Skip to main content
x

देशपांडे, प्रल्हाद नरहर

     ‘याआपल्या थोर देशात साहाय्यांची व सहानुभूतीची कमतरता नाही कमतरता योग्य काम योग्य सामर्थ्याने वठविणार्‍या कर्तबगार कामकर्‍यांचीच आहे.’’ इतिहासचार्य वि. का. राजवाडे यांच्या या विधानाचे साहाय्य घेत डॉ. अ. रा. कुलकर्णी यांनी डॉ. प्रल्हाद नरहर देशपांडे यांच्या इतिहासविषयक कामगिरीची समीक्षा करताना त्यांचा उल्लेख ‘एक कर्तबगार कामकरी’ या शब्दांत केलेला आहे.

     प्र.न. देशपांडे यांचा जन्म पंढरपूर येथे झाला. आपले पदवी व पदव्युत्तर शिक्षण औरंगाबाद येथे पूर्ण करून तेथेच ते केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभागात सर्वेक्षक (सर्व्हेअर) म्हणून रुजू झाले. या नोकरीच्या निमित्ताने त्यांनी देवगिरी (दौलताबाद) या किल्ल्याचे सर्वेक्षण केले. ऐतिहासिक दृष्टिकोनातून किल्ल्यांचा अभ्यास कसा करावा, याचा वस्तुपाठच त्यांना या कामातून मिळाला. पुढे यासंबंधीच्याच विषयात पुढे जात ‘महाराष्ट्रातील किल्ले’ या विषयावर डॉ. अ. रा. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे विद्यापीठात त्यांनी पीएच.डी. पदवी मिळविली. सन १९६६ मध्ये धुळ्यास विद्यावर्धिनी महाविद्यालयात इतिहास विषयाचे व्याख्याते म्हणून ते रुजू झाले. महाविद्यालयात अध्यापन करीत करतानाच ते राजवाडे शिष्य भास्कर वामन भट स्थापित इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळाशी निगडित झाले. भट घराण्यातील कर्तबगार मंडळींचा वारसा लाभलेल्या राजवाडे मंडळाच्या मुख्य चिटणीसपदी त्यांची नियुक्ती झाल्यानंतर मंडळातील इतिहास विषयक काम करणे, हेच त्यांनी आपले ध्येय ठेवले. मंडळातील ऐतिहासिक दस्ताऐवज तसेच इतर साम्रगी यांची जपणूक करणे, त्यात काळाच्या ओघात भर टाकणे, खानदेशामधील ऐतिहासिक तसेच पुरातात्त्विक सर्वेक्षण करणे, प्रसंगी ‘थाळनेर’सारख्या ठिकाणी उत्खनन करणे, मंडळात असलेल्या ऐतिहासिक सामग्रीकरता एक संग्रहालय उभे करणे, मंडळात येणाऱ्या संशोधकांना मदत तसेच मार्गदर्शन करणे; ही कामे त्यांनी अतिशय मनोभावे व निरपेक्षपणे केली.

     मंडळाचा संशोधन विभाग नेहमी कार्यरत राहावा यासाठी त्यांनी स्वत: प्रयत्न केले. छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे, १०९ कलमी बखर हे दोन ग्रंथ त्यांनी प्रस्तावनेसह संपादून प्रसिद्ध केले. राजगड, रायगड या छत्रपतींच्या दोन राजधान्यांवर स्वतंत्रपणे लिहिलेल्या पुस्तिका, महाराष्ट्र संस्कृती - जडणघडण, मराठ्यांचा उदय व उत्कर्ष हे क्रमिक पुस्तक तसेच अनेक इतिहास विषयक संशोधन लेख त्यांच्या नावावर आहेत. त्यांनी स.मा.गर्गे यांच्या मराठी रियासतीच्या पहिल्या खंडाच्या संपादन सहकार्यास हातभार लावला आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे’ या ग्रंथास अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहून त्यांनी शिवाजी महाराजांच्या सुमारे दोनशे पत्रांचे एकत्रीकरण केले व योग्य त्या ठिकाणी कठीण शब्दांचे अर्थ तसेच टीपा देऊन यथायोग्य संपादन केले आहे.

     या सर्वांपेक्षा त्यांनी संपादक म्हणून केलेले काम हे आगळेवेगळे आहे. ‘संशोधक’ हे राजवाडे मंडळाचे मुखपत्र होय. कै. भास्करराव भटांनी सुरू केलेल्या या त्रैमासिकाचे सुमारे २५ वर्षे त्यांनी संपादन केले. अनेक नवीन तरुणांना संशोधन करण्यास प्रवृत्त केले. राजवाडे संपादित ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ या दुर्मिळ झालेल्या मालिकेचे पुन:संपादन त्यांनी केले. त्यांच्या इतिहासविषयक कामगिरीत मैलाचा दगड ठरेल अशी ही गोष्ट आहे.

     डॉ. प्र.न. देशपांडे हे जसे उत्तम संशोधक होते, तसेच उत्तम संस्थापकही होते. ‘अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद’, ‘खानदेश इतिहास परिषद’ इत्यादी संस्थांच्या स्थापनेमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग होता. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कक्षेतील कागदपत्रे गोळा करणे, त्यांच्या आधारे शोधनिबंध लिहिणे, यासाठी खानदेशातील तरुण संशोधकांना त्यामुळे प्रेरणा मिळाली. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, तंजावर पेपर्स कमिटी, इंडियन हिस्टॉरिकल रेकॉर्ड कमिशन, नवी दिल्ली इत्यादी मंडळांवर त्यांची नियुक्ती झाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी मिळविली आहे.

      — डॉ. गिरीश मांडके

देशपांडे, प्रल्हाद नरहर