Skip to main content
x

पाटील, सातगोंडा रेवगोंडा

आप्पासाहेब पाटील

सातगोंडा रेवगोंडा पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील जांभळी या गावी शेतकरी कुटुंबात झाला. त्यांना लहानपणापासून शेतीची आवड असल्यामुळे वडिलांसोबत वयाच्या 13-14 व्या वर्षापासून ते शेतीची सर्व कामे करू लागले. त्यांनी कुस्ती आणि मलखांब खेळून उत्कृष्ट शरीरयष्टी कमावली. त्यांच्याठायी अफाट कष्ट करण्याची तयारी आणि जिद्द होती.

मित्रपरिवार मोठा असल्याने त्यांना आपोआप समाजवादाचे धडे मिळाले. सहकाराचा प्रसार आणि बोलबाला महाराष्ट्रात पुढे झाला, पण पाटील यांनी 1946 मध्ये जांभळी गावातील शेतकर्‍यांना एकत्र आणून सेवा सोसायटीची स्थापना केली होती. गांधीजींच्या विचाराने प्रभावित झाल्यामुळे त्यांनी ग्रामस्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी निर्धाराने प्रयत्न केला. त्यांची 1951 मध्ये शिरोळ तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या व्यवस्थापकपदी निवड झाल्याने त्यांचे तालुकापातळीवर काम सुरू झाले. या दरम्यानच सुरू झालेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी भाग घेतला. ते साने गुरुजी, मधु दंडवते, अच्युतराव पटवर्धन, एस.एम.जोशी, नानासाहेब गोरे, ग.प्र.प्रधान आदींच्या सान्निध्यात आले आणि या नेत्यांची साधी राहणीही त्यांच्यात उतरली. ते साने गुरुजींचे साधना साप्ताहिक व राष्ट्र सेवा दल या चळवळीत कार्यरत होते. त्यांना 1957 च्या विधानसभेच्या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीने शिरोळमधून उमदेवारी दिली होती. त्यांनी या चळवळीच्या निमित्ताने ‘इंद्रधनुष्य’ हे दैनिक कोल्हापुरातून सुरू केले. त्यांना 1999 मध्ये आणि 2009 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकात जनतेने निवडून दिले. त्यांनी शिरोळ्याला श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत मोलाचा वाटा उचलला. ते या कारखान्याचे संस्थापक असून अध्यक्ष-उपाध्यक्ष-संचालक अशा जबाबदार्‍याही त्यांनी पार पाडल्या. त्यांनी या कारखान्याच्या स्थापनेपूर्वी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील नद्यांना उपलब्ध असलेले पाणी विचारात घेऊन सहकारी तत्त्वावर 20 पाणीपुरवठा योजनांची सुरुवात केली.

पाटील यांनी राजकारणातील कामगिरीसाठी एस.एम.जोशी-दंडवते-पटवर्धन आदींपासून स्फूर्ती   मिळाली होती, तशीच सहकार क्षेत्रातील कामागिरीसाठी धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता आदींकडून स्फूर्ती घेतली. सहकार क्षेत्रातील राज्य भूविकास बँक, राज्य सहकारी संघ यांवर संचालक म्हणूनही त्यांनी काम केले आणि जयसिंगपूर उदगाव सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष होते. उदगाव तांत्रिक विद्यालय, जांभळी विद्यालय यांची स्थापना करून त्यांनी शिक्षण क्षेत्रावरही आपला ठसा उमटवला. शेती हा त्यांचा पहिल्यापासूनच आवडीचा विषय असल्याने शेतीमधील नव्या तंत्रज्ञानाबाबत ते कायम आग्रही असत. त्यामुळे त्यांना नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार व अवलंब करणे सहज शक्य होई. पाटील यांना वयाच्या 89 व्या वर्षी यशवंतराव चव्हाण कृषी-औद्योगिक समाजरचना पुरस्कार देऊन उचित सन्मान करण्यात आला.

- संपादित

पाटील, सातगोंडा रेवगोंडा