Skip to main content
x

चाफेकर, वामनबुवा

ग्वाल्हेर घराण्याचे गायक वामनबुवा चाफेकर हे मिरजेचे होते. घरी अत्यंत गरिबी होती. वडील गावात येणाऱ्या हरिदासांच्या मागे टाळ धरून साथ करीत. यातून होणाऱ्या प्राप्तीतच ते चरितार्थ चालवीत. ही मिळकत संपली की वडील, आई दोघेही माधुकरी मागत.
वामनबुवा चाफेकरांना अत्यंत सुरेल व मधुर आवाजाची देणगी होती. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण कागवाडकरीण नावाच्या गायिकेकडे झाले. या बाईंकडे ख्यालाबरोबरच धृपद धमारही होते. त्यांच्याकडून चाफेकरांना अनेक बंदिशी मिळाल्या. वयाच्या ९
१० वर्षापासून बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांकडे त्यांचे शिक्षण सुरू झाले. बाळकृष्णबुवांकडून त्यांनी अनेक वर्षे तालीम घेतली. बाळकृष्णबुवा १८९६ साली मिरज सोडून इचलकरंजीला गेले. दर वर्षी चार-पाच महिने चाफेकर इचलकरंजीला शिकण्याकरिता जात असत. बाळकृष्णबुवांकडून काही ठुमऱ्यादेखील ते शिकले.
वामनबुवा चाफेकरांची स्मरणशक्ती अतिशय तीव्र होती. ते ९१० वर्षांपूर्वी त्यांच्याकडून घेतलेली एखादी चीज पाठात यत्किंचितही फरक न करता म्हणून दाखवत असत. चाफेकरांना चाळीस-पन्नास राग येत. पण दुसऱ्या गायकांच्या चिजाही ते लक्षपूर्वक ऐकून गात असत. याशिवाय ते ऐकूनऐकून नाट्यपदेही गात.
वामनबुवा चाफेकरांची गायकी ग्वाल्हेर वळणाचीच होती. आलाप, बोलतान आणि तान या तिन्ही अंगांना ते योग्य महत्त्व देऊन गात. रागाचे वातावरण ते तत्काल उभे करीत. त्यांची बोलतान लालित्यपूर्ण असे. लयकारीवर प्रभुत्व, तानेतील सहजता व हृदयाला भिडणारा अत्यंत सुरेलपणा हे त्यांचे विशेष होते. तिलवाडा ताल त्यांना अत्यंत प्रिय होता.
उ.अब्दुल करीम खाँ साहेबांना चाफेकरांचे गाणे फार आवडत असे. बाबासाहेब मिरजकरांच्या एका समारंभात १९३४
-३५ च्या सुमारास  वामनबुवा चाफेकरांच्या गाण्यानंतर अब्दुल करीम खाँचे गाणे होते. मैफलीत वामनबुवा चाफेकरांच्या गाण्याचा एवढा प्रभाव होता, की करीम खाँनी १५-२० मिनिटांतच गाणे बंद केले व सांगितले की, ‘‘वामनबुवांच्या गाण्याचा माझ्या मनावर इतका असर झाला आहे, की माझे गाणे मला सुचत नाही.’’ यावरून चाफेकरांच्या गायकीची महत्ता लक्षात येते.
गगनबावड्याचे राजे माधवराव पंत यांनी दरबारी गवई म्हणून वामनबुवा चाफेकरांची नियुक्ती केली होती. तसेच बाबासाहेब मिरजकरांनीही त्यांना किल्ल्यातील सरकारी माधोजीच्या देवळात गाण्याची नोकरी दिली. मिरज संस्थानचे दरबारी गवई म्हणूनही ते राहिले. मुंबई आकाशवाणीवर त्यांचे तीन वेळा गाणे झाले. महाराष्ट्र शासनातर्फे त्यांना दोन वेळा पाचशे रुपयांचे अनुदान मिळाले होते.
वामनबुवा चाफेकरांना लहानपणापासून मेंदूच्या विकृतीचा एक
  विचित्र आजार होता. विशेष म्हणजे थोडेसे सुखाचे दिवस आले, की हा आजार डोके वर काढत असे. तीन-चार महिने हा वेडाचा पगडा राहत असे. क्वचित त्यांना इस्पितळामध्येही दाखल करावे लागे. त्यामुळे त्यांचे जीवन काहीसे अस्थिर होते. त्यांच्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर चाफेकरांना त्यांच्या थोरल्या भगिनीने सांभाळले. मात्र या बहिणीच्या मृत्यूनंतर जवळजवळ ३५ वर्षे त्यांनी एकट्यानेच जीवन व्यतीत केले.
बा. रं. देवधरांनी चाफेकरांकडून बऱ्याच चिजा घेतल्या. देवधरांना त्यांच्याबद्दल अतिशय आदर होता. देवधरांनी त्यांना बरीच मदतही केली. प्रा. ना.र. मारुलकरांनीही त्यांच्याकडून बऱ्याच बंदिशी शिकून घेतल्या.
आयुष्यात समाधानकारक चरितार्थ चालावा असा पैसा चाफेकरांना कधीच मिळाला नाही. शेवटपर्यंत त्यांनी गरिबीत आयुष्य काढले, मात्र ते मनाने समाधानी होते. ‘‘शापित गंधर्वाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वामनबुवा चाफेकर,’’ असे बा. रं. देवधर म्हणत. वयाच्या पंचाऐंशीव्या वर्षी वामनबुवांचे निधन झाले.

        डॉ. सुधा पटवर्धन, माधव इमारते

चाफेकर, वामनबुवा