Skip to main content
x

दप्तरी, केशव लक्ष्मण

भाऊजी दप्तरी

     केशव लक्ष्मण उपाख्य भाऊजी दप्तरी यांचा जन्म नागपूर येथे झाला. आपल्या ७६ वर्षांच्या जीवनात त्यांनी ज्योतिर्गणित, धर्मशास्त्र, समाजशास्त्र आणि वैद्यकशास्त्र या विषयांवर मूलगामी चिंतन करून मौलिक संशोधन केले.

     शालेय जीवनापासून नेमलेल्या अभ्यासक्रमावर संतुष्ट राहणे त्यांच्या कुशाग्र बुद्धीला आणि तीव्र ज्ञानलालसेला मानवत नसे. शाळेत असताना त्यांनी सिद्धान्त कौमुदीचा संपूर्ण अभ्यास केला व महाविद्यालयात जाण्यापूर्वी त्यांनी ज्योतिष्य गणित व शरीरविज्ञान या विषयांत प्रावीण्य मिळविले. त्यानंतर त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून १९०५ साली बी.ए.ची आणि कायद्याचीही पदवी मिळविली. बी.ए. झाल्यावर त्यांना मॉरिस महाविद्यालयात फेलोशिप मिळाली.

     वकिलीची परीक्षा पूर्ण केल्यावर त्यांनी वेद, रामायण, महाभारत, भागवत, भगवद्गीता, पुराणे, स्मृतिग्रंथ, धर्मसूत्र, भाष्यग्रंथ, मिताक्षरी टीकाग्रंथ यांचा चिकित्सक दृष्टीने अभ्यास करून पुढील संशोधन कार्याचा पाया भक्कम केला.

     धर्मरहस्य, धर्मविवादस्वरूप, तात्त्विक मीमांसा पद्धती, जैमिन्यर्थदीपिका, व्यासार्थदीपिका, उपनिषदर्थव्याख्या, औपनिषदिक जीवनसौख्य, उपनिषदांचा वस्तुनिष्ठ व बुद्धिप्रत्ययक अर्थ या विषयांवरील त्यांच्या विशाल ग्रंथसंपदेवरून त्यांच्या प्रगाढ पांडित्याचा, स्वतंत्र प्रज्ञेचा, लोकविलक्षण प्रतिभेचा आणि मूलग्रही संशोधन वृत्तीचा प्रत्यय येतो. आपल्या सखोल आणि सूक्ष्म अध्ययनातून त्यांनी अनेक सिद्धान्त प्रतिपादित केले. ते पूर्वपरंपरागत समजुतींना आणि श्रद्धांना धक्का देणारे आहेत व त्यातून भाऊजींची निर्भयता आणि सत्यनिष्ठा यांचे प्रखर दर्शन घडते.

     वैद्यकशास्त्र हासुद्धा त्यांच्या अभ्यासाचा आणखी एक महत्त्वाचा विषय होता. या विषयावर त्यांची दहा संशोधनपर पुस्तके प्रसिद्ध आहेत.

     बी.ए. झाल्यानंतर त्यांनी काही काळ नागपूर येथील पटवर्धन शाळेत संस्कृत आणि गणित विषयाचे अध्यापन केले होते. पुढे, ही नोकरी सोडून ते लोकमान्य टिळकांचे कट्टर आणि विश्वसनीय अनुयायी झाले. पुढे अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीत ते महात्मा गांधींचे खंबीर पाठीराखे होते. काही काळ ते नागपूर येथून निघणार्‍या ‘Young Patriot’ चे संपादक होते. नागपूर येथे १९२१ साली नॅशनल एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली. राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या सोसायटीच्या महाविद्यालयामध्ये त्यांनी निर्वेतन प्राध्यापकी केली. १९३० मध्ये स्वराज्य विद्यालयाचे मुख्याध्यापक, धर्मनिर्णय मंडळाचे अध्यक्ष, नाशिकच्या संस्कृत महाविद्यालयाचे प्राचार्य, अशी पदे त्यांनी भूषविली. १९३०-३१ च्या कायदेभंगाच्या मोहिमेत त्यांनी खजिनदाराचे काम सांभाळले.

     भाऊजी व्यवसायाने वकील होते. त्यांनी आपली सत्यनिष्ठा कधीच सोडली नाही. पैसा मिळत असूनही त्यांनी खोटे बोलणे भाग पडेल अशा अशिलांचे खटले नेहमीच नाकारले. वकिली सोडल्यावर ते वैद्यकीचा व्यवसाय करू लागले. त्यात द्रव्यलाभ फार कमी होई, पण त्यांची कीर्ती देशांतरी गेली. पुढे ते सर्वांनाच चिकित्सक म्हणून परिचित झाले. त्यात त्यांची प्रामाणिकता आणि सिद्धान्तनिष्ठा यांचा अनेकांना अनुभव आला.

    भाऊजींना पोटाचा विकार होता. सर्व प्रकारचे ज्ञात इलाज झाल्यानंतर भाऊजींनी केवळ स्वत:ला बरे करण्याच्या दृष्टीने म्हणून होमिओपॅथीचा व बायोकेमिस्ट्रीचा अभ्यास केला व स्वत:वर प्रयोग केले. ईश्वरकृपेने ते बरे झाले. त्यामुळे त्यांचा या चिकित्सेवर दृढ विश्वास बसला. नंतर ते अधिकाधिक सखोल अभ्यास करीत गेले आणि अशा निष्कर्षाप्रत पोहोचले, की बायोकेमिस्ट्री हीच एकमेव शंभर टक्के, तर्कशुद्ध चिकित्सापद्धती आहे. त्यानंतर त्या चिकित्सा पद्धतीच्या प्रचारासाठी भाऊजींनी अथक परिश्रम केले. त्यांच्याच प्रयत्नाने मध्य प्रदेशात होमिओपॅथिक वैद्यकीय शिक्षणाचा कायदा झाला.

    १९५१ साली त्यांनी ‘मध्यप्रदेश प्रगतिशील समचिकित्सा मंडळ’ स्थापन करून होमिओपॅथी व बायोकेमिस्ट्रीला सरकारमान्यता मिळविण्याकरिता त्यांचे एक बोर्ड स्थापन करून त्या पॅथीचे कॉलेज व परीक्षा सुरू करण्याकरिता खूप खटपट केली. होमिओपॅथीला लोकप्रतिष्ठा मिळवून देण्याच्या मुळाशी भाऊजींचे अविश्रांत परिश्रम आहेत.

     भाऊजींनी शास्त्रग्रंथ निर्मितीचे युगप्रवर्तक कार्य केले. त्यांना साधनांची फारशी अनुकूलता नव्हती. आपल्या प्राचीन धर्मग्रंथांचे एक क्रांतिकारी दर्शन त्यांनी घडविले. ज्यात धर्मशास्त्रांचा विचार शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थितपणे व पूर्णपणे केला आहे असा ‘जैमिनिसूत्रे’ हा एकमेव ग्रंथ आहे, असे भाऊजींच मत होते. ‘या सूत्रावर भाष्य लिहिताना शबरस्वामींनी दुर्दैवाने यातील अर्थाचा विपर्यास करून जैमिनीची सुंदर कृती विरूप करून टाकली व चुकीच्या धर्मशास्त्राचा पाया घातला. श्री कुमारीलभट्ट व नंतरच्या निबंधकारांनी या विकृत धर्मकल्पनांना भरपूर खतपाणी घातल्याने हिंदू समाजाच्या ऱ्हासाची पुढील दिशा निश्चित झाली’, असा भाऊजींचा आरोप आहे. वेद व उपनिषदांचा अर्थ सांगताना श्री कुमारील भट्ट, श्री शंकराचार्य इत्यादी पूर्वाचार्यांची बरीच मते संपूर्णत: चुकलेली असून नि:श्रेयस धर्माच्या दृष्टीने अगदी त्याज्य आहेत असे स्पष्टपणे सांगण्यात भाऊजींच्या असामान्य धैर्याचे कौतुक करावेसे वाटते. वेदांच्या अपौरुषेयत्वाच्या वादातही त्यांनी सनातन्यांशी निडरपणे झुंज घेतली. वेदान्तातील तत्त्वज्ञान सर्वाधिक लोकविमुख करण्याचे कार्य श्री शंकराचार्यांनी केले असा भाऊजींचा श्री शंकराचार्यांवर प्रमुख आरोप आहे. ‘व्यासांची श्री शंकराचार्यांवर फिर्याद’ या आपल्या लेखात त्यांनी आपली बाजू अतिशय कलात्मक आणि मनोरंजकतेने मांडली आहे.

     वेदान्ताला अध्यात्मशास्त्र व जगदुत्पत्तिशास्त्र ठरवून पूर्वाचार्यांनी उपनिषदांचा परलोकपर अर्थ केला. जगाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लयाला कारणीभूत होणारे ब्रह्म हे पूर्वाचार्यांनी उपनिषदांचे मुख्य प्रतिपाद्य मानले; पण ब्रह्माला पारलौकिकत्वाचे अधिष्ठान दिले. याउलट, भाऊजींनी कर्तव्याकर्तव्य शास्त्र (Ethics) असा उपनिषदांचा अर्थ उलगडून दाखविला. भाऊजींच्या मते, जीवाला इहलोकातच परमोच्च आनंदाची प्राप्ती कशी होईल हा उपनिषदांचा एकमेव विषय आहे. पूर्वाचार्यांच्या आणि भाऊजींच्या उपनिषदाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातील हा मूलभूत फरक प्रकर्षाने लक्षात येतो. बुद्धिनिष्ठ व मानवतावादी दृष्टिकोनातून उपनिषदांचा अर्थ लावण्याचा आजतागायतचा हा अगदी पहिलाच प्रयत्न आहे. या दृष्टीने भाऊजी क्रांतिकारी विचारवंत ठरतात.

     ‘भारतीय महायुद्धकाल’ हा निबंध १९१८ साली प्रसिद्ध करून भाऊजींनी आपल्या ग्रंथ प्रकाशनाला सुरुवात केली व आपल्या पहिल्या प्रकाशनाने लोकमान्य टिळक, ज्योतिर्विद श्रीपाद कृष्ण कोल्हटकर इत्यादी विद्वानांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित केले. त्यांचे गणिताचे व ग्रहज्योतिषशास्त्राचे प्रावीण्य लोकमान्य टिळकांच्या लक्षात आल्यामुळे उभ्या महाराष्ट्रात या कामासाठी हाच एक पुरुष लायक आहे अशी खात्री झाल्यामुळे त्यांनी शुद्ध पंचांग करण्यास मार्गदर्शक होणारा नवा ‘करणकल्पलता ग्रंथ’ रचण्यास भाऊजींना सांगितले. हा ग्रंथ दोन भागांत प्रसिद्ध झाला. त्याचा पहिला भाग केसरी संस्थेने १९२५ साली प्रसिद्ध केला. या ग्रंथाला त्या काळी एक हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले, तर दुसरा पन्नास वर्षांनी विदर्भ संशोधन मंडळाने प्रसिद्ध केला.

     त्यांच्या या ग्रंथाचा बोलबाला गणितज्ञांत विशेष झाला. ज्योतिषशास्त्रावरील उपरोक्त ग्रंथाशिवाय त्यांनी मराठीमध्ये ‘पंचांगचंद्रिका’ आणि ‘भारतीय ज्योतिषशास्त्र निरीक्षण’ ही पुस्तके लिहिली. विविध विषयांवरील सुमारे २८ ग्रंथांचे लेखन त्यांनी आपल्या हयातीत केले. त्यांच्या ‘धर्मविवादस्वरूप’ या ग्रंथाला दक्षिण महाराष्ट्र साहित्य पुरस्कार समितीने ‘श्रीमंत मिरजकर’ पारितोषिकाने गौरविले. त्यांच्या अनेक ग्रंथांना महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, तसेच साहित्य अकादमीने अनुदान देऊन गौरविले आहे.

     वैदिक कालगणनेची एक अभिनव उपपत्ती भाऊजींनी अभ्यासकांसमोर मांडली आहे. या पद्धतीच्या आधारे त्यांनी कंसवधाची तारीख, श्रीरामजन्म निर्णय, श्रीरामाच्या वनवासातील रोजनिशी व अनेक प्राचीन ऐतिहासिक कोडीही सोडवून दाखविली आहेत. आपली पुराणे कपोलकल्पित कथा नसून त्यात आपल्या प्राचीन इतिहासाचे दर्शन घडते असा नवीनच दृष्टिकोन त्यांनी भारताला दिला.

     १९४० साली भाऊजींनी नागपूर विद्यापीठात ‘The Astronomical Method and its Application Ancient Cronology of india आणि ‘Social Institution in Ancient India’ या विषयांवर व्याख्याने दिली. विद्यापीठाने ही दोन्ही व्याख्याने पुस्तकरूपाने प्रसिद्ध केलीआहेत. नागपूर विद्यापीठाने त्यांचा व्याख्याते म्हणून सन्मान तर केलाच; पण त्यांना एक सुवर्णपदक आणि सन्मान्य अशी D. Litt. पदवी देऊन विभूषित केले. पण कमालीचे निरिच्छ असलेले भाऊजी ही पदवी घेण्यास तयार नव्हते. विद्यापीठ कार्यकारिणीचे सभासद घरी आले व त्यांनी विनंती केली, तेव्हा भाऊजी मोठ्या मिनतवारीने कबूल झाले; पण मी खादीचाच झगा घालेन व इंग्रज गव्हर्नरशी हस्तांदोलन करणार नाही, दुरूनच नमस्कार करीन अशा त्यांनी दोन अटी घातल्या.

    ‘य: क्रियावान् स पण्डित:’ ही उक्ती त्यांनी समाजसुधारणेच्या चळवळीत सक्रिय सहभाग घेऊन सार्थ केली. विदर्भ मंडळाचे ते पहिले उपाध्यक्ष होते. त्यांना त्यांच्या विद्वत्तेदाखल ‘विद्वद्रत्न’ ही उपाधी मिळाली. त्यांच्या विद्वत्तेला मानवंदना देण्यासाठी विदर्भ संशोधन मंडळात त्यांचा अर्धपुतळा उभारण्यात आला.                                                                                           

डॉ. स्मिता होटे

दप्तरी, केशव लक्ष्मण