Skip to main content
x

मोरे, दिनकर रघुनाथ

दिनाभाई मोरे

     दिनकर रघुनाथ मोरे यांचे मूळ गाव रोहा तालुक्यातील सोनगाव. त्यांनी ५ वर्षे प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी केली पण आपण आपली शैक्षणिक गुणवत्ता वाढवली पाहिजे, असा विचार करून नोकरीचा राजीनामा दिला. मुंबई येथे शिक्षण पूर्ण करून सानेगावच्या परिसराचा विकास घडवून आणण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून परत शैक्षणिक व सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देऊन कार्यास प्रारंभ. काही काळ जिल्हा सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम केले. या कालावधीत ‘ग्रामीण भागाच्या विकासासाठी शिक्षण आवश्यक आहे’ याची जाणीव झाल्यानंतर ठिकठिकाणी ऐच्छिक शाळा सुरू करून खेड्यापाड्यातून शिक्षणाचा प्रसार करण्याचे व्रत अंगिकारले. तसेच सर्वोदय योजनेअंतर्गत आरोग्य, शेतीसुधार, जपानी पद्धतीच्या भातशेतीसाठी प्रशिक्षण या योजनांची कार्यवाही करण्याचा प्रयत्न दिनाभाईंनी केला.

     १९५४ ते १९६३ या कालावधीत ते सानेगावचे सरपंच होते. रोहा पंचायत समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काही काळ कार्य केले आहे. प्राथमिक शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षण प्राप्त झाले पाहिजे यासाठी दिनाभाई सातत्याने प्रयत्नशील होते. ही कल्पना प्रत्यक्षात यावी यासाठी त्यांनी आपल्या गावी १९६९ मध्ये ‘विद्याविकास मंडळ सानेगाव’ या शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फत १९७० मध्ये ‘साने गुरुजी विद्या निकेतन’ ही माध्यमिक शाळा सुरू केली. या शाळेच्या इमारतीसाठी कुंडलिका नदीच्या काठी एक हेक्टर जमीन शासनाकडून मिळवली. तेथे १४ खोल्यांची इमारत बांधली व शाळेस आवश्यक त्या सुविधा प्राप्त करून दिल्या. आज रोजी शाळेत ५ वी ते १० वी चे ११ वर्ग आहेत. विद्यार्थी संख्या ५०० आहे.

      सानेगाव येथील शाळा सुव्यवस्थितपणे मार्गक्रमण करू लागल्यानंतर दिनाभाईंनी १९८० मध्ये सुडकोली (ता. अलिबाग) येथे सर्वोदय विद्यालय या नावाने दुसरे विद्यालय सुरू केले. १९८२ मध्ये मुरूड तालुक्यात चोरले या गावी त्यांनी ‘महात्मा गांधी विद्यामंदिरा’ची स्थापना केली.

      ११ जून २००० रोजी साने गुरुजी स्मृती दिनानिमित्त आरे व तिसे ता. रोहा या दोन गावी माध्यमिक शाळा सुरू केल्या. या सर्व शाळा अनुदानित असून त्यांच्या इमारती बांधून पूर्ण झाल्या आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी शासकीय योजनेतून १ ली ते १० वी  पर्यंत शिक्षण देणारी आश्रम शाळा सानेगाव येथे स्थापन व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. या शाळेत बालवाडी ते १० वी पर्यंत आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

       शाळांच्या इमारती पूर्ण व्हाव्यात व विद्यार्थ्यांना विविध सुविधा प्राप्त व्हाव्यात यासाठी दिनाभाईंनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने देणग्या जमवून व वेळप्रसंगी कर्ज काढून त्या उपलब्ध करून दिल्या आहेत.  सानेगाव परिसर व रोहा तालुक्यातील इतर गावातून माध्यमिक शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी दिनाभाई आपल्या सहकाऱ्यांच्या सहाय्याने करीत आहेत. आता या कार्यात ग्रामस्थ व सर्व सामान्य कार्यकर्ते यांचे सर्वप्रथम सहकार्य प्राप्त होत आहे.

- यशवंत ब. क्षीरसागर

मोरे, दिनकर रघुनाथ