Skip to main content
x

ठाकूर, विनायक हरिश्चंद्र

       विनायक हरिश्चंद्र ठाकूर हे मुंबईतील गिरगावमधील आर्यन एज्युकेशन सोसायटीचे आद्य संस्थापक. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार हेच एक प्रभावी साधन आहे या विचारातून बॅ. मुकुंदराव जयकर, रा. श्री. नवलकर, रघुनंदन कोठारे, शां. स. त्रिलोकेकर अशा आपल्या समविचारी, विचारवंत, शिक्षणप्रेमी मित्रांच्या सहकार्याने ठाकूर यांनी ह्या संस्थेची स्थापना केली.

      ३ जून १८९७ रोजी शाळा सुरू केली तेव्हा इयत्ता चवथी ते सातवी पर्यंतच्या शिक्षणाची सोय करण्याचा विचार होता. संस्थेच्या कार्यकारी सभासदांनी तीन वर्षे अध्यापन करण्याचे ठरविले होते. सर्वजण पदवीधर होते. शाळेचा खर्च वजा जाता उरलेल्या रकमेतून जास्तीत जास्त तीस रुपये वेतन त्यांना मिळणार होते. शाळेला तोटा आल्यास तो भरून काढण्यासाठी प्रत्येकाने दहा रुपये वर्गणी आगाऊ द्यावयाची होती. गरीब व मध्यमवर्गीयांना झेपेल एवढाच फी दर होता. मातृभाषा, धार्मिक शिक्षणाचा पुरस्कार करावयाचा होता. पण या सर्व सदस्यांचा आत्मविश्वास दांडगा होता. पदवी परीक्षेत ह्या सर्वांनाच श्रेष्ठ दर्जाचे यश मिळालेले होते. वर्तमानपत्रांतही शाळेची जाहिरात दिली होती. २० विद्यार्थ्यांना नादारीचा लाभ, प्रत्येक वर्गातील पहिल्या दोन विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती, गुरुशिष्यांमध्ये प्रेमाचे नाते राखणे, शिस्तीला प्राधान्य देणारी शाळा अशी जाहिरात होती.

      परिणामत: शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रवेशासाठी रीघ लागली. पटसंख्या दोनशे पन्नासच्या वर गेली. पंधरा दिवसांतच ती पाचशे झाली. त्याच वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात पहिली ते तिसरीच्या वर्गांचीही सोय करावी लागली. या प्रगतीचे सर्व श्रेय आपल्या मित्रांना आवाहन करून शाळेसाठी एकत्र आणणार्‍या ठाकूर यांचे होते. ते गणित व विज्ञानाचे उत्कृष्ट अध्यापक होते. इंग्रजी भाषेवर उत्तम प्रभुत्व होते. पण फक्त शाळेत काम करून मिळणार्‍या पगारावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होणे कठिण होते. म्हणून त्यांना महसूल खात्यातील नोकरी स्वीकारावी लागली. तरीही संस्था व शाळेबद्दलच्या प्रेमाने ते जमेल तितका वेळ देत असत.

     नोकरीतील बदलीच्या निमित्ताने ते जेथे जेथे गेले तेथे त्यांचे शिक्षणप्रसाराचे काम सुरू होते. बोरसदला असताना गावातील धनिकांकडून तेथील शाळेसाठी पैसे जमवून ती शिक्षणसंस्था आदर्श करण्याचे प्रयत्न त्यांनी केले.

- वि. ग. जोशी

ठाकूर, विनायक हरिश्चंद्र