Skip to main content
x

घारपुरे, जगन्नाथ रघुनाथ

        गन्नाथ रघुनाथ घारपुरे ह्यांचे जन्मगाव नागपूर. तेथेच त्यांचे सर्व शिक्षण पूर्ण झाले. १९०० साली त्यांनी एलएल.बी. पदवी घेतली व मुंबईला जाऊन वकिलीचा व्यवसाय सुरू केला. त्या काळात लंडनला जाऊन प्रिव्ही कौन्सिलमध्ये त्यांनी सरदार बिवलकर ह्यांचा खटला चालविला व जिंकला. उत्तम कायदेतज्ज्ञ म्हणून त्यांनी नाव मिळवले.

     शिक्षण व कायदा याबरोबरच जगन्नाथराव संस्कृत वाङ्मयाचेही गाढे अभ्यासक होते. १९०९ मध्ये त्यांनी धर्मशाळा ग्रंथमाला सुरू केली. तसेच १९१४ मध्ये ‘दक्षिणी ब्राह्मण सहकारी संस्था’, ‘दक्षिणी ब्राह्मण विद्याप्रसारक संस्था’ काढल्या.

     आपल्या देशातील तरुणांना कायदेविषयक शिक्षण घेता यावे म्हणून जगन्नाथरावांनी पुण्यात डॉ. सर नारायणराव चंदावरकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या बंगल्यात इंडियन लॉ सोसायटीची ४ मार्च १९२३ रोजी स्थापना केली. जगन्नाथराव सोसायटीचे कार्यवाह झाले. मुंबई हायकोर्टात वकिली करणारे एच.सी. कोयाजी, पी. बी.शिंगणे असे तज्ज्ञ या सोसायटीत होते. या इंडियन लॉ सोसायटीच्या पुढाकाराने २० जून १९२४ रोजी पुण्यात विधी महाविद्यालय सुरू झाले. या महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य म्हणूनही जगन्नाथरावांनी जबाबदारी स्वीकारली. इंडियन लॉ सोसायटीने निधी जमवून महाविद्यालयासाठी इमारती उभ्या केल्या. जगन्नाथरावांच्या नेतृत्वाखाली सोसायटीचा विविधांगी विकास होत गेला. आज ह्या विधी महाविद्यालयात तीन हजारांहून अधिक विद्यार्थी कायदेविषयक शिक्षणाचा लाभ घेत आहेत. जगन्नाथरावांच्या स्मरणार्थ ‘आचार्य घारपुरे अभ्यासिका’ नावाचे दालन महाविद्यालयाच्या प्रांगणात उभे आहे.

      पश्‍चिम भारत वकील संघटना, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय अशा विविध शैक्षणिक, सामाजिक संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध होता. ‘महाभारता’ची आवृत्ती प्रकाशित करण्यासाठी त्या काळात त्यांनी एक लाख रुपयांचा निधी जमा केला होता.

     हिंदू व रोमन साम्राज्यातील कायद्यांविषयी जगन्नाथरावांची चाळीस पुस्तके आहेत, त्यातील काही संस्कृत भाषेमध्ये तर काही इंग्रजी भाषेमध्ये आहेत. त्यांनी काही संस्कृत साहित्यकृतींची इंग्रजी भाषांतरेही केली आहेत. त्यांची 'व्यवहार मयूरवः' हे शीर्षक असणारी धर्मशास्त्र ग्रंथमाला १९१४ मध्ये प्रकाशित झाली आहे.

     ‘दी स्मृती चंद्रिका’ आणि ‘सुबोधिनी’ ही त्यांनी लिहिलेली इंग्रजी भाषेतील ग्रंथमाला आहे. ‘कलेक्शन ऑफ हिंदू लॉ’ हाही प्राचार्य घारपुरे यांचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखला जातो.

     महाराष्ट्राच्या शिक्षणक्षेत्रात, विशेषत: कायदेविषयक शिक्षणक्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात मोठी कामगिरी बजावणार्‍या प्रा. जगन्नाथराव घारपुरे ह्यांची पुण्यातील ‘विधी महाविद्यालय’ ही महाराष्ट्राच्याच दृष्टीने नव्हे तर देशाच्या दृष्टीनेही अतिशय महत्त्वाची देणगी आहे.

     - डॉ. विश्‍वास मेहेंदळे

घारपुरे, जगन्नाथ रघुनाथ