Skip to main content
x

डिसिल्व्हा, रॉबी जेम्स फ्रान्सिस

डिसिल्व्हा, रॉबी

          दृक्संवादकला क्षेत्रातील जाहिरातकला, बोधचिन्हे, पॅकेजिंग अशा विविध प्रकारांत काम करणारे संकल्पनकार आणि कलाशिक्षणतज्ज्ञ रॉबी जेम्स फ्रान्सिस डिसिल्व्हा यांचा जन्म वसई येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव फ्रान्सिस, तर आईचे नाव मार्था होते. घरची गरिबी होती. रॉबी दोन वर्षांचे असताना त्यांच्या आईचे व ते तेरा-चौदा वर्षांचे असताना वडिलांचेही निधन झाले. त्यामुळे सावत्र आई व पाच भावंडांचा सांभाळ करत रॉबी डिसिल्व्हा यांना कष्टपूर्वक आणि जिद्दीने शिक्षण पूर्ण करावे लागले. ते १९४८ साली मॅट्रिक झाल्यावर शिधावाटप कार्यालयामध्ये नोकरीला लागले. सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट संस्थेमध्ये त्यांनी १९५१ मध्ये प्रवेश घेतला. तिथे त्यांना शिष्यवृत्ती मिळाली आणि १९५५ मध्ये ते प्रथम क्रमांकाने पदविका परीक्षा उत्तीर्ण झाले.

          या काळात डिसिल्व्हा यांना ‘अवर फादर’ या सुलेखनशैलीत लिहिलेल्या प्रार्थनेबद्दल ‘स्टुडन्ट्स कॅग अवॉर्ड’ मिळाले. त्यांची १९५५-५६ या काळात जे.जे.मध्ये फेलो म्हणून नेमणूक झाली. दोन हजार पाचशेव्या बुद्ध जयंतीनिमित्त आयोजित अखिल भारतीय डाक तिकिटाच्या डिझाइन स्पर्धेत त्यांना पहिले पारितोषिक मिळाले. बुद्धाच्या पंचशील तत्त्वांची प्रतीकात्मक चिन्हे त्यांनी तेजोवलयाच्या आकारात साकारली होती.

          व्ही.एन.आडारकरांच्या प्रोत्साहनामुळे रॉबी लंडन येथील डिसिल्व्हा सेंट्रल स्कूल ऑफ आर्टमध्ये कलेचे उच्चशिक्षण घेण्यासाठी गेले. तिथे त्यांनी विविध अभ्यासक्रम पूर्ण केले. ते १९५८ ते १९६७ पर्यंत युरोपात राहिले. डिसिल्व्हा यांचे शिक्षक जेसी कॉलिन्स, कोलीन फोर्ब्स, व हॅन्स श्‍लेगर यांनी त्यांना आधार दिला. लंडनमध्ये फ्री-लान्स काम करीत असताना जेसी कॉलिन्स, अ‍ॅलन फ्लेचर, पीटर विल्बर अशा मातब्बर चित्रकार/संकल्पन-कारांबरोबर काम करण्याची त्यांना संधी मिळाली.

          डिसिल्व्हा यांनी १९५९ ते ६१ या काळात मिलान, इटली येथे स्टूडिओ बोगेरीमध्ये कलासंचालक (आर्ट डायरेक्टर) म्हणून काम केले. तेथे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे माक्स हुबर, बोनिनी, आल्डो कालाबेरसी, जिओ पोन्ती अशा कलाकारांबरोबर त्यांनी काम केले. तसेच त्यांनी ग्रफिक डिझाइन, मेडिकल अ‍ॅडव्हर्टायझिंग, डायरेक्ट मेल, प्रदर्शने आणि डिस्प्ले यांमध्ये प्रावीण्य मिळवले.

          ते १९६१ ते १९६७ या काळात जे. वॉल्टर थॉम्प्सन या जाहिरातसंस्थेत सीनियर एक्झिक्युटिव्ह आर्ट डायरेक्टर पदावर होते. या पदावर काम करणारे ते पहिले भारतीय होते. डिसिल्व्हा १९६७ मध्ये ‘अय्यर्स’ या जाहिरातसंस्थेचे क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून भारतात परत आले. त्यांनी १९७२ मध्ये ‘डिसिल्व्हा असोसिएट्स’ या नावाने स्वतःची जाहिरातसंस्था सुरू केली. सुमारे पन्नास वषार्र्ंच्या कारकिर्दीत डिसिल्व्हा यांनी बोधचिन्हे, जाहिराती, पॅकेजिंग अशी विविध प्रकारची कामे केली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची दखल घेतली गेली.

          इटली, इंग्लंड आणि भारत अशा तीन देशांत डिसिल्व्हा यांनी काम केले. इटलीमध्ये त्यांनी मिलानच्या स्टुडिओत काम केले. त्या वेळच्या जाहिरातींच्या मांडणीत स्विस मुद्राक्षर मांडणीचा प्रभाव स्पष्ट दिसतो. डिझाइन स्टुडीओ ही कल्पना एकोणीसशे सत्तरच्या दशकात भारतात रुजली.

          डिसिल्व्हांचे गुरू कोलीन फोर्ब्स यांनी अ‍ॅलन फ्लेचरबरोबर १९६२ मध्ये एक डिझाइन स्टुडीओ चालू केला आणि १९७२ मध्ये फोर्ब्स यांच्यासह पाच जणांनी ‘पेंटाग्रम’ या प्रसिद्ध स्टुडिओची स्थापना केली. कोलीन फोर्ब्स हे ‘डिझाइनर्सचे डिझाइनर’ म्हणून ओळखले जातात, तर अ‍ॅलन फ्लेचर हे दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळातील ‘ब्रिटिश ग्रफिक डिझाइन’ला नवा चेहरा देणारे चित्रकार आणि सांस्कृतिक भाष्यकार मानले जातात. ‘लुकिंग साइडवेज’ हे त्यांचे नव्या दृश्यभाषेची मांडणी करणारे एक महत्त्वाचे पुस्तक मानले जाते. युरोपियन आणि व्हिक्टोरियन दृश्यभाषेची परंपरा आणि अमेरिकेचे पॉप कल्चर यांचा समन्वय ‘ब्रिटिश ग्रफिक आर्ट’मध्ये दिसू लागला तो फ्लेचर, फोर्ब्स इत्यादींच्या प्रयत्नांमुळे. डिसिल्व्हा यांच्या कामावर या सगळ्यांचा प्रभाव पडला.

          डिसिल्व्हा यांनी ‘अय्यर्स’मध्ये आणि नंतर स्वतंत्रपणे काम करताना भारतीय संस्कृती आणि पाश्चात्त्य ग्रफिक आर्ट यांचा सुयोग्य मेळ घातला. आदिवासी सप्ताह, सी नटराजन डान्सर्ससाठी केलेली बोधचिन्हे, ‘मल्याळ मनोरमा’ वृत्तपत्रसमूहासाठी केलेली जाहिरातमोहीम यांतून भारतीय संस्कृतीचा स्पर्श जाणवतो.

          ‘सी नटराजन डान्सर्स’च्या बोधचिन्हात नटराजाच्या मूळ शिल्पाला धक्का न लावता भोवतालच्या प्रभामंडलाला ‘सी’ अक्षराचा आकार दिला आहे आणि उजव्या बाजूची मोकळी जागा नटराजाच्या उडणाऱ्या कटिवस्त्राजवळ येत असल्याने कलेच्या बंधनातून मुक्त होणारी ऊर्जा असा प्रतीकात्मक अर्थ त्याला लाभला आहे. मांडणी - लेआउट ग्रिड संदर्भात डिसिल्व्हा यांनी एका ठिकाणी असे म्हटले आहे की, ‘ग्रीडमध्ये नेहमीच काम करणं म्हणजे वर्तुळाच्या परिघात फिरणं. कधीकधी तुम्ही वर्तुळाचा परीघ ओलांडून काम केलं पाहिजे, त्यामुळं तुमचं कार्यक्षितिज विस्तारायला मदतच होईल,’ त्याची इथे आठवण होते.

          भारतीय ओळख दाखवणारे आणखी एक उदाहरण म्हणजे ‘लेट्रासेट’साठी डिसिल्व्हा यांनी १९६७ साली केलेले देवनागरी अक्षरवळण. ‘लेट्रासेट’चे जनक पॅट्रिक बेरी हे रॉबी यांचे वर्गमित्र आणि खास दोस्त होते. पूर्वी ‘लेट्रासेट’चे विविध अक्षरवळणांचे स्टिकर्ससारखे कागद मिळत असत. जाहिरात तयार करताना शब्दांची ओळ असे एकेक  अक्षर ‘लेट्रासेट’वरून ट्रान्स्फर करून तयार करीत. डिसिल्व्हा यांनी केलेले हे अक्षरवळण म्हणजे देवनागरी मुद्राक्षरांच्या विकासक्रमातला छोटासा, पण महत्त्वाचा दुवा आहे. रॉबी डिसिल्व्हा युरोपमधली आपली करिअर सोडून भारतात परत आले त्याला मातृभूमीची ओढ हेही एक कारण होते. नानभाट येथील सेंट पॉल चर्चमधील खिडकीच्या काचेवरील चित्रकृती, सेंट मेरी कॅथेड्रल, वाराणसीच्या अंतरंग सजावटीचे काम, आगाशीच्या शिरलयवाडीचे मुख्य प्रवेशद्वार, वसईच्या किल्ल्यामधील चिमाजी अप्पांचे स्मारक अशी कामे डिसिल्व्हा यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.

          त्यांनी १९८५ मध्ये वसईला दृक्कला महाविद्यालय सुरू केले. आता ते ‘वसई विकासिनी कला संकुल’ म्हणून ओळखले जाते. देशभरातील मान्यवर दृक्कला संस्थांशी कलाशिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांचा संपर्क राहिलेला आहे.

- दीपक घारे, रंजन जोशी

डिसिल्व्हा, रॉबी जेम्स फ्रान्सिस