Skip to main content
x

देवधर, सखाराम कृष्ण

देवधर, बापूसाहेब

    गायत्रीचे थोर साक्षात्कारी उपासक आणि ज्ञानेश्वरीचे व्यासंगी अधिकारी, वेदमूर्ती सखाराम कृष्ण तथा बापूसाहेब देवधर यांचा जन्म फाल्गुन वद्य एकादशी (पापमोचनी एकादशी) च्या दिनी, किर्लोस्करवाडी येथे झाला. त्यांच्या आईचे नाव सरस्वतीबाई होते. हे अद्भुत बालक जन्मण्यापूर्वी सरस्वतीबाईंना पहाटे स्वप्नात एक साधुपुरुष दिसला आणि ‘मी तुझ्या पोटी जन्माला येतोय’ असे सांगून अदृश्य झाला होता. बारशाच्या दिवशी पहाटे तो सत्पुरुष पुन्हा स्वप्नात येऊन त्यांना म्हणाला, ‘‘सरस्वती! मला ओळखले का? मी सखाराम, बारसे करताना माझे नाव बदलू नको हं!’’ या स्वप्न दृष्टान्ताप्रमाणेच बालकाचे नाव ‘सखाराम’ ठेवण्यात आले.

देवधर घराणे मूळचे कोकणातील पालगडचे. नोकरीनिमित्त कृष्णराव देवधर पालगड-कोल्हापूर असे स्थलांतर करीत पुण्यात आले. पुण्यात देवधर कुटुंब मंडईतील ज्या वाड्यात भाड्याने राहत होते, त्याच्या शेजारीच ज्ञानेश्वरीचे अंतरंग उपासक व अधिकारी दादा म्हाळगी राहत असत. सखाराम यांची एकदा दादा म्हाळगींशी नजरानजर झाली आणि दोघांना एकमेकांची ओळख पटली. अवघ्या चौदाव्या वर्षी सखारामला दादा म्हाळगी यांनी अनुग्रह दिला व ज्ञानेश्वरीचा प्रसाद दिला.

मौजीबंधनात वडिलांकडून मिळालेला ‘गायत्री मंत्र’ आणि सद्गुरू दादा म्हाळगी यांच्याकडून मिळालेली ‘ज्ञानेश्वरी’ हेच बापूसाहेबांचे श्वास-उच्छवास झाले. पुढे त्यांनी २४ लक्ष जपाची अनेक गायत्री पुरश्चरणे केली. गायत्रीदेवीचे प्रत्यक्ष दर्शन झालेल्या साक्षात्कारी पुरुषांमध्ये त्यांची गणना होते. ‘गायत्री मंत्र आणि उपासना’, ‘ओंकार किमया’ हे त्यांचे ग्रंंथ गायत्री उपासकांचे गीता-भागवत समजले जातात.

ज्ञानेश्वरीबरोबरच सकल संतवाङ्मयाचा त्यांचा सूक्ष्म अभ्यास होता. तसेच वेद आणि उपनिषदे, वैदिक वाङ्मय, संस्कृत वाङ्मय, पुराणे हे त्यांच्या विशेष व्यासंगाचे विषय होते. प्रसाद प्रकाशनाच्या ‘आपले वेद आपली पुराणे’ या ग्रंथमालिकेचे ते एक मुख्य लेखक होते. गायत्री व ओंकाराची त्यांची उपासना सिद्धीस गेलेली होती. त्यांना १९५४ साली एका हिमालय निवासी साधूने ओंकार रहस्य समजावून सांगितले आणि विशेष ओंकार विद्या प्रदान केली. त्यांनी मुलांप्रमाणे मुलींच्या मुंजी करून त्यांना गायत्री उपासनेचा अधिकार दिला होता. त्यांनी अनेक ठिकाणी मुलींच्या मुंजींचे सामूहिक सोहळे घेतले होते.

बापूसाहेब देवधरांना ज्ञानेश्वरीच्या ९००० ओव्या तोंडपाठ होत्या. वेद-उपनिषद ग्रंथांपेक्षाही ‘ज्ञानेश्वरी’वर त्यांची दांडगी श्रद्धा व निष्ठा होती. ‘कथा ज्ञानेश्वरी’, ‘ज्ञानदेवीची गौरवगाथा’ या ग्रंथांशिवाय ज्ञानेश्वरीवर त्यांनी विपुल लिखाण केलेले आहे.

मध्यमवर्गीय नोकरदार कुटुंबात जन्म झाल्याने लहानपणापासूनच बापूंनी अनेक प्रकारची अंगमेहनतीची कामे करीत ‘कमवा-शिका’ असे आपले शिक्षण पूर्ण केले. प्राचार्य सोनोपंत दांडेकरांनी बापूंची महाविद्यालयीन परीक्षा फी भरली होती.

बापूसाहेब देवधरांंनी सिनेमा ऑपरेटर, कन्याशाळेत शिक्षक आणि अखेरीस महाराष्ट्र शासनाच्या सहकार खात्यात लेखनिक अशा अनेक नोकर्‍या केल्या. सहकार खात्यात बढती मिळवत ते उपनिबंधक झाले व एक गॅझेटेड ऑफिसर म्हणून निवृत्त झाले. नोकरीच्या काळात त्यांच्या अनेक ठिकाणी बदल्या झाल्या व त्या त्यांनी आनंदाने स्वीकारल्या आणि सर्व ठिकाणी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी जमवत आपली उपासना- आध्यात्मिक साधना सतत वृद्धिंगत केली.

त्यांनी आपला वेगळा संप्रदाय स्थापन केला नाही अथवा गादी किंवा मठही निर्माण केला नाही. अशा उपाधीपासून दूर राहण्याचा त्यांचा स्वभाव होता. त्यांची ग्रंथसंपदा आध्यात्मिक वाङ्मयातील एक समृद्ध दालन आहे. ‘स्वामी रामतीर्थ’, ‘चांगदेव’, ‘वीरमंगल’, ‘विसोबा खेचर’, ‘हैबतबाबा पवार’, ‘स्तोत्र परिमल’, ‘श्रीसूक्त’, ‘पुरुषसूक्त’, ‘रुद्रोपासना’, ‘श्री शिवपूजाविधान’, ‘सौरसूक्त’, ‘अंजनेय’, ‘आचार्यांचे गीताभाष्य’, ‘संत प्रल्हाद महाराज बडवे चरित्र’, ‘सौभाग्यव्रते’, ‘उमज’, ‘संस्कार महिमा’ या त्यांच्या पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या वाचकप्रिय ठरलेल्या आहेत. बापूसाहेब देवधर हे ४ जानेवारी १९९७ रोजी गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी दिवशी बेळगावहून पुण्यास एसटीने येण्यास निघाले होते; पण दुर्दैवाने कोल्हापूर बस स्थानकात बसमध्येच त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या शिष्य-परिवारातर्फे गायत्री हवनाचे सामूहिक सोहळे आजही साजरे होतात.

 - विद्याधर ताठे

देवधर, सखाराम कृष्ण