Skip to main content
x

वाईरकर, प्रभाकर परशुराम

      जवरच्या मराठीमधील राजकीय टीकाचित्रकारांहून संपूर्णपणे वेगळी रेखाटनशैली असलेले व ज्यांच्या कलाकृतींची कीर्ती मराठी भाषेची मर्यादा ओलांडून भारतभरच नव्हे, तर विदेशांतही गेली आहे असे मराठी व्यंगचित्रकार म्हणजे प्रभाकर वाईरकर. मालवण तालुक्यातील कट्टा येथे जन्मलेल्या प्रभाकर परशुराम वाईरकरांचे शालेय शिक्षण मालवण येथे झाले. तेथून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्या वेळच्या चारचौघा कोकणवासीयांप्रमाणे गिरणी कामगार होण्याचे स्वप्न डोळ्यांसमोर ठेवून ते मुंबईला आले. पण गिरणीमध्ये मिळालेली नोकरी आजारी पडल्यामुळे त्यांना सोडावी लागली. तेव्हा त्यांनी चित्रकलेचा रस्ता पकडला.

अर्धवेळ नोकरी व अर्धवेळ दादरच्या चित्रकला महाविद्यालयात शिक्षण, अशा खडतर जीवनक्रमानंतर शासकीय उपयोजित कला पदविका (जी.डी. आर्ट- कमर्शियल) हस्तगत केली व त्यानंतर पूर्णवेळ चित्रकार म्हणून एका जाहिरातसंस्थेमध्ये त्यांनी व्यावसायिक जीवनाला सुरुवात केली. ‘सौभाग्य’, ‘सिस्टास’, ‘त्रिकाया’ अशा जाहिरातसंस्थांमधून प्रवास करीत त्यांनी ‘रीडिफ्यूजन’ या ख्यातनाम व भारतातील अग्रेसर जाहिरात संस्थेमध्ये स्वत:च्या गुणवत्तेच्या जोरावर वरिष्ठ कथाचित्रकार (सीनियर इलस्ट्रेटर) या पदापर्यंत मजल मारली.

महाविद्यालयामध्ये शिकत असताना, राममोहन या प्रख्यात व्यंगचित्रकार (अ‍ॅनिमेशन) निर्मात्याकडे वाईरकरांनी काम केले व त्यातून त्यांना व्यंगचित्रांची आवड निर्माण झाली. जाहिरातसंस्थांमधील चित्रकाराचे काम मूलत: सांघिक स्वरूपाचे असते व कथाचित्रकार (इलस्ट्रेटर) हा त्या साखळीमधील एक दुवा असतो. त्याच्या स्वतंत्र प्रज्ञेला (ओरिजिनॅलिटी) फारसा वाव असत नाही या अनुभवजन्य जाणिवेने वाईरकरांना स्वतंत्रपणे व्यंगचित्रनिर्मितीची प्रेरणा दिली. आणि या प्रेरणेने त्यांच्यामधला व्यंगचित्रकार घडवला.

या जडणघडणीच्या पहिल्या टप्प्यात वाईरकरांनी ‘अक्षर’ दिवाळी अंकासाठी अर्कचित्रे दिली. ती छापून आली. त्यानंतर ‘लोकसत्ता’ने त्यांचे एक व्यंगचित्र छापले आणि तेथून त्यांची व्यंगचित्रकार म्हणून कारकीर्द सुरू झाली.

‘एकच षटकार’, ‘महानगर’, ‘आवाज’ इत्यादी मराठी नियतकालिकांमधून त्यांची चित्रे तर येऊ लागलीच; पण त्या बरोबरीने ‘इंडियन एक्स्प्रेस’, ‘टाइम्स ऑफ इंडिया’, ‘इंडियन पोस्ट’, ‘दि इण्डिपेण्डन्ट’, ‘ब्लिट्झ’, ‘डेली’, ‘मिड-डे’ अशा प्रख्यात इंग्रजी वृत्तपत्रांमधूनही ती सातत्याने प्रसिद्ध होऊ लागली. इंग्रजीमधील त्यांच्या या विपुल निर्मितीमुळे त्यांचे नाव मराठीपुरते मर्यादित न राहता, इंग्रजी वृत्तपत्रजगात व त्यातून भारतीय पातळीवर पोहोचले. साहजिकच त्यांच्या व्यंगचित्रांचे विषय महाराष्ट्रीय सीमेमध्ये मर्यादित न राहता, त्यांना अखिल भारतीय व काही वेळा जागतिक परिमाण प्राप्त झाले. मराठी व्यंगचित्र क्षेत्रातले हे कदाचित एकच उदाहरण असेल. वाईरकरांना ते गौरवास्पद आहे.

परिणामी, त्यांची काही व्यंगचित्रे ‘Karikaturen und Zeichnugen’ या जर्मन, तर ‘Salon International Du Depresse Et D'humor   या फ्रेंच नियतकालिकांनी छापली, तर ‘द इंटरनॅशनल पोलिटिकल कार्टून्स ऑफ अवर टाइम्स १९९२-९३-९४’ या अमेरिकन संग्रहामध्ये समाविष्ट केली गेली.

याशिवाय, ‘सलोन इंटरनॅशनल’ या संस्थेच्या जागतिक पातळीवरील वार्षिक प्रदर्शनामध्ये वाईरकरांची चित्रे दोन वेळा प्रदर्शित झाली.

वाईरकरांच्या व्यंगचित्रांचे क्षेत्र सुरुवातीपासूनच तत्कालीन राजकीय/सामाजिक घटना हे राहिले आहे. या घटनांवर त्यांची चित्रे मल्लिनाथी करतात. केव्हा केव्हा भेदक हल्ला करतात. मुंबईमध्ये इतर भाषकांच्या चढाऊपणामुळे मराठी माणसाला अर्धपोटी राहावे लागत असल्याच्या परिस्थितीवरची अथवा कुप्रसिद्ध ‘भूखंड’ व्यवहारावरची त्यांची व्यंगचित्रे इ.इ. यांचा संदर्भ महाराष्ट्रापुरता मर्यादित असतो, तर हजरतबल निमित्ताने उसळलेली दंगल, बोफोर्स प्रकरण, इ.इ.मध्ये त्यांना अखिल भारतीय संदर्भ असतो, तर इराक-अमेरिका युद्धाचा किंवा अफगाणिस्थान, बिन लादेन यांचा संदर्भ आंतरराष्ट्रीय असतो. ग्लोबल वॉर्मिंग, अणुस्फोट, यांसारख्या संपूर्ण जगाला व्यापणाऱ्या चित्रांचा संदर्भ जागतिक असतो. ग्लोबल वॉर्मिंगमुळे उत्तर ध्रुवावरील बर्फ वितळण्याची व्यक्त केली जाणारी भीती जर खरोखरच प्रत्यक्षात उतरली तर तेव्हा नाताळात बालकांसाठी प्रेमाने भेटी घेऊन येणार्‍या सान्ताक्लॉज बाबाला गरम कोट सोडाच, पण चक्क उघड्या अंगाने आणि हरणाऐवजी उंट ओढत असलेल्या गाडीतून येणे भाग पडेल असे भाकीत वाईरकर आपल्या व्यंगचित्रातून व्यक्त करतात, तेव्हा  ते चित्र जर जगभरच्या नागरिकांना भावले, तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.

आजवरच्या मराठीमधील राजकीय व्यंगचित्रांहून वाईरकरांची चित्रशैली संपूर्णपणे भिन्न आहे. कुंचल्याच्या फटकाऱ्याऐवजी टाकाने फार जोर न देता काढलेली सलग रेषा ते वापरतात. कमीतकमी तपशील, कमीतकमी रेषांचा वापर असली पथ्येही त्यांच्या शैलीला नाहीत. केव्हा केव्हा ते आकाराची गोलाई व्यक्त करतात तेव्हा रेषांची जाळी वापरून ती व्यक्त करतात. आणि सर्वांत परंपरेपासूनचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे आशय ठळक करण्यासाठी व्यक्तिचित्रणात (आणि इतर चित्रण) विरूपीकरण मोठ्या प्रमाणात करतात. रंगीत चित्रांत, अर्थात, त्यांना निमछटा (हाफटोन) वापरण्याची संधी मिळते व तिचा ते सफाईने उपयोग करतात.

राजकीय टीकाचित्रकाराच्या चित्रांतील पात्रे प्रत्यक्षातली असल्यामुळे त्याच्या चित्रातून त्यांची अचूक ओळख पटणे अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाचे असते. थोडक्यात, वाईरकरांनी अर्कचित्रकलेवर निःसंशय प्रभुत्व कमवले आहे हे त्यांनी स्टूडिओमध्ये टेबलावर बोर्ड ठेवून फोटो वगैरे संदर्भावरून रेखाटलेलीच नव्हे, तर विविध समारंभांत, सभा-बैठका, गाण्याच्या मैफलींत, प्रेक्षकांमध्ये बसून त्यांनी केलेली जलद रेखाटने ही याची नि:संशय साक्ष आहेत. या दृष्टीने त्यांचा ‘गशीीं ऊिविश्रळसि’ हा अर्कचित्रांचा संग्रह अपूर्व म्हणावा असा आहे. ‘कार्टूनिस्ट कंबाइन’ या व्यंगचित्रकारांच्या संघटनेचे अध्यक्षपदही वाईरकरांनी भूषविले आहे. अशा संस्थांमधून काम करीत असताना त्यांना अनेक बक्षिसे व सन्मान मिळाले. त्यांपैकी त्यांना ‘कॅग’ ह्या संस्थेने दिलेले ‘इलस्ट्रेटर ऑफ दि इयर १९९५-९६’ हे प्रतिष्ठेचे पारितोषिक मिळाले. १९९७ आणि १९९८मध्ये त्यांना 'कॅग - इलुस्ट्रेटर ऑफ दि इअर ' हा पुरस्कार मिळाला. २००५ आणि २००८ साली त्यांची व्यंगचित्र फ्रान्सच्या 'नाईस कार्निव्हल'मध्ये निवडली गेली. याशिवाय वाईरकर ह्यांची व्यंगचित्र फ्रान्स,जर्मनी,अमेरिका,नेपाळ ,द.आफ्रिका ह्या देशांत प्रसिद्ध झालेली आहेत. आजवर त्यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यंगचित्रांच्या  अनेक प्रदर्शनात भाग घेतला आहे.

वाईरकर ह्यांची डुडलींग ,बॉडीलाईन,कारी-टून्स अशी एकंदर पाच पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.   

            - वसंत सरवटे

वाईरकर, प्रभाकर परशुराम