Skip to main content
x

इंजिनिअर, मीनू मेरवान

        मीनू मेरवान इंजिनिअर यांचा जन्म मुंबईत झाला. ते त्यांच्या भावंडांमध्ये सहावे होते आणि त्यांचे दोन मोठे भाऊ सेनादलात अधिकारी होते. मीनू यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या एलफिन्स्टन महाविद्यालयात झाले. १ ऑगस्ट १९४० रोजी ते भारतीय वायुसेनेत वैमानिक म्हणून दाखल झाले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रह्मदेशातील युद्धात त्यांनी पहिल्या स्पिटफायर स्क्वॉड्रनचे  नेतृत्व केले. या युद्धातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना ब्रिटिश सरकारने डिस्टिंग्विश्ड फ्लाइंग क्रॉसदेऊन सन्मानित केले. हीच स्क्वॉड्रन १९४६ मध्ये जपानमध्ये कार्यरत असलेली एकमेव भारतीय स्क्वॉड्रन होती.

भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९४७ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये त्यांनी वायुसेनेचा पहिला तळ उभारला. याच काळात पाकिस्तानने भारतावर काश्मीरमध्ये हल्ला केला. तेव्हा विंग कमांडर असलेल्या मीनू इंजिनिअर यांच्या नेतृत्वाखाली वायुसेनेने केलेल्या कामगिरीने किशनगंगा पूल, स्कारडू, गिलगित या भागात शत्रूला रोखण्यात भारताला यश आले.  गुराईसचा प्रदेश पुन्हा जिंकून घेतानाही भूसेनेला वायुसेनेची खूप महत्त्वाची मदत झाली. या काळात दाखविलेल्या असामान्य धैर्य व गाजविलेल्या पराक्रमाबद्दल त्यांना महावीरचक्रदेण्यात आले.

१९६२ मध्ये त्यांची पूर्व विभागाचे सीनियर एअर स्टाफ ऑफिसरम्हणून विशेष नियुक्ती झाली. याच काळात चीनने भारतावर हल्ला केला. उपलब्ध असलेल्या अत्यंत कमी साधनसामग्रीच्या बळावर त्यांनी भारतीय भूसेनेला वायुसेनेचे उत्तम पाठबळ उपलब्ध करून दिले. या काळातील त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना परमविशिष्ट सेवा पदकदेऊन गौरविण्यात आले.

१९६५ मध्ये त्यांची नियुक्ती वायुसेना मुख्यालयात वायुसेनेचे उपप्रमुख म्हणून केली गेली. १९६९ मध्ये वायुसेनेच्या पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. १९७१ च्या युद्धात पाकिस्तानी इलाख्यात खोलवर मुसंडी मारून हवाई हल्ले करण्याच्या त्यांच्या रणनीतीचा भारताला खूप फायदा झाला. ३ व ४ डिसेंबर रोजी त्यांनी केलेल्या हल्ल्यांमुळे युद्धाचे पारडे भारताच्या बाजूने निर्णायकरीत्या झुकले. त्यांच्या या उत्कृष्ट युद्धनेतृत्वाबद्दल १९७२ मध्ये त्यांना पद्मभूषणदेऊन सन्मानित करण्यात आले. वायुसेनेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी एका जाहिरात संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम सुरू केले. तेथेही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. १९९० मध्ये महाराष्ट्र गौरव पुरस्कारदेऊन महाराष्ट्र सरकारने त्यांचा सन्मान केला.

-  राजेश प्रभु साळगांवकर

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].