रानडे, दिलीप गोविंद
जीवनातील कठोर वास्तव आणि मनोव्यापाराचे अद्भुत जग यांच्या सीमारेषेवर रेंगाळणारा अनुभव देणारी रेखाटने व निष्ठापूर्वक अनेक वर्षे चित्रनिर्मिती करणारे चित्रकार म्हणून दिलीप रानडे चित्रकला जगतात ज्ञात आहेत. त्यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांचे आईवडील मूळचे कोल्हापूरचे; शास्त्रात रस असणारे तसेच लिखाण, चित्रकला यांची आवड असणारे होते. कलेचे वातावरण असणारे असे त्यांचे घर होते. नंतर ते मुंबईत स्थिरावले. कधी कामावरून येताना वडील गणपतीच्या कारखान्यातून शाडूची माती आणीत असत, तेव्हा दुसरी, तिसरी इयत्तेत असणारे रानडे गणपती साकारीत. वडिल प्रोत्साहन, मार्गदर्शन करीत. रानडे यांचे नंतर अंबरनाथ येथे वास्तव्य होते. परंतु कलेच्या परीक्षेचे वर्ग ठाण्याच्या शाळेत असल्याने ठाण्याच्या शाळेत प्रवेश घेऊन त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. सातवीमध्ये असताना शिक्षकांनी त्यांस ‘शाळा’ या विषयावर स्मरणचित्र काढावयास सांगितले होते. त्या वेळेस शाळेची प्रतिमा, शाळेत जाणारा विद्यार्थी असे सांकेतिक चित्र न रेखाटता शालेय जीवनातील विविध क्षण त्यांनी एकाच चित्रात चित्रित केले.
दिलीप रानडे यांनी शालेय शिक्षण पूर्ण करून सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला आणि १९७१ मध्ये रेखा व रंगकला पदविका अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर ते छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय मुंबई येथे आर्टिस्ट व मॉडेलर या पदावर नोकरी करू लागले. १९७७ मध्ये त्यांचा विवाह स्मिता प्रभाकर परांजपे यांच्याशी झाला. १९८४ मध्ये त्यांना इंडो-यूएस सब कमिशनची शिष्यवृत्ती मिळाली व त्यांनी संग्रहालय शास्त्राचा अमेरिकेत अभ्यास केला.
रानडे यांनी १९७२ मध्ये जहांगीर आर्ट गॅलरीत समूह प्रदर्शनात भाग घेतला होता. चित्रकार वाघेला व प्रभाकर बरवे ते प्रदर्शन पाहण्यास आले असताना झालेल्या चर्चेमधून चित्रकार बरवे आणि दिलीप रानडे यांच्या मैत्रीची सुरुवात झाली. रानडे यांना त्या वेळी नोकरी, व्यवसायाची गरज होती आणि त्याबरोबरच कलेच्या क्षेत्रात पूर्णवेळ चित्रनिर्मिती करण्याची आसही होती. त्यात बर्वे यांचा बहुमोल सल्ला मार्गदर्शक ठरला.
प्रामाणिकपणे नोकरी, व्यवसाय करून माणसातील कलाकार जिवंत राहू शकतो, याबद्दलचा विश्वास बरवे यांच्या सहवासात रानडेंच्या मनावर ठसला. संग्रहालयात काम करत असताना शिस्त, निरीक्षण व कौशल्य याचे महत्त्व त्यांच्या लक्षात आले. विविध कलाशाखा व तंत्रांचा अभ्यास होत गेला व यातून एक वेगळ्या प्रकारचा दृष्टिकोन विकसित झाला. टॅक्सीडर्मी सारख्या मृत प्राण्यांच्या शरीरात पेंढा भरण्याच्या कामातील कौशल्य, ग्रंथालयांतील पुस्तकांचे वाचन यांमुळे कलाविषयक मते तयार झाली. रानडे यांच्यावर फ्रान्झ काफ्का या लेखकाच्या ‘कासल’, ‘ट्रायल’ या पुस्तकांचा प्रभाव पडला. त्या वेळी त्यांचा रंगभूमीशी आलेल्या संबंधांतून त्यांचे विचार, आचार स्थिरावले.
म्युझियममधील नॅचरल हिस्टरी या विभागात काम करीत असताना तेथे डायरामा पेन्टिंग, स्टफिंग, मोल्डिंग अशा विविध कामांमध्ये त्यांनी रस घेऊन काम केले. तेथील तंत्र, रचना, कामाची पद्धत यांचा सखोल अभ्यास केला त्यामुळे तांत्रिकदृष्ट्याही त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रगल्भ होत गेले.
नेहरू सायन्स सेंटरमधील इन्क्युबेटरमध्ये जन्मास आलेल्या मोराचे एकदा स्टफिंग करावयाचे होते. त्याची नैसर्गिक ढब मिळवण्यासाठी मोराचे संपूर्ण रेखाटन, रंग, शरीर रचना यांचा रानडे यांनी सखोल अभ्यास केला. आवश्यकतेप्रमाणे काही साचे, नैसर्गिक रंग तयार करणे व ते रंगविणे अशा प्रसंगांतून रानड्यांचे व्यक्तिमत्त्व घडत गेले व या सर्व गोष्टी त्यांच्या कामातून अप्रत्यक्षपणे व्यक्त होऊ लागल्या. रानडे यांनी कलावंत म्हणून जगताना सुरुवातीपासूनच काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या. त्यापैकी एक म्हणजे ते १९७७ पासून दररोज एकतरी ड्रॉईंग ते करतात. त्यांच्या अशा १९७७ ते २००७ या काळातील निवडक रेखाचित्रांचे ‘क्लिपिंग ऑफ द लॉजीक’ या नावाने मुंबई, दिल्ली व कलकत्ता येथे प्रदर्शन झाले. चित्रनिर्मिती करताना दैनंदिन जीवनातून अनुभवाला येणारे काल्पनिक विश्व लोकांसमोर मांडणे रानडे यांना महत्त्वाचे वाटते. कल्पनाशक्ती आणि सभोवतालचे अवकाश व आकार हे त्यांच्या व चित्रांतील महत्त्वाचे घटक आहेत.
सध्या ते छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात सीनीयर क्युरेटर व एक्झिबिशन कन्सलटंट म्हणून कार्यरत आहेत. वस्तू संग्रहालयातील नॅचरल हिस्टरी विभागातील मॉडेलर ते सीनियर क्युरेटर या प्रवासात त्यांनी आपली साहित्य व संगीत अशा कलांची आवड जोपासली व अनुभूती, हेतुशुद्धता, प्रामाणिकपणा व आदर्श ही मूल्येही जपली. स्वतःमधील चिंतनशील कलाकार त्यांनी अशा प्रकारे जिवंत ठेवला.
त्यांची एकल प्रदर्शने, व वीस समूह प्रदर्शने मुंबई, दिल्ली, कोलकाता, कोरिया अशा अनेक ठिकाणी झाली आहेत. स्वत:च्या समृद्ध अनुभवांतून समाजाशी, विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यास ते उत्सुक असतात. विविध लेख, चर्चासत्रे, व्याख्याने, यातून डायरामा मेकिंग, व्यक्तिचित्रण या विषयांवर ते व्याख्याने देतात. आधुनिक कलेची जाण समाजात येणे आवश्यक आहे, तसेच चित्रनिर्मितीबरोबर चित्र जोपासची जाणीवसुद्धा आवश्यक आहे असे त्यांना मनापासून वाटते व त्यासाठी रानडे नेहमीच प्रयत्नशील असतात.
- प्रा. ज्योत्स्ना पाठारे