Skip to main content
x

उपळेकर, गोविंद रामचंद्र

 

सातारा जिल्ह्यातील फलटण गावात होऊन गेलेले संत काकामहाराज उपळेकर यांचे एकूण जीवन एखाद्या नाटक-चित्रपटासारखे थक्क करणारे आहे. अनेक वर्षे युरोपमध्ये ब्रिटिश सेनादलात सर्जन म्हणून काम करणारा व आपल्या कार्याने ब्रिटिशांकडून अनेक सुवर्णपदके-गौरव प्राप्त करणारा एक उच्चशिक्षित डॉक्टर अचानक एके दिवशी सारे सोडून आध्यात्मिक क्षेत्राकडे वळतो आणि या क्षेत्रातील साक्षात्कारी सत्पुरुष होतो हे परिवर्तन थक्क करणारे आहे. काकामहाराज उपळेकर यांचे पूर्ण नाव गोविंद रामचंद्र उपळेकर असे असून त्यांचे वडील रामचंद्रपंत हे फलटण येथे वकिली करीत होते. त्यांच्या आईचे नाव अंबाई होते.

उपळेकर हे घराणे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील उपळाईया गावचे. एक सत्शील-धर्मपरायण घराणे म्हणून उपळेकर घराची फलटणमध्ये ख्याती होती. अशा या धर्मपरायण कुटुंबात काकामहाराज ऊर्फ गोविंद यांचा जन्म झाला. काकामहाराजांना पाच भाऊ व दोन बहिणी होत्या.

छोटा गोविंद हा प्रखर बुद्धिमान होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण फलटण येथेच मुधोजी विद्यालयात झाले. माध्यमिक शिक्षणासाठी वडिलांनी त्यांना पुण्याला पाठविले. पुण्यातील नू..वि या नामवंत विद्यालयात काकांचे माध्यमिक शिक्षण झाले. प्रत्येक परीक्षा ते गुणवत्तेसह प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले.

आई-वडिलांची इच्छा गोविंदने डॉक्टर व्हावे अशी होती. त्यामुळे त्यांनी पुण्याच्या बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. १९१० साली विशेष प्राविण्यासह त्यांनी डॉक्टरची पदवी मिळवली. पुढे सैन्यदलात डॉक्टर म्हणून सेवा करावी असा सर्वानुमते निर्णय झाला आणि ब्रिटिश सेनादलात एक एतद्देशीय डॉक्टर भरती झाला. १९१३ साली काकांचे छ. शिवाजी महाराजांचे गुरू दादोजी कोंडदेव यांच्या घराण्यातील दुर्गाबाई यांच्याशी लग्न झाले.

काका, डॉक्टर म्हणून सेनादलात गेल्यानंतर काही महिन्यांतच महायुद्धाचा वणवा पेटला. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी डॉक्टर उपळेकरांची युरोपमध्ये प्रत्यक्ष रणभूमीवर बदली केली. युद्धातील जखमींवर तत्काळ उपचार करणे, गरजेनुसार शस्त्रक्रिया करणे हे काम डॉ. उपळेकरांकडे होते. या काळात एक कुशल सर्जन म्हणून काकांनी केलेल्या कार्याचे ब्रिटिश सेनाधिकार्यांनी , त्यांना विशेष सेनापदके व सुवर्णपदके देऊन कौतुक केले. पुढे काकांची बदली युरोपातून आफ्रिकेत करण्यात आली. इथेही काकांनी आपल्या वैद्यकीय कुशलतेने सर्वांची वाहवा मिळविली.

यानंतर काकांच्या जीवनात अनपेक्षित परिवर्तन घडले. आफ्रिकेतील रणांगणावरील तंबूतून एका सकाळी काका बाहेर पडले आणि आकाशाकडे एकटक पाहत असताना त्यांची एकाएकी समाधी लागली. त्यांना एका साधूची तेजोवलयांकित दिगंबर मूर्ती दिसली. कानी एक मंत्र पडला, ‘ब्रह्मारंध्रकृत उत्थाना प्रणशक्ति अथ असुरम!या अनपेक्षित अनुभवाने काका अंतर्मुख झाले व सतत चिंतनमग्न राहू लागले.

तो दिगंबर साधू काकांना पुन्हा पुन्हा दृष्टान्तात भेटून मार्गदर्शन करीत राहिला. एके दिवशी त्याने दृष्टान्त दिला आणि चल, आता लवकर निघ ,’ असा आदेश दिला. पण या काळात इथून भारतात जायला रजा कशी मिळणार? असा काकांपुढे प्रश्न उभा राहिला. काकांना पुन्हा त्या साधूचा दृष्टान्त झाला, ‘चल, मार्ग मोकळा झाला आहे.काही अतर्क्य घटना घडून वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला व काकांना भारतात येण्याची संधी मिळाली. काका फलटणला गेले व आपले मित्र रानडे यांना त्यांनी सर्व घटनाक्रम सांगितला. रानडे हे योगी हरिबाबांचे भक्त होते. ते काकांना घेऊन पुसेेसावळी येथे गेले आणि तेथील नदीकाठच्या स्मशानभूमीजवळ राहणाऱ्या श्रीकृष्णदेवयांना भेटले. श्रीकृष्णदेवांना पाहताच काकांना ओळख पटली. हाच तो दिगंबर साधू, जो मला वारंवार दर्शन देतो व मार्गदर्शन करतो.काकांनी श्रीकृष्णदेवांना नमस्कार केला. तेव्हा काकांच्या डोक्यावर हात ठेवून, ‘‘आता हा आलाय. मी सर्व त्याच्या स्वाधीन करून मोकळा होतो,’’ असे ते म्हणालेे आणि काका समाधी अवस्थेत गेले. काकांना श्रीकृष्णदेवांपाशी सोडून रानडे फलटणला परतले. यानंतर काका देहभावनाच न उरल्यामुळे विदेही अवस्थेतच वावरू लागले. त्यांचे चाळे पाहून लोक त्यांना वेडाम्हणू लागले. घरच्यांनीही डॉक्टरला दाखविले; पण त्यांनी, ‘काका वेडे नाहीतअसा निर्वाळा दिला. काकांना तीर्थयात्रा करून काही काळ अज्ञातवासात राहण्यास गुरू श्रीकृष्णदेव यांनी सांगितले. तीर्थयात्रेनंतर काका एका वेगळ्या सिद्धावस्थेतच परतले. त्यांचे ज्ञानेश्वरी, हरिपाठ आदींवर प्रवचन, लेखन सुरू झाले. काकांच्या नावावर २२ ग्रंथ आहेत. ते ग्रंथ त्यांच्या आध्यात्मिक चिंतनाचे नवनीत आहे.

ज्ञानेश्वरी सुबोधिनी’, ‘हरिपाठ सांगातीहे ग्रंथ साधकाचे-उपासकाचे दीपस्तंभ आहेत. काकांच्या जीवनावर श्री भवानीशंकर मंजेश्वर यांनी लिहिलेले द महर्षी’ (The Maharshi) पुस्तक काकांच्या आध्यात्मिक अधिकाराचे विराट दर्शन आहे.

काका सर्वांना ज्ञानदेवांचा हरिपाठ वाचण्यास आग्रहाने सांगत. पंचरत्नी हरिपाठहा काकांचा आवडता विषय होता. अखेरच्या काळात ते ‘‘आता आवराआवर चालली आहे,’’ एवढेच म्हणत निर्वाणाची सूचना देत होते. आपल्या निर्वाणाच्या तिथीला काकांनी  दिवसभर मौन पाळले आणि सायंकाळी बैठकीवर एकाग्र चित्ताने समाधी लावून या नश्वर जगाचा निरोप घेतला. फलटण येथे त्यांचे समाधी मंदिर आहे.

- विद्याधर ताठे

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].