Skip to main content
x

गुर्जर, विष्णू सीताराम

चित्रकार

विष्णू सीताराम गुर्जर ऊर्फ व्ही.एस. गुर्जर यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील करगणी येथे झाला. कोकणातील राजापूर जवळील पांगरे हे त्यांचे मूळ गाव होते. त्या भागात गुर्जरांचे वडील ‘सर्व्हेअर’ म्हणून  खेड्यात फिरतीवर होते. त्यामुळे त्यांचे शालेय शिक्षण पुण्यात झाले. शालेय जीवनातच गुर्जरांना चित्रकलेची आवड लागली. पुढे शालेय शिक्षण संपल्यावर त्यांची चित्रकलेची स्वाभाविक आवड पाहून वडिलांनी त्यांना मुंबईत, जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये दाखल केले. वर्षभरातच त्यांनी चित्रकलेवरील आपले प्रभुत्व सिद्ध केले.

१९२७ मध्ये ‘कॉम्पोझिशन’ या विषयात कॅप्टन सॉलोमन यांच्याकडून ‘गौरव तबक’ हे सन्मान्य पारितोषिक गुर्जरांनी पटकावले. चित्रकलेच्या शेवटच्या वर्षी म्हणजे १९२८ मध्ये डॉली करसेटजी यांच्या नावाचे ६००/- रुपयांचे रोख पारितोषिक व कांस्यपदक व्ही.एस. गुर्जरांनी मिळवले. याच वर्षी ते शासकीय कला पदविका (जी.डी. आर्ट) चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. त्या वर्षीच्या लाइफ पेन्टिंग आणि मेमरी ड्रॉइंग या विषयांत ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांना दोन वर्षांसाठी सरकारी शिष्यवृत्ती मिळाली.

शिक्षणाच्या काळात गुर्जरांनी निसर्गचित्रण, व्यक्तिचित्रण व मुंबईत त्या काळात बहरास आलेल्या पुनरुज्जीवनवादी शैलीत प्रावीण्य मिळविले. १९२९ च्या दरम्यान जे.जे. स्कूल ऑफ आर्टला दिल्ली येथील इम्पीरिअल सेक्रेटरीएटसाठी चित्रे काढण्याचे प्रतिष्ठेचे काम मिळाले होते. या कामात काही हुशार विद्यार्थ्यांना अनुभव मिळावा म्हणून निवड करण्यात आली. यात गुर्जरांचाही समावेश होता.

पुढे १९३२ ते १९४७ या काळात घाटकोपरच्या रविउदय प्रेसमध्ये मुख्य चित्रकार (हेड आर्टिस्ट) म्हणून व्ही.एस. गुर्जरांनी नोकरी पत्करली होती. या पंधरा वर्षांच्या काळात गुर्जरांनी सुमारे तीनशे हून अधिक दिनदर्शिकांसाठी चित्रांचे आणि वेगवेगळ्या आकारांतील लेबल डिझाइन्सचे काम केले.

ही नोकरी करीत असताना १९३८ मध्ये गुर्जरांनी गिरगाव येथील फे्रंच ब्रिजजवळच्या ब्लाव्हाट्स्की लॉजच्या इमारतीत स्वतंत्रपणे आर्ट स्टूडिओ सुरू केला. तेथे ते व्यावसायिक व्यक्तिचित्रे (कमिशन्ड पोटर्र्ेट्स), पुस्तकांसाठी चित्रे, अशी व्यावसायिक कामे करू लागले. जलरंग, तैलरंग, पेस्टल यांसारख्या माध्यमांवर गुर्जरांचे प्रभुत्व होते. परंतु त्यांचे खरे वैशिष्ट्य होते ते ‘ड्राय पेस्टल’. या माध्यमातील त्यांची चित्रे अत्यंत दर्जेदार असत. भारतभरच्या विविध प्रदर्शनांतून सातत्याने सात वर्षे या माध्यमातील त्यांच्या चित्रांनी पारितोषिके मिळवून विक्रमच प्रस्थापित केला.

व्ही.एस. गुर्जरांनी साकारलेल्या या चित्रांमध्ये ‘या खुदा’, ‘मुनीमजी’, ‘तुझ्या पायी देवा’, ‘पैसा परमेश्‍वर’, ‘चिनी महिला’, ‘वादळानंतर’, ‘फिशरबॉय’ अशी चित्रे होती. त्यांच्या ‘माँ’, ‘पुंगीवाला’, इत्यादी तैलरंगातील चित्रांनाही पारितोषिके मिळाली आहेत.

१९५० च्या दशकात कोळी लोकजीवनाचा जवळून अभ्यास केल्याने त्यांनी त्यावरही चित्रे काढलेली आहेत. बॉम्बे आर्ट सोसायटीच्या चित्रप्रदर्शनांत चार वेळा गव्हर्नर्स अवॉर्ड, दोन वेळा रौप्यपदके आणि सात वेळा रोख बक्षिसे मिळविण्याचा मान गुर्जरांनी मिळविला. कलकत्त्याच्या अकॅडमी ऑफ फाइन आर्टच्या चित्रप्रदर्शनात दोन वेळा सुवर्णपदके आणि दोन वेळा रौप्यपदके, तर सिमला येथील फाइन आर्ट सोसायटीच्या कला प्रदर्शनांत दोन वेळा कांस्यपदके अशी त्यांची यशस्वी कारकीर्द होती.

या सोबत गुर्जरांनी चरितार्थासाठी व्यावसायिक व्यक्तिचित्रे, प्रसंगचित्रे अशी कामे स्वातंत्र्योत्तर काळात केली. बिर्ला उद्योगसमूह व अनेक संस्थांमध्ये त्यांनी रंगविलेली व्यक्तिचित्रे आहेत. परंतु वास्तववादी शैलीवर प्रभुत्व व कौशल्यपूर्ण निर्मिती करीत असूनही त्यांनी फारसे प्रयोग केल्याचे दिसत नाही. त्यांच्यावर परंपरागत विचार व आदर्श यांचाच प्रभाव होता. त्यामुळे ते प्रयोगशीलता, आधुनिक विचार व अभिव्यक्तीच्या चित्रनिर्मितीपासून कायमच दूर राहिले. अभिजात चित्रकला आणि उपयोजित कला या दोन्ही कलाक्षेत्रांत समर्थपणे चित्रकाम करणारे आणि ड्राय पेस्टल या माध्यमात दर्जेदार व्यक्तिचित्रे निर्माण करणारे चित्रकार म्हणून व्ही.एस. गुर्जर ख्यातनाम होते.

वस्तुतः त्यांनी निवडलेले विषय व ‘ड्राय पेस्टल’सारख्या माध्यमातील शोधलेल्या शक्यता यांतून त्यांच्या चित्रातील आशय अधिक सामर्थ्याने व्यक्त होणे शक्य होते. परंतु चित्रनिर्मिती करताना जनसामान्यांनाही ती आवडली व समजली पाहिजे, अशी त्यांची धारणा होती. त्यामुळेच कोळीजीवनासारखा अत्यंत वेगळा विषय निवडूनही ते कोळिणींचे बाह्य सौंदर्य व त्यांची वेशभूषा आणि आकर्षक अशा बाह्य गोष्टीच रंगवीत राहिल्याचे जाणवते. परंतु त्यांनी आपले विचार व कृती यांबाबतची प्रामाणिकता व श्रद्धा आपल्या कृतीतून व लेखनातून कायम व्यक्त केली.

आधुनिक कलेबद्दलचा त्यांचा काहीसा विरोधी दृष्टिकोनही ते आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात वृत्तपत्रीय लेखनातून व संभाषणांतून व्यक्त करीत असत. आधुनिक कलेविषयी विचार मांडताना त्यांनी ‘चित्रकलेतील अराजक’ असा लेख लिहिला, तर कलाशिक्षणाच्या १९७० मध्ये सुरू झालेल्या नव्या अभ्यासक्रमाविरुद्ध ‘कलाशिक्षणाचा खेळखंडोबा’ असा लेख लिहून त्यांनी आपले मत जाहीरपणे नोंदविले. राज्य कला प्रदर्शनात शालेय विद्याथ्यार्र्ंच्या कलाकृतींचा समावेश करण्याच्या राज्यशासनाच्या निर्णयावर त्यांनी, ‘राज्य कलाप्रदर्शन ः कशाचे? कुणासाठी?’, असा लेख लिहून टीका केली.

आपली मते अत्यंत स्पष्टपणे मांडणारे चित्रकार गुर्जर हे स्वभावाने अत्यंत साधे व तरुण पिढीला प्रोत्साहन देणारे होते. आपल्याला जे येते ते पुढील पिढीला शिकवावे, अशी त्यांना तळमळ होती व त्यानुसार ते विविध कलासंस्थांमध्ये, प्रसंगी पदरमोड करूनही प्रात्यक्षिके देत असत. अत्यंत सहृदय मनाच्या या कलावंताचे वयाच्या बाहत्तराव्या वर्षी निधन झाले.

- प्रा. सुभाष पवार

 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].