करमरकर, रघुनाथ दामोदर
संस्कृतचे जुन्या पिढीतील प्राध्यापक, संस्कृतसंबंधी अनेक पुस्तके लिहिणारे लेखक, पुण्यातील शिक्षण प्रसारक मंडळीचे आजीव सदस्य, स.प. महाविद्यालयाचे अठराहून अधिक वर्षे प्राचार्य, पुणे विद्यापीठात वेदान्तविषयक व्याख्याने देणारे व्याख्याते, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या उभारणीत मोलाचे कार्य करणारे व त्या संस्थेचे दुसरे मानद सचिव व पुढे स्नातकोत्तर विभागाचे निर्देशक, अतिशय उमद्या स्वभावाचे, विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करणारे सुजन विशाल अंत:करण असणारे; पण दुर्दैवाने कर्करोगासारख्या असाध्य व क्लेशदायक व्याधीने कालवश झालेले एक थोर सत्पुरुष म्हणजे रघुनाथ दामोदर करमरकर. रघुनाथ दामोदर करमरकर यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील भिलवडी गावी झाला. त्यांच्या आईचे नाव जानकीबाई होते. वडील पोलीसखात्यात नोकरीला होते, पण १९०९ मध्ये वडिलांचे निधन झाले व हळूहळू घरी विपन्नावस्था प्राप्त झाली. या वेळी कँवेल या जिल्हाधिकाऱ्याने त्यांना अर्थसाहाय्य केले. एक अभ्यासू विद्यार्थी असा लहानपणापासून रघुनाथपंत करमरकरांचा लौकिक होता. उच्च शिक्षणासाठी करमरकरांनी फर्गसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यांना ‘वरजीवनदास शिष्यवृत्ती’, तसेच ‘जैन वाङ्मय शिष्यवृत्ती’ मिळाली.
इंटरनंतर बी.ए.परीक्षेसाठी करमरकरांनी डेक्कन महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. बी.ए.ला ते पहिल्या वर्गात दुसरे आले. त्या वेळी त्यांना संस्कृतातील प्रावीण्याबद्दल भाऊ दाजी पारितोषिक, तर सर्वसाधारण प्रावीण्याबद्दल ‘गंगादास रंगिलदास शिष्यवृत्ती’ मिळाली. डेक्कन महाविद्यालयामध्ये शिकत असताना अतिशय प्रतिष्ठेची ‘दक्षिणा फेलोशिप’ व संस्कृत, विशेषत: वेदान्त विषयातील नैपुण्यातील असलेली ‘भगवानदास पुरुषोत्तमदास शिष्यवृत्ती’, तसेच ‘झाला वेदान्त’ पारितोषिक मिळाले. प्रिन्सिपॉल बेन यांचे ते आवडते विद्यार्थी होते; त्यामुळे प्रिन्सिपॉल बेन यांनी करमरकरांना शिफारसपत्रही दिले. पण प्रा. करमरकरांनी सरकारी नोकरी न करण्याचा निश्चय केला होता व त्यामुळे त्यांनी ते शिफारसपत्र स्वीकारले तर नाहीच; पण आपले सतीर्थ्य - सहाध्यायी प्रा. गजेंद्रगडकर यांना ते फाडायला लावले. प्रा. करमरकरांची देशनिष्ठा यातून दिसून येते.
१९१६मध्ये लोकमान्य टिळकांच्या पुढाकाराने न्यू पूना महाविद्यालयाची (म्हणजे सर परशुरामभाऊ महाविद्यालयाची) स्थापना झाली व प्रा. करमरकर संस्कृत व इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून तेथे रुजू झाले. त्याच वर्षी १९१६-१७मध्ये ते शिक्षण प्रसारक मंडळी या मातृसंस्थेचे आजीव सदस्यही झाले. सर परशुरामभाऊ महाविद्यालयामध्ये १९३३ ते १९४५ अशी बारा वर्षे करमरकरांनी प्राचार्यपद भूषवले.
या काळात अध्यापन क्षेत्रात नावाजलेल्या व्यक्तींना प्रा. करमरकरांनी आपल्या महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून घेतले. वानगीदाखल डॉ. एस.एम. कत्रे, डॉ. हरदत्त शर्मा, सौ. लीला वागळे, डॉ. के.ना. वाटवे, प्रा. माटे ही काही नावे सांगता येतील. त्याचबरोबर, विद्यार्थ्यांच्या हिताच्या अनेक गोष्टी झाल्या. भव्य ग्रंथालय व वाचनासाठी अभ्यासगृह, सभा-संमेलनासाठी देवी रमाबाई सभागृह, विद्यार्थ्यांना एकत्र येण्यासाठी विद्यार्थिगृह, रसायनशास्त्र प्रयोगशाळा इत्यादी गोष्टींमुळे महाविद्यालयाला पूर्णता आली.
प्रशासकीय कामाबरोबरच संस्कृत गद्य-पद्याचे इंग्रजीमध्ये शब्दश:, युक्त व सुगम भाषांतर करणार्यांमध्ये प्रा. करमरकर अग्रणी होते. विद्यार्थ्यांना उपयुक्त अशा अनेक संस्कृत ग्रंथांच्या सटीक आवृत्त्यांचे त्यांनी संपादन केले. त्यामध्ये प्रामुख्याने कालीदास, भवभूती, शूद्रक यांची मिळून सहा नाटके, कालीदासाची तीन महाकाव्ये, बाणभट्टाच्या कादंबरीचा काही भाग यांचा समावेश होतो, त्याचबरोबर प्रा.गजेंद्रगडकरांसह तर्कसंग्रह, अर्थसंग्रह इत्यादी ग्रंथांचे संपादन, सर्वच ग्रंथांना विवेचक प्रस्तावना, स्पष्टीकरणात्मक टिपा व अनेक परिशिष्टे यांची जोड दिली आहे. या सर्वांबरोबर अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे प्रा.करमरकरांनी केलेला रामानुजांच्या ‘ब्रह्मसूत्र भाष्या’चा इंग्रजी अनुवाद. हे सर्व कार्य करीत असताना मुंबई विद्यापीठाचे 'पीएच.डी'चे गाइड म्हणून ते कार्यरत होते. संस्कृतच्या क्षेत्रात प्रतिष्ठित मानल्या गेलेल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेशी ते स्थापनेपासून संबंधित होते.
शैक्षणिक क्षेत्रात प्रशासकीय तसेच अध्यापनादी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रा.करमरकरांचा देशाभिमान त्यांच्या लष्करी कार्यातून दिसून येतो. १९१९मध्ये निघालेल्या भारतीय संरक्षण दलामध्ये ते सैनिक म्हणून दाखल झाले. ह्यातून १९२१मध्ये यू.टी.सी. हा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना लष्करी शिक्षण देणारा स्वतंत्र विभाग करण्यात आला. उत्तरोत्तर लेफ्टनंट,कॅप्टन अशा क्रमाने १९४०मध्ये ते मेजर झाले व १९४४मध्ये त्यांना लेफ्टनंट कर्नल हा हुद्दा मिळाला. करडी शिस्त व करारीपणा ही प्राचार्य करमरकरांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये होती; पण त्याचबरोबर त्यांचे अंत:करण प्रेमळ व हितैषी होते, ही गोेष्ट लक्षात घेण्यासारखी आहे.
आयुष्यभर मुख्यत्वे प्राध्यापकी केल्याने संस्कृतच्या विद्यार्थ्यांसाठी ‘रघुवंश’( काही सर्ग ), ‘कुमारसंभव’ (सर्ग १-५), ‘मेघदूत’, ‘मालविकाग्निमित्र’, ‘विक्रमोर्वशीय’, ‘अभिज्ञानशाकुन्तलम’, ‘मीमांसा अर्थसंग्रह’, न्यायविषयावरील तर्कसंग्रह, प्रा. डॉ. गजेन्द्रगडकर यांच्या साहाय्याने इंटरमिजिएट संस्कृत-सिलेक्शन्स इत्यादी पाठ्यपुस्तकांचे उत्तम संपादक, रामानुजाचार्यांचे ‘श्रीभाष्य’, गौडपादांच्या ‘माण्डूक्यकारिका’ यावर उत्तम प्रस्तावना, आंग्ल भाषांतरे व भरपूर टीपा लिहिणारे लेखक, तसेच महाभारताच्या चिकित्सिक आवृत्तीसाठी या पर्वांचे संपादन करणारे, भांडारकर संस्थेच्या संशोधन लेखांच्या वार्षिक अंकांचे एक संपादक असलेल्या प्रा. रघुनाथ करमरकरांनी भगवद्गीताविषयक अनेक संशोधनपर निबंध लिहिले. कर्नाटक विद्यापीठ (धारवाड) यांच्या निमंत्रणावरून कालिदास व भवभूती यांवर विदग्ध व्याख्यानमाला देऊन त्या विद्यापीठाद्वारे त्यांनी ग्रंथ प्रकाशित केला.
सी.आर. देशपांडे (‘चम्पूकाव्य’), चिं.त्र्यं. केंधे (सांख्यकारिकेवरील ‘युक्तिदीपिका’), ‘अनुगीता’, ‘उद्धवगीता’ इत्यादी भगवद्गीतेतर गीतासाहित्य लिहिणारे, अशा अनेक संशोधन प्रबंधकारांना र.दा. करमरकरांनी सक्षम मार्गदर्शन केले. प्राचार्य करमरकरांच्या सर्वच संशोधनाचा आढावा या आटोपशीर लेखात घेणे केवळ अशक्य आहे. यासाठी वानगीदाखल काही बाबींचा येथे निर्देश केला आहे.
भगवद्गीतेवर करमरकरांचे तीन-चार संशोधनपर लेख आहेत. त्यांतील एका लेखात गीतेतील ‘पुप्षिता वाक्’ कोणती हे त्यांनी सांगितले आहे. गीतेवरील हनुमत्पिशाच-भाष्यात मुण्डकोपनिषदातील ‘एहि एहीती तमाहुतय: सुवर्चस: सूर्यस्य रश्मिभिर्यजमानं वहानि एष ते ते सुकृत: ब्रह्मलोक:’ ही श्रुती म्हणजेच गीतेतील ‘पुप्षिता वाक्’ (flowery speech) असा अर्थ केला आहे, तो नाकारून करमरकर म्हणतात, की गीतेबाहेरील साहित्यात ‘पुष्पिता वाक्’ शोधण्याचा प्रयत्न करणे हे मुळातच चूक आहे आणि ते अशासाठी, की गीतेनेच ‘यामिमां पुप्षितां वाचम्’ असे म्हणून गीतेतील त्याच संदर्भाच्या सान्निध्यातील एखादी श्रुती असल्याचा निर्वाळा गीतेने दिला आहे. ही श्रुती कोणती? करमरकर यांच्या मते ‘यावानर्थ उदपाने सर्वत: संप्लुतोदके...’ हा श्लोक होय. याच श्लोकाबाबतच्या दुसऱ्या एका लेखात त्यांनी शंकराचार्यकृत ‘सतिसप्तमीपर अर्थनिर्वचना’चा अस्वीकार केला आहे. त्यांच्यामते ‘सर्वत: सम्प्लुतोदके सति उदपाने यावानर्थ’ असे मानण्यापेक्षा सरळसरळ उदपाने या सप्तम्येकवचनाचे विशेषण ‘सम्प्लुतोदके’ असे मानणे अधिक लाघवाचे व औचित्याचे आहे.
करमरकरांनी ‘असत्यमप्रतिष्ठं ते जगदाहुरनीश्वर...’ या श्लोकात; चार्वाकांचा निर्देश आहे की बौद्धमताचा, याचीही प्रमाणभूत चर्चा केली आहे.
‘मालविकाग्निमित्रा’च्या प्रस्तावनेत त्यांनी डॉ. विल्सनने प्रतिपादलेले मत म्हणजे मालविकाग्निमित्र हे नाटक त्यातील शैली व गुणवत्ता (साहित्यिक) पाहता शाकुंतलकर्त्या कालिदासापेक्षा वेगळ्या कालिदासाचे आहे व हा कालिदास इ.स. अकराव्या शतकातला असावा या विधानाचा साधार प्रतिवाद केला आहे. विक्रमोर्वशीय (पुरुरवा - ऊर्वशी सूक्त, ऋग्वेद व पुरुरवा-ऊर्वशी संवाद; ‘शतपथब्राह्मण’) यावर आधारित आहे, तर ‘शाकुंतल’ हे महाभारतातील ‘शकुन्तलोपाख्याना’वर आधारित आहे; मात्र ‘मालविकाग्निमित्र’ हे रूपक इतिहासाधिष्ठित असल्याने कालिदासाच्या काव्यविलासाला मर्यादा पडल्या असल्या पाहिजेत हे सांगून कोणत्याही कवीच्या सर्व कृतींत सारखाच वाङ्मयीन दर्जा नसतो हे शेक्सपिअरच्या उदाहरणावरून दाखवून दिले. शेक्सपिअरच्या ‘मिडसमर नाइट्स ड्रीम’ चा वाङ्मयीन दर्जा ‘ऑथेल्लो’ किंवा ‘हॅम्लेट’च्या वाङ्मयीन गुणवत्तेशी तुलना केली असता कमी प्रतीचा आहे म्हणून दोन शेक्सपिअरची उत्प्रेक्षा करणे प्रामादिक ठरेल असे सांगितले आहे. कालिदास हा प्राय: गुप्तकालीन गुप्तराजांचा आश्रित असताना त्याला अकराव्या शतकात आणून सोडणे हेही विलक्षण अनैतिहासिक असल्याचेही म्हटले आहे.
‘कुमारसंभवा’च्याही प्रस्तावनेत पहिले आठ सर्गच कालिदासाचे व पुढचे अन्य कोणाचे हे म्हणणेही रास्त नसल्याचे करमरकर याच कारणांसाठी आग्रहाने म्हणतात. करमरकरांच्या समीक्षेची चमक त्यांच्या अभिज्ञानशाकुंतलाच्या समीक्षेत विशेषत: आढळते. मुळात ‘शाकुंतल’ हे पाच अंकाचेच नाटक होते. अप्सरस्तीर्थाजवळ आकाशातून एक स्त्री-देहाची ठेवण असणारी दिव्य ज्योती प्रकट होऊन ती शोकसंतप्त शकुंतलेला उचलून स्वर्गात जाते याचा ध्वन्यर्थ शकुंतला ‘दिवंगता’ होते असाच काढायला हवा. यामुळे संस्कृत साहित्यात इतरत्र कोठेच न आढळणारी शोकांतिका (ट्रॅजेडी) लाभली असती. केवळ भरतमुनींच्या, ‘नाटक सुखान्तच करायचे’ या दण्डकामुळे शाकुंतलात पुढचे दोन अंक कालिदासानेच जोडले असावेत, असे करमरकर सुचवतात. कालिदासाची इतर दोन नाटकेही पाच अंकांचीच आहेत.
कर्नाटक विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या करमरकरांच्या भवभूतीविषयक पुस्तकात, भवभूतीला असलेले कालिदासाचे ऋण आणि भारतीय साहित्य व संस्कृतीला भवभूतीचे योगदान हे नवीन मुद्दे विलक्षण भावतात. करमरकरांनी भवभूतीला अभिप्रेत असणारा रामकृत सीतात्याग व सातव्या हेन्रीने केलेला राजसिंहासनाचा त्याग यांची फार मनोज्ञ चर्चा केली आहे, ती वाचकांनी मुळातूनच वाचावी.
रामानुजाचार्यांची आलवार संतांची भक्तिपरंपरा आणि गौडपाद यांच्यावर बौद्ध तत्त्वज्ञानाचा प्रभाव नसल्याचे त्यांनी केलेले विवेचनही जिज्ञासूंनी मुळातूनच वाचावे असे आहे.