखारामपंत बोकिलांच्या घराण्यातून मिळालेल्या ज्ञानाचा वारसा यांद्वारे त्यांचे व्यक्तिमत्त्व फुललेले दिसते.

     प्रारंभिक शिक्षण हैदराबाद येथे झाल्यावर उच्च शिक्षणासाठी ते पुण्यात स.प.महाविद्यालयात दाखल झाले. इतिहासातील पदव्युत्तर शिक्षण त्यांनी हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठातून (सन १९५९) घेतल्यानंतर पुणेस्थित डेक्कन महाविद्यालयामधून ‘मराठवाड्याचा सांस्कृतिक इतिहास’ या विषयात त्यांनी पीएचडी. पूर्ण केली. मराठवाड्याच्या इतिहासाबरोबरच तिथल्या मूर्तींचा, मंदिरांचा, प्राचीन ग्रंथांचा आणि शिलालेखांचा अभ्यास करून मराठवाड्याची संस्कृती म्हणजेच प्राचीन महाराष्ट्राची संस्कृती होय, हा सिद्धान्त त्यांनी मांडला.

     १९५९ पासून १९६८पर्यंत त्यांनी औरंगाबाद येथील शासकीय महाविद्यालयात तर, १९६८पासून १९८० पर्यंत नागपूर विद्यापीठातील ‘प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व’ या विभागात अधिव्याख्याता म्हणून काम केले. डॉ. शां.भा. देव हे त्यांचे पीएच.डी.चे मार्गदर्शक तर होतेच, परंतु नागपूर विद्यापीठात तर ते त्यांच्या विभागाचे प्रमुखच होते. त्यांच्याच सल्ल्याने त्यांनी मूर्तिशास्त्र आणि मंदिरस्थापत्य या विषयांत अध्यापनाचे कार्य सुरू केले. कालांतराने हेच दोन विषय त्यांच्या जीवनाचे अविभाज्य घटकच बनले. याच ध्यासातून त्यांचा ‘Temple Architecture and Sculptures of Maharashtra’ हा बृहद्ग्रंथ निर्माण झाला. भारतातील इतर प्रांतांतील मंदिरांचा आणि शिल्पांचा अभ्यास करून अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले. परंतु महाराष्ट्रातील विद्वानांचे या विषयाकडे फारसे लक्ष गेले नव्हते. या ग्रंथाने ही उणीव भरून निघाली. अभ्यासकांमध्ये हा ग्रंथ मान्यता पावलाच परंतु विद्यापीठानेही या ग्रंथावर विद्वत्तेची मोहर उमटवून   डॉ. देगलूरकरांना ‘डी.लिट.’ प्रदान केली. प्राचीन भारतीय इतिहास व पुरातत्त्व या विषयात डी.लिट. मिळविणारे ते महाराष्ट्रातील पहिले अभ्यासक ठरले. याच काळात त्यांनी मराठवाड्यातील बुलढाणा जिल्ह्यातील सातगाव येथील मंदिरावरही ‘Medieval Temple of Satgaon’ नावाचा ग्रंथ लिहिला.

     १९८०च्या सुमारास त्यांच्या अध्यापकीय जीवनात बदल घडला व ते पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या डेक्कन महाविद्यालयामध्ये प्रपाठक म्हणून रुजू झाले. सन १९९३ साली निवृत्त होईपर्यंत ते तिथे कार्यरत होते. या काळात त्यांनी महाराष्ट्राच्या  धार्मिक जीवनात अधिराज्य गाजविणार्‍या श्रीविठ्ठलाच्या अभ्यासाकडे लक्ष दिले. स्वत:च्या घराण्यात पिढ्यान्पिढ्या चालत आलेली विठ्ठल उपासना व भारतीय मूर्तिशास्त्र या विषयात प्रावीण्य संपादन केलेल्या डॉ. देगलूरकरांचे लक्ष महाराष्ट्राच्या समाज जीवनावर प्रभाव असलेल्या विठ्ठलाकडे गेले नसते तरच नवल! याला नैमित्तिक कारण घडले ते म्हणजे डेक्कन महाविद्यालयाने प्रसिद्ध केलेला, फ्रेंच संशोधक फादर दलरी यांचा ‘Cult of Vithoba’ हा ग्रंथ. याच ग्रंथाचा आधार घेऊन अभ्यासकांनी वीरगळाचा विठ्ठल झाला अशी संकल्पना मांडली. ही संकल्पना योग्य असेल, तर ती मूर्तिशास्त्राच्या आधारे सिद्ध व्हायला हवी.

     डॉ. देगलूरकरांनी संशोधनांती असे अनुमान काढले की, पंढरपूर येथील विठ्ठलमूर्ती ही योगस्थानक मूर्ती आहे. योग, भोग, वीर आणि अभिचारक हे मूर्तीचे चार प्रकार असतात. ऐहिक समृद्धी प्राप्त करून देणारी तिरूपती बालाजीची मूर्ती भोगस्थानक, मारुती किंवा महिषासुरमर्दिनीची मूर्ती ही वीरमूर्ती, दोन हाताच्या विठ्ठलाच्या एका हातात शंख तर दुसर्‍या हातात कमळ आहे. गदा व चक्र ही शस्त्रे त्याच्या हातात नाहीत कारण तो योगी आहे. डॉ. देगलूरकरांनी मूर्तिशास्त्राच्या आधारे विठ्ठलाची मूर्ती ही योगस्थानक आहे, असे प्रतिपादन करताना संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या ‘ऐसा हा योगीराजू, तो विठ्ठल मज उजु’ या अभंगाचा दाखला देऊन संत मंडळीही विठ्ठलाला योगी समजत असत असे दाखवून दिले. (Deglurkar G.B.1990 Iconography of Shri Vitthala: A Reappraisal,Bulletin of the Deccan College Post-Graduate and Research Institute, Vol 49,PP 113-116)

      डेक्कन महाविद्यालयामध्ये डॉ.देगलूरकरांच्या अभ्यासाला आणखी एक आयाम लाभला तो म्हणजे उत्खननशास्त्राचा. खरे म्हणजे नागपूर विद्यापीठामध्ये असतानाच त्यांनी भोकरदन, मांढळ, माहूरझरी आदी ठिकाणच्या उत्खननांत भाग घेतला होता. त्यांमध्ये सापडलेल्या काही वस्तूंचा तसेच मूर्तींचा अभ्यासही त्यांनी केला. त्यामध्ये भोकरदन येथे सापडलेल्या हस्तिदंती स्त्री प्रतिमेचा, तसेच मांढळ येथे सापडलेल्या वाकाटक कालीन अष्टमूर्ती शिव व सर्वपार्श्वमुख शिव या दोन शिवमूर्तींचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. डेक्कन महाविद्यालयामध्ये मात्र त्यांनी रायपूर व भागीमहारी या विदर्भातील बृहदाश्मयुगीन स्थळांचे उत्खनन केले. त्यातूनच त्यांचा ‘’ हा ग्रंथ तयार झाला. या ग्रंथलेखनाच्या अनुषंगाने पुढे त्यांना इंग्लंडमधील ब्रिटिश म्युझिअममधील वस्तूंचा अभ्यास करण्याची संधी मिळाली.

     १९९३ मध्ये डेक्कन महाविद्यालयामधून निवृत्त होताना, जीवनभर अभ्यास केलेल्या मूर्तिशास्त्र आणि मंदिरस्थापत्य या विषयांवर आपली मते प्रतिपादन करताना त्यांनी बिंबब्रह्म आणि वास्तुब्रह्म या दोन अभिनव संकल्पना मांडल्या. टी. गोपिनाथराव यांचे ‘Elements of Hindu Iconography’, जे.एन. बॅनर्जी यांचे ‘The Development of Hindu Iconography’ यांच्यानंतरचा मूर्तिशास्त्रातील पुढचा टप्पा म्हणजे ‘’ हा विषय देगलूरकरांनी पहिल्यांदाच मुंबई विद्यापीठातील ‘कर्णिक व्याख्यानमालेत’ प्रतिपादन केला. ज्या वास्तूत गेल्यावर ब्रह्माचे आकलन होते, ती वास्तू म्हणजे वास्तुब्रह्म. परिपूर्ण मंदिरांची वास्तुरचनाच अशी असते की ती सर्वांना ‘अहं ब्रह्मास्मि’पर्यंतचा प्रवास करायला लावते आणि चरम प्रकारची म्हणजे उन्नत अवस्थेतील मूर्ती म्हणजे बिंबब्रह्म. बिंब म्हणजे मूर्ती, ब्रह्माचे आकलन ज्या मूर्तीमुळे होते, अशी मूर्ती. चर्यापाद, क्रियापाद, योगपाद आणि ज्ञानपाद या चार पायांवर उभ्या असणाऱ्या शैवसिद्धान्ताला मूर्तिरूपात दाखवताना शिल्पकारांनी पाद या शब्दाचा श्लेष करून दोन पाय सोडलेले व दोन पाय पद्मासनात असलेले अशी ‘विलक्षण सदाशिवाची’ मूर्ती तयार केली. चार प्रमेयांवर शैवसिद्धान्त आहे, हे सांगणारी ती मूर्ती आहे. अशा मूर्तीचे दर्शन घेताना शैवसिद्धान्त आठवतो आणि त्याचे अनुकरण करण्याची प्रेरणा मिळते. अशा मूर्तींना बिंबब्रह्म म्हणतात. अर्धनारीश्वराची मूर्तीही अशाच स्वरूपाची आहे. ती प्रकृति-पुरुषाची मूर्ती होय. प्रकृती म्हणजे निसर्ग आणि पुरुष म्हणजे चैतन्य. निसर्ग आणि चैतन्य यांच्यामुळे चराचरांची निर्मिती झाल्याचे दिसते. अर्धनारीश्वराची मूर्तीही तशीच मूर्ती आहे. यालाच काही जण अद्वैत तत्त्वज्ञानाची मूर्ती म्हणतात. अशा प्रकारच्या मूर्तींतून एखादे तत्त्वज्ञान समूर्त केले जाते. अशा मूर्तींना मूर्तिशास्त्राचा अंतिम टप्पा मानतात. आधी मूर्ती घडवल्या त्या अनेक कारणांनी, अनेक अवस्थांच्या. त्यानंतर मूर्तीत तत्त्वज्ञान आणले गेले. याहून आता पुढचा टप्पा असणार नाही.

     यानंतर त्यांना १९९३-१९९६ या कालखंडासाठी के.के. बिर्ला फेलोशिप मिळाली. यातूनच त्यांचा इंग्रजीतील ’Potrayal of the Woman’ हा ग्रंथ तयार झाला. स्त्री-जीवनावरच्या या पुस्तकामध्ये स्त्रियांचे वैयक्तिक आयुष्य, भाव-भावना आणि त्यांची विविध प्रकारची कार्ये हे सर्व शिल्पातून आणि चित्रातून जे दृगोच्चर झाले; त्यावर आधारलेला हा ग्रंथ होता.

     यानंतरचा डॉ. देगलूरकरांचा महत्त्वपूर्ण ग्रंथ म्हणजे ‘सुरसुंदरी’. विविध विभ्रमातील स्त्रियांची म्हणजे अप्सरांची, सुरसुंदरींची शिल्पे देवळाच्या बाहेरच्या भिंतींवर असतात. लोकांना देवळापर्यंत आणायचं काम त्या सुरसुंदरी करतात, असा समज असावा. खरे तर त्यांचे प्रयोजन वेगळे आहे म्हणून हा ग्रंथ लिहिण्यास ते प्रवृत्त झाले. देवाकडे वा गुरूकडे जाताना रिक्तहस्ते जायचे नाही, अर्पण करण्यासाठी पत्र, पुष्प, फल, तोय यांपैकी काहीतरी घेऊन जायला पाहिजे अशी आपल्याकडे धारणा आहे. मंदिराच्या बाहेरील अंगावर अशा सुरसुंदरी आहेत. पुष्प घेतलेली पद्मगंधा, पाण्याच्या कुंभासह जया, झाडाचे पान वाहून घेणारी दालमालिका अशा काही सुरसुंदरी मंदिराच्या बाह्यांगावर दाखवतात. याबरोबरच नृत्य करणाऱ्या व वाद्य वाजविणाऱ्या सुरसुंदरीही असतात. देवाची पूजा रंगभोग स्वरूपाने करायची असे त्या सुचवितात. देवळात जाताना तुम्ही कसे गेले पाहिजे, हे त्या सुरसुंदरी दाखवत असतात.

     डॉ. देगलूरकरांनी महाराष्ट्राला शिल्पकलेचे, मूर्तिकलेचे रसग्रहण करायला शिकवले- मग ते वेरूळच्या कैलास लेणीतील रावणानुग्रहाचे शिल्प असेल, की त्याच्या उत्तर-दक्षिण बाजूवर कोरलेले महाभारत-रामायणातील प्रसंग असोत, घारापुरी येथील प्रसिद्ध त्रिमूर्ती अथवा महासदाशिवाची मूर्ती असो की कल्याणसुंदर शिल्पपटाचे रसग्रहण असो, मार्कंडी औंढ्यानागनाथ, अन्वा येथील मंदिर स्थापत्य व त्याचबरोबर मूर्तिशिल्पाचे रसग्रहण असो. हे शब्द आपल्या सिद्धहस्त लेखणीने बद्ध करत त्यांनी ‘विष्णुमूर्ते नमस्तुभ्यम’, ‘वेरूळ दर्शन’, ‘घारापुरी दर्शन’, ‘मार्कंडी मंदिरे’, ‘दुर्गम दुर्ग देवगिरी’ आदी ग्रंथ लिहिले व हा विषय जनसामान्यांपर्यंत कसा पोेहचेल याकडे आस्थेने लक्ष दिले.

     ‘संपादक देगलूरकर’ हे डॉ. गो.बं. देगलूरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणखी एक वैशिष्ट्य होय. भारतीय इतिहास संकलन समितीने महाराष्ट्रातील शहरांवर विशेष अशी चर्चासत्रे घेतली. त्यांमध्ये नाशिक, पैठण, कोल्हापूर आदी शहरांवरील चर्चासत्रे उल्लेखनीय ठरली. या ठिकाणी वाचल्या गेलेल्या निबंधांचे संपादन करून त्यांनी या शहरांचे विविधांगी स्वरूप ग्रंथरूपाने अभ्यासकांसमोर मांडले.

     सेतूमाधवराव पगडी हे महाराष्ट्रातील अग्रगण्य इतिहास अभ्यासक होत. त्यांच्या इंग्रजी ग्रंथांचे व लेखांचे संपादनही त्यांनी केलेले आहे. त्यांनी प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती या विषयांवर लिहिलेले पुस्तक, अभ्यासक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहे. डी.एन. झा लिखित ‘Revenue System in Post Maurya and Gupta Times’ याचा त्यांनी अनुवादित केलेला ‘मौर्यत्तर आणि गुप्तकालीन राजस्वपद्धती’ हा ग्रंथही महत्त्वाचा आहे.

    डॉ. देगलूरकरांच्या अभ्यासाच्या विषयांमध्ये विविधता आढळून येते. त्यामध्ये प्राचीन भारतीय इतिहास, प्रामुख्याने महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास, महाराष्ट्रातील किल्ले, मंदिरे तेथपासून ते छत्रपती शिवराय इथपर्यंतचे विषय दिसून येतात. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भाग घेऊन आपले शोधनिबंध त्यांनी सादर केले आहेत.

    त्यांच्या मार्गदर्शनाखाली सात विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी मिळविली आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेले दिसतात. त्यामध्ये ‘जिजामाता विद्वतगौरव पुरस्कार’, ‘श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक व आध्यात्मिक पुरस्कार’, ‘न.र. फाटक पुरस्कार’, ‘स्नेहांजली पुरस्कार’ हे उदाहरणादाखल सांगता येतील. त्यांच्या या सर्व कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने त्यांना सन २०१३ साली सन्माननीय ‘डी.लिट.’ पदवी बहाल केली. सन २००६ ते २०१६पर्यंत  डेक्कन महाविद्यालय अभिमत विद्यापीठाचे ‘कुलपती’ म्हणून त्यांनी काम पाहिले. विदर्भ संशोधन मंडळ, नागपूर या संस्थेचे कार्यवाह, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचे कार्यवाह, राजा केळकर संग्रहालयाचे सल्लागार, महाराष्ट्र दार्शनिका विभागाचे सल्लागार, मार्गदर्शक अशा विविध स्वरूपांत अनेक संस्थांमध्येही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला . २०१९ मध्ये कंबोडियाच्या अंकोरवाट इथे झालेल्या अखिल विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. 

डॉ. गिरीश मांडके

देगलूरकर, गोरक्ष बंडामहाराज