Skip to main content
x

कदम, लक्ष्मण बळवंत

अण्णासाहेब कदम-पाटील

     लक्ष्मण बळवंत कदम यांचा जन्म देवळाली प्रवरा येथील पाटील घराण्यात झाला. लहान वयातच पितृछत्र हरवल्यामुळे त्यांना शिक्षण अपुरे सोडावे लागले. त्यानंतर पाचशे एकराची जमीनदारी, चार बंधू, चार भगिनी, मोठे कुटुंब आणि देवळाली प्रवरा गावची पाटीलकी ही सर्व जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. ती पार पाडताना त्यांना सामाजिक बांधिलकीचेही भान होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते कट्टर स्वयंसेवक होते. तसेच, त्यांचा विविध विचारांच्या व्यक्तींशी, इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांशीही संपर्क राहिला. १९४६ मध्ये मुळा नदीला आलेल्या महापूरात अनेक गावे वाहून गेली. कुटुंबे निराधार झाली. त्या वेळी देवळाली प्रवरा गावातून पूरग्रस्तांना अन्न पुरवण्याचे काम अण्णांनी केले. त्यांनी १९५२ च्या दुष्काळात संघाच्या जनकल्याण समितीमार्फत व्यापक कार्य केले. त्या वेळी ते राहुरी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष होते. या कारखान्याने दुष्काळात जनावरांसाठी उभारलेली छावणी विशेष प्रशंसेस पात्र ठरली होती.

     अण्णांचा राजकीय क्षेत्राशी जवळून संबंध आला; पण त्यांचा मूलपिंड नेहमीच समाजकारणाचा राहिला. इंदिरा गांधींनी देशभर आणीबाणी लादली, तेव्हा जिल्ह्यातील १५० कार्यकर्त्यांना मिसाखाली बेमुदत तुरुंगात टाकण्यात आले. या वेळी बंदिवानाच्या कुटुंबासाठी त्यांनी मदतकार्य केले. त्या वेळेस अण्णांनाही अटक करण्यात आली. तेव्हा त्यांचा चंपालाल सांड यांच्याशी संबंध आला व तेथेच शेतकऱ्यांच्या हितासाठी किसान संघाची स्थापना करण्याचे ठरले; ४ डिसेंबर १९७७ मध्ये किसान संघाची स्थापना झाल्यावर या संघाचे पहिले प्रांत अध्यक्ष होण्याचा मान अण्णांना मिळाला. भारत विरुद्ध चीन व पाकिस्तान यांनी पुकारलेल्या युद्धात संरक्षणनिधी उभारण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले.

     अण्णांचे राहुरी सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत मोठे योगदान होते. तेव्हा त्यांनी ठेवींच्या व्याजावर विवेकानंद नर्सिंग होमची स्थापना केली. त्यांनी या संस्थेद्वारा ग्रामीण भागात चांगल्या आरोग्यसुविधा उपलब्ध करून दिल्या. ते बाजारसमितीचे संचालक असताना गुळाचा भाव एकदम घसरला, याची चौकशी करण्यासाठी आलेल्या समितीसमोर त्यांनी ऊस व गूळ उत्पादकांचे गाऱ्हाणे प्रभावीपणे मांडले. लोककल्याणाची, शेती व ग्रामविकासाची कामे करीत कर्तृत्वाचा वेगळा ठसा त्यांनी उमटवला. त्यांच्या विचारांचा, कार्याचा वारसा त्यांच्या नावाने स्थापन झालेले अण्णासाहेब कदम-पाटील प्रतिष्ठान पुढे चालवित आहे.

- अनिल सुधाकर देशपांडे

कदम, लक्ष्मण बळवंत