नाईक, जयंत पांडुरंग
जयंत पांडुरंग नाईक यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्याच्या आजरा तालुक्यातील बहिरेवाडी या खेड्यात झाला. तेथे घोटगेे आडनावाची काही कुटुंबे होती. हरिभाऊ घोटगे यांचे हे पुत्र. त्यांचे मूळ नाव विठ्ठल. बैलहोंगल येथील कानडी प्राथमिक शाळा व नंतर बेळगाव येथे चुलत्यांच्या पेढीवर काम करीत असताना तेथील शाळेमध्ये शिक्षण पूर्ण करून विठ्ठलने मॅट्रिकला असामान्य यश मिळविले. पुढे कोल्हापूरला बोर्डिंगमध्ये राहून शिकवण्या करीत राजाराम महाविद्यालयामध्ये पदवी प्राप्त करीत असताना त्याने आपल्या तल्लख बुद्धिमत्तेचे अनेक तेजस्वी आविष्कार घडविले. त्यानंतर १९३० साली गांधीजींनी स्वातंत्र्यसंग्रामाचे रणशिंग फुंकल्यावर या तरुणाने त्या हाकेला ‘ओ’ देऊन स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली व कुटुंबाला त्रास होऊ नये म्हणून स्वत:चे नाव बदलून ‘जयंत पांडुरंग नाईक’ असे नवे नाव धारण केले आणि पुढे अधिकृतरीत्या तेच कायम झाले.
‘सक्त मजुरीची शिक्षा म्हणजे खडी फोडण्याचे काम’ असा त्या काळी नियम होता. पण नाईकांसारख्या बुद्धिमान तरुण कैद्याने इतरांनी नाकारलेले रूग्ण सेवेचे काम तुरुंगात मागून घेतले. त्यांच्या या कार्याने प्रभावित झालेल्या ब्रिटिश डॉक्टरने देऊ केलेली शिक्षेतील सूट घेण्याऐवजी वैद्यक शास्त्राची पुस्तके त्यांनी मागून घेतली. राजबंदी म्हणून नाईक तुरुंगात गेले; पण डॉक्टर बनून ते बेल्लारीच्या तुरुंगातून बाहेर आले. भूमिगत असताना त्यांनी उप्पीनबेटीगेरी या खेड्यातील आर्थिक- सामाजिक जीवन जवळून पाहिले होते. ते खेडे शिक्षण आणि विकासाच्या सर्वांगीण कामासाठी त्यांनी निवडले.
थोड्याच दिवसात नाईक हे उप्पीनबेटीगेरीचे लोकप्रिय डॉक्टर बनले. तेथे त्यांनी एक शिक्षकी प्राथमिक शाळा स्थापन केली. अर्धी पँट आणि आखूड बाह्यांचा सदरा हा तुरुंगातील पोषाखच त्यांनी चालू ठेवला. साफसफाई, पाणीपुरवठा, साक्षरता अशा कामात ते रमून गेले. लोकांच्या मदतीने वर्षभरात त्यांनी ‘धारवाड प्राथमिक शिक्षण मंडळ’ स्थापन केले. उप्पीनबेटीगेरीपासून बाजाराचे गाव बरेच लांब पडत असे. ते अंतर कमी करण्यासाठी मधली टेकडी फोडून रस्ता काढण्याचा पराक्रम गावकऱ्यांनी नाईकांच्या नेतृत्वाखाली केला. त्याकरिता नाईकांनी अभियांत्रिकीची तांत्रिक माहिती घेतली. या काळात नाईकांनी शिक्षणविषयक बरेच लिखाणही केले. १९३७ साली मुंबई प्रांतात काँग्रेसचे सरकार स्थापन झाले व शैक्षणिक विकासासाठी प्रांतिक प्राथमिक व प्रौढ शिक्षण मंडळे स्थापन झाली. या दोन्हीमध्ये सदस्य होण्याचे निमंत्रण नाईकांना मिळाले. त्या वेळी त्यांनी शिक्षणाच्या अर्थशास्त्राकडे आपले लक्ष वळविले आणि शिक्षण विभागातील ज्येष्ठ अधिकारी व गोखले अर्थशास्त्र संस्थेचे तज्ज्ञ यांच्याशी मैत्री जोडून शिक्षण प्रसाराच्या नव्या योजना सुरू केल्या. १९३६ साली त्यांनी ‘मास एज्युकेशन’ हे पुस्तक लिहिले. शैक्षणिक इतिहासावर ५ व्याख्याने दिली आणि ‘ब्रिटिश इंडियातील शिक्षणाचा इतिहास’ हा अत्यंत गाजलेला ग्रंथ तयार केला.
कोल्हापूरमध्ये त्यावेळी रिजन्सी कौन्सिलचा कारभार होता. शिक्षणमंत्री रावबहादूर पाटील यांनी नाईकांना तेथे येण्याचे निमंत्रण दिले. कोल्हापूरचे शिक्षणसचिवपद ही केवळ शिक्षणाचाच नव्हे तर कोल्हापूर संस्थानचा सर्वांगीण विकास करण्याची संधी आहे हे नाईकांनी ओळखले. त्यांनी संस्थानातील शिक्षणाबरोबरच कोल्हापूरच्या नगर रचनेतही लक्ष घातले आणि योजनाबद्ध पुनर्रचनेचे प्रात्यक्षिक तेथे दाखवून दिले. त्यांच्या कामाचा झपाटा विलक्षण होता. शिक्षण, आरोग्य, क्रीडा या सर्व बाबतीत त्यांनी लोकसहभाग मिळविला आणि अल्पावधीत संस्थानचा कायापालट घडवून आणला. आपल्या अभ्यासाच्या आधारावर १९४६ मध्ये त्यांनी संस्थानच्या सर्वंकष विकासाची पंचवार्षिक योजना सुरू केली. ग्रामीण विभागाच्या विकासासाठी स्वातंत्र्यपूर्व काळातच विकास गटांची योजना त्यांनी सुरू केली. या काळात नाईकांनी विपुल लेखन केले. मुंबई प्रांतातील लोकल फंड सेसचा इतिहास त्यांनी लिहिला. भारतातील शिक्षणाचा आढावा घेणारे एक छोटेसे इंग्रजी पुस्तकही तयार केले. ‘उद्याचे कोल्हापूर’ असे पुस्तक लिहिल्यानंतर कोल्हापूर नगरपालिकेचा इतिहासही त्यांनी लिहून काढला. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संस्थानाचे विलिनीकरण झाले व त्यामुळे नाईकांना तेथील नोकरी चालू ठेवणे शक्य नसल्याने १९४७ अखेर त्यांनी कोल्हापूरचा निरोप घेतला आणि नव्या वर्षाची सुरुवात मुंबईला ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन’ या अभिनव शैक्षणिक संस्थेच्या स्थापनेने केली.
कोल्हापुरात असतानाच आपल्या मित्रांसाठी ‘गोविंदराव कोरगावकर धर्मादाय ट्रस्ट’ नाईक यांनी स्थापन केला होता. ट्रस्टचे सचिव म्हणून काम करीत असताना नाईकांचे मुंबई, पुणे येथील शिक्षक-प्रशिक्षण कार्याशी संबंध येत होते व त्यातून त्यांनी आपल्या भावी कार्याची रूपरेखा आखली होती. त्यांचे स्नेही प्रा. रामभाऊ परुळेकर हे आधीच मुंबईला गेले होते. त्यांच्यामार्फत अनेक नामवंत शिक्षण तज्ज्ञांचे सहकार्य मिळवून १९४७ मध्ये त्यांनी ‘इंडियन इन्स्टिट्यूट’ची स्थापना केली. मुंबईत आल्यावर त्यांच्या जीवनात बदल घडविणाऱ्या दोन व्यक्ती-त्यांच्याशी जवळून परिचय झाला. त्या म्हणजे मुंबई राज्याचे शिक्षण सल्लागार डॉ. सय्यिदेन व त्यांच्या कार्यालयातल्या अधिकारी चित्रा नाईक. या सर्वांच्या सहकार्याने नाईक यांनी दोन वर्षे मुंबईत कार्य केले खरे पण त्यांची ओढ ग्रामीण शिक्षणाकडे अधिक होती. १९४९ मध्ये ‘राधाकृष्णन आयोगा’चा ग्रामीण विद्यापीठांविषयी अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर संस्थेच्या संशोधन कार्यक्रमात तो प्रयोग समाविष्ट करण्याचे त्यांनी ठरविले आणि त्यासाठी कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातले गारगोटी हे गाव त्यांनी निवडले. या योजनेविषयी विचारमंथन करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रमुख समाजसेवकांचा आणि विद्वानांचा एक मेळावा १९५२ मध्ये घेण्यात आला आणि २० मे १९५२ रोजी गारगोटी येथे शंकररावजी देव यांचे हस्ते मौनी विद्यापीठाचे औपचारिक उद्घाटन झाले. सुरुवातीस मुंबई व गारगोटी या दोन्ही ठिकाणचे काम नाईक जाऊन येऊन करीत असत. परंतु १९५३ मध्ये ते कोल्हापूरला परतले व गारगोटीकडे लक्ष देऊ लागले.
मौनी विद्यापीठामध्ये ग्रामीण भागाच्या पूर्व प्राथमिकपासून उच्च शिक्षणापर्यंतच्या विविध शैक्षणिक गरजा पूर्ण करणे, स्थानिक समाजाला जागृत करून विकास करणे, औद्योगिक व शेतीला उपयुक्त असे शिक्षण देणे आणि अभियांत्रिकी, सहकार, समाजसेवा, कृषिशास्त्र अशा विषयांचा अभ्यासक्रमात समावेश करून शैक्षणिक विकासाची आदर्श योजना करणे असे नाईक यांचे संकल्प होते. ते त्यांनी जिद्दीने आणि झपाट्याने अमलात आणले. १९५२-५३ मध्येच तेथे शिशुभवन, कुमारभवन, अध्यापक भवन, महिला मंडळ, माझे दुकान, आरोग्य केंद्र, दृकश्राव्य केंद्र आदी वीस विभाग होते. छोट्या वस्त्यातून शाळा कशा चालवाव्यात इथपासून ग्रामीण अभियंता तयार करण्यापर्यंतचे उपक्रम तेथे सुरू करण्यात आले. पाणीपुरवठा, आरोग्य, कुटुंब नियोजन, ग्रामीण महिला साक्षरता वगैरे प्रश्नांकडेही विद्यापीठात लक्ष देण्यात आले. १९५९ मध्ये नाईकांनी गारगोटीला समाज शिक्षणासंबंधी राष्ट्रीय परिसंवाद व १६ वी राष्ट्रीय परिषद घेतली. त्यासाठी ५०० च्या वर नामवंत गारगोटीला आले होते. त्याच वर्षी नाईक यांना युनेस्कोने आशिया खंडातील प्राथमिक शिक्षणाची योजना तयार करण्यासाठी निमंत्रित केले होते.
डॉ. चित्रा नाईक १९५३ मध्ये फुलब्राईट शिष्यवृत्ती मिळवून न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठात रवाना झाल्या होत्या. त्यांचा व नाईक यांचा पत्रव्यवहार चालू असे. जून ५४ मध्ये त्या भारतात परतल्या तेव्हा उत्तर सातारा जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी पदावर त्यांची नियुक्ती झाली होती. त्यांना नाईकांनी निरोप दिला की, प्रथम कोल्हापूरला येऊन नंतर साताऱ्याला जा. कारण आचार्य भागवत, बाबुराव जोशी व इतर स्नेह्यांना तुमचे स्वागत करायचे आहे. पुढे याच स्नेही मंडळींच्या आग्रहामुळे चित्रा नाईक यांनी जे. पी. नाईकांशी विवाह करण्याचे मान्य केले आणि मार्च १९५५ मध्ये पन्हाळगडावर लग्न समारंभ पार पडला. पण १९५६ मध्ये नाईकांचे दिल्लीतले काम वाढू लागले. त्याच वर्षी सोविएत रशियाला गेलेल्या भारतीय शिक्षण तज्ज्ञांच्या शिष्ट मंडळात त्यांचा समावेश होता. युनेस्कोने ब्रह्मदेश, मलेशिया वगैरे देशातील शैक्षणिक परिस्थितीचे अहवाल तयार करण्यासाठी त्या देशांना भेटी देण्याचे काम त्यांच्यावर सोपविले. त्यांनी केलेल्या प्राथमिक शिक्षणाच्या सर्वेक्षणामुळे दिल्लीचे लक्ष त्यांचेकडे अधिकच वेधले गेले आणि त्यांना केंद्रीय शिक्षण खात्याने ‘प्राथमिक शिक्षण सल्लागार’ हे पद स्वीकारण्याची विनंती केली व त्याप्रमाणे ते दिल्लीमध्ये दाखल झाले.
युनेस्कोच्या परिषदेसाठी नाईक कराची येथे गेले होते. तेथे संपूर्ण आशिया खंडामध्ये प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाची योजना त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाली, ती पुढे ‘कराची प्लॅन’ म्हणून विख्यात झाली. त्यानंतर नाईक यांनी ‘एशियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड अॅडमिनिस्ट्रेशन’ ही संस्था स्थापन करून एक नवा अभ्यासक्रम तयार केला. शिक्षण मंत्रालयातले विविध कक्ष एकत्र करून नॅशनल कौन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (एन.सी.इ.आर.टी.) ही संस्था स्थापन करण्यात पुढाकार घेतला. भारतीय शिक्षणाच्या आमूलाग्र पुनर्रचनेसाठी त्यांनी शिक्षणमंत्री एम. सी. छगला यांना भारतीय शिक्षण आयोग स्थापन करण्याची सूचना केली. नाईक यांचा भर भारतीय जनतेच्या सर्वसमावेशक विकासावर होता. त्यासाठी शिक्षण हे त्यांनी प्रमुख माध्यम मानले होते. शिक्षणाच्या जोडीला जनतेचे आरोग्य, ग्रामीण भागाचा आर्थिक विकास, सामान्य जनतेचा राजकीय सहभाग अशा विविध मार्गांनी समतेकडे योजनाबद्ध वाटचाल करण्याच्या कार्यात त्यांनी स्वत:ला झोकून दिले होते. देशाच्या शिक्षण क्षेत्रात ते चार दशकांपेक्षा अधिक काळ कार्यरत होते व १९६० पासून पुढे २० वर्षे ते त्या क्षेत्राचे केंद्रस्थान बनून गेले होते. त्या काळातील भारतीय शैक्षणिक संशोधन, शिक्षण क्षेत्रातील नवनवे उपक्रम आणि सुधारणा यांना मिळालेले संस्थात्मक स्वरूप, शैक्षणिक नियोजन आणि धोरण या सर्वांचा आरंभ व प्रगती यांवर त्यांचा संपूर्ण प्रभाव पडला होता. १९६४ मध्ये स्थापन झालेल्या या कोठारी आयोगाचे सचिव नाईकच होते. आयोगाचा अहवाल ७०० पानांचा असून त्या कार्याकडे नाईकांनी एक जागतिक स्तरावरचा महत्त्वाचा संशोधन प्रकल्प म्हणून पाहिले. याखेरीज या काळात नाईक यांनी चौथ्या पंचवार्षिक योजनेतील शिक्षण, शैक्षणिक नियोजनातील शिक्षकांची भूमिका, जिल्हावार शैक्षणिक नियोजन वगैरे विपुल ग्रंथ लेखन केले.
१९७८ मध्ये नाईकांनी दिल्लीचा निरोप घेऊन पुण्यात स्थलांतर केले. त्यांची इंडियन इन्स्टिट्यूट ही संस्था १९७६ पासून पुण्यात कार्यरत होती. तिची सूत्रे त्यांनी हाती घेतली. त्यांची दूरदृष्टी आणि डॉ.चित्रा नाईक यांची कार्यकुशलता यामुळे अल्पावधीत इन्स्टिट्यूटमध्ये नवे चैतन्य निर्माण झाले आणि विविध उपक्रम सुरू झाले. १९७९ पासून इन्स्टिट्यूटच्या वतीने सार्वत्रिक प्राथमिक शिक्षणाचा कृती संशोधन प्रकल्प पुणे जिल्ह्यातील निवडक खेड्यांमध्ये सुरू झाला. या दरम्यानच नाईक यांचे ‘दि एज्युकेशन कमिशन अँड आफ्टर’ हे अत्यंत महत्त्वाचे पुस्तक प्रसिद्ध झाले. १९८० मध्ये ‘सर्वांसाठी आरोग्य’ हे पुस्तक त्यांनी इंग्रजीतून लिहिले. १९७८ मध्ये जनता सरकार अधिकारावर असताना नाईकांनी ‘लोकांसाठी शिक्षण’ हा आराखडा तयार केला होता व तो त्यांना ५ वर्षांत साकार करावयाचा होता. दुर्दैवाने त्यांना अन्ननलिकेच्या कर्करोगाने गाठले व वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
१९९३-९४ मध्ये युनेस्कोने ‘थिंकर्स ऑन एज्युकेशन’ या शीर्षकाखाली सुमारे ४०० पृष्ठांचे ४ खंड प्रकाशित केले. त्यामध्ये गेल्या अडीच हजार वर्षांतील संपूर्ण विश्वातील प्रतिभावंत शिक्षणतज्ज्ञांची चरित्रे समाविष्ट आहेत. त्यामध्ये ग्रीक तत्त्ववेत्ता अॅरिस्टॉटलपासून अलिकडच्या काळातील पाउलो, फे्रेईरे, ईव्हान, इलीच आदींचा समावेश आहे. या संकलनात भारतामधील तीन विचारवंतांचा अंतर्भाव झाला आहे. ते म्हणजे महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर आणि जे. पी. नाईक. जे. पी. नाईक यांना १९६६ साली कर्नाटक विद्यापीठाने सन्माननीय डॉक्टरेट प्रदान केली होती. तर निधनोत्तर त्यांना भारत सरकारने पद्मभूषण उपाधी दिली.