Skip to main content
x

नारायणगावकर, विठाबाई भाऊ

जुन्या जमान्यातील प्रख्यात शाहीर पठ्ठे बापूराव यांचे शिष्य असणाऱ्या भाऊ खुडे यांचा ‘भाऊ-बापू मांग नारायणगावकर तमाशा मंडळ’ हा फड स्वातंत्र्यपूर्व काळात गाजलेला होता. विठाबाईंचा जन्म भाऊ व शांताबाई खुडे या तमाशा कलावंतांच्या पोटी पंढरपूर मुक्कामी झाला. विठाबाईंचे वडील भाऊसाहेब, काका बापू व सावळा, बहिणी मनोरमा, केशर आणि बंधू शंकर व पांडुरंग हे सारेच या फडात आपली कला पेश करत. शेलाट्या बांध्याच्या, उंच, गोर्‍या विठाबाईंना तमाशाचे बाळकडू असे घरातच मिळाले.

मामा वरेरकर यांच्या कलापथकात विठाबाई आठव्या वर्षी आपल्या बहिणी, भाऊ  व काका यांच्यासह सामील झाली. या पथकात चार वर्षे असताना अनेक लोकनाट्ये व नृत्याचे कार्यक्रम विठाबाईंनी महाराष्ट्रात व दिल्लीपर्यंत अन्यही राज्यांत केले. यामुळे लहान वयातच विठाबाईंना रंगभूमीचा उत्तम अनुभव मिळाला.

वयाच्या तेराव्या वर्षी १९४८ साली विठाबाई वडिलांच्या फडात परतली. बहिणी केशर आणि मनोरमा या लावणी गात असत, मात्र विठाबाईंनी नृत्याला प्राधान्य दिले आणि या फडात लावणी अधिक नाचलीही जाऊ लागली. विठाबाईंच्या नृत्यामुळे १९५० च्या सुमारास या फडाची लोकप्रियता अत्यंत वाढली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर फडाला आर्थिक स्थैर्यही लाभले होते. काका बापूसाहेबांना १९६१ साली संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते मिळाला, तेव्हा विठाबाईंनी राष्ट्रपतींसमोर नृत्य पेश केले. विठाबाईंनी १९६२ साली भारत-चीन युद्धादरम्यान नेफा सीमेवर आपल्या फडासह जवानांचे मनोरंजन केले होते.

विठाबाईची कारकीर्द भरात असताना हौसा-मंजुळा कोल्हापूरकर, काळू-बाळू कवलापूरकर, दादू इंदुरीकर, दत्तोबा तांबे-शिरोलीकर, दत्ता महाडिक-पुणेकर असे नावाजलेले फड होते. अंतर्गत मतभेदांमुळे ‘भाऊ-बापू मांग नारायणगावकर तमाशा मंडळ’ हा फड सोडून विठाबाईंनी स्वत:चा ‘विठा भाऊ मांग नारायणगावकर तमाशा मंडळ’ हा फड १९७० मध्ये सुरू केला. विठाबाईंनी ‘आईचं काळीज’, ‘रायगडची राणी’, ‘रक्तात न्हाली कुर्‍हाड’ अशी अनेक नवी वगनाट्ये बसवली, मात्र ‘मुंबईची केळीवाली’ हे त्यांचे सर्वाधिक लोकप्रिय वगनाट्य होते.

विठाबाईंचे रूप, अदा व नृत्य या सार्‍यांची प्रेक्षकांवर खूपच मोहिनी होती. विठाबाईंचे नाव ‘तमाशाची राणी’ म्हणून गाजू लागले.  विठाबाईंनी १९५० ते १९८० अशी तीन दशके तमाशाच्या क्षेत्रात एखाद्या सम्राज्ञीसारखी गाजवली. पुण्यात १९६८ साली भरलेल्या ‘अखिल भारतीय तमाशा परिषदे’च्या त्या स्वागताध्यक्षा होत्या. विठाबाईंच्या नृत्यकौशल्याचा वापर तमाशाबरोबरच चित्रपटांतही केला गेला. ‘कलगी तुरा’ (१९५५), ‘उमज पडेल तर’ (१९६०), ‘छोटा जवान’ (१९६३), ‘सर्वसाक्षी’ (१९७८) या चित्रपटांत त्यांनी नृत्ये केली होती.

तमाशात नाचताना ‘दौलतजादा’ घेताना वाह्यात प्रेक्षकांचे वात्रट इशारे, छेडछाड, धक्के आणि लगट या सार्‍यांस विठाबाई धीराने, चतुराईने तोंड देत. विठाबाईंना गावगुंडांचे असे अनेक अनुभव आले, मात्र या प्रसंगांना त्या अदब, हजरजबाबीपणा आणि करारी कठोरपणाने सामोऱ्या जात. पुढे तर विठाबाईंची खोड काढण्याची हिंमत कुणी करत नसे, असा त्यांचा दरारा होता. विठाबाईंची आपल्या कलेशी विलक्षण बांधीलकी होती. शिखर शिंगणापूरच्या जत्रेतील कार्यक्रमात, नऊ महिन्यांच्या गर्भवती असतानाही त्या फडात नाचत होत्या, आणि तिथेच त्या प्रसूत झाल्या! नाळ कापून विठाबाईंनी आपला कार्यक्रम पुढे चालू ठेवला, ही दंतकथा वाटावी अशी सत्य घटना आहे ! 

विठाबाईंनी मारुती सावंत ऊर्फ अण्णा मर्चंट यांच्याशी विवाह केला. पण तो संसार फारसा यशस्वी ठरला नाही. अशिक्षित विठाबाईंच्या भाबडेपणाचा गैरफायदा घेऊन तिचा सारा पैसा सावंतांनी हडप केला. एकीकडे विठाबाईंचे वय वाढत होते, तर दुसरीकडे तमाशातील व्यावसायिक समीकरणे आणि अभिरुचीही बदलू लागली होती. फड चालवणे बिकट होऊ लागले. विठाबाईंनी मोठी मुलगी मंगला आणि पुढे संध्या आणि भारती, मालती या मुलींना उभे केले, त्यामुळे फडाला थोडा आधार मिळाला. मात्र पुढे मुलींनी वेगळे फड काढल्याने हे सुख फार काळ टिकले नाही. फड कर्जबाजारी झाला. फड १९९० च्या सुमारास बंद करण्याचा निर्णय घेऊन विठाबाई निवृत्त झाल्या.

विठाबाईंना ‘विष्णुदास भावे’ पुरस्कार (१९८६), ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार, ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार (१९९०), ‘विखेपाटील’ पुरस्कार (१९९७), ‘जागतिक महिला दिन’ पुरस्कार, ‘लोकशाहीर भाऊ  फक्कड’ सन्मान, ‘अण्णाभाऊ  साठे’ पुरस्कार (२०००) इ. अनेक पुरस्कार मिळाले. त्या १९९६ सालच्या अखिल भारतीय दलित नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा होत्या. मुंबई दूरदर्शनवर ‘प्रतिभा आणि प्रतिमा’मध्ये त्यांची मुलाखत दाखवली गेली. ‘स्पॅरो’ या महिला अभ्यास संस्थेने विठाबाईंवर २००१ साली लघुपट काढला.

एके काळी तमाशातील अदाकारीने जो प्रचंड पैसा कमावला, त्या पैशांचा संचय मात्र विठाबाईंना करता आला नाही. परिणामी, आयुष्याच्या संध्याकाळचे दिवस तिला अतिशय खडतरपणे काढावे लागले. आर्थिक चणचण तर होतीच; परंतु वार्धक्यात त्यांना अनेक व्याधींनी घेरले. पत्रकार माधव गडकरी यांच्यासारख्या काही कलाप्रेमींनी विठाबाईंना आर्थिक साहाय्य मिळवून दिले. साहित्यिका दुर्गा भागवत आणि पंतप्रधान नरसिंह राव व अन्यही राजकारणी लोकांनी विठाबाईंना देणगी पाठवली, यामुळे उपचार चालू राहिले. मात्र दौर्‍यांच्या धांदलीत गेलेले आयुष्य, दारूचे व्यसन, पतीची मारहाण, बेछूट स्वभाव आणि हृदयविकार या साऱ्यांचा परिपाक म्हणून विठाबाईंचे शरीर क्षीण झाले होते. अखेरीस अर्धांगवायू आणि मेंदूज्वराच्या आजारामुळे विठाबाईंचे पुण्यात निधन झाले.

चैतन्य कुंटे

नारायणगावकर, विठाबाई भाऊ