Skip to main content
x

आठवले, विनायक रामचंद्र

विनायक रामचंद्र आठवले यांचा जन्म भोर येथे झाला. त्यांचे वडील हे संस्कृतचे पंडित व प्राध्यापक होते. पण त्यांनी मुलांना गायन, अभिनय, खेळ, पेटीवादन या सर्वांसाठी भरपूर प्रोत्साहन दिले. वडील उत्तम कीर्तनकारही होते. त्यामुळे ते आपल्या मुलांना कीर्तनाच्या साथीला नेत व त्या काळच्या उत्तम गवयांच्या बैठकीलाही नेत. अशा प्रकारे लहान वयातच त्यांच्यावर गायनाचे संस्कार झाले. त्यांना रागदारी शिक्षणात रस वाटू लागला. गाणे ऐकून ते नाट्यसंगीत, भजने इ. उत्तम प्रकारे गाऊ लागले. पुढे मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी गांधर्व महाविद्यालयात संगीताचे शिक्षण घेतले.

त्यांचे पदवी शिक्षण पूर्ण झाले, त्या सुमारास स्वातंत्र्य चळवळ जोरात चालू होती. स्वा. सावरकर, साने गुरुजी, आचार्य जावडेकर, आचार्य भागवत यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपल्या आवडीचा विषयच जीवन व्यवसाय म्हणून निवडायचा असे त्यांनी मनाशी पक्के ठरवले व गिरणीमध्ये लागलेली नोकरी सोडून ते संगीत शिक्षणासाठी पुण्याला पं. विनायकबुवा पटवर्धन यांच्याकडे दाखल झाले. तेथे त्यांनी १९३९ ते १९४३ अशी चार वर्षे ग्वाल्हेर घराण्याची तालीम घेतली. संगीत अलंकार ही पदवी घेऊन, संगीत शिक्षकाची नोकरी पत्करून त्यांनी आपल्या व्यवसायास सुरुवात केली.

काही वर्षे शिक्षकाची नोकरी केल्यानंतर त्यांना मुंबई आकाशवाणीवर नोकरी मिळाली. त्या दरम्यान कलकत्त्याला उद्योगपती बिर्लांनी एक संगीत महाविद्यालय सुरू केले होते. त्यासाठी प्राचार्य म्हणून योग्य व्यक्ती पाठविण्यासंबंधी पं. विनायकबुवा पटवर्धनांना सांगितले. त्यांनी विनायक आठवल्यांना तेथे जायचा सल्ला दिला. ही चांगली संधी आहे असे समजून त्यांनी आकाशवाणीची नोकरी सोडून कोलकात्याला बिर्‍हाड थाटले. पण दुर्दैवाने १९४६ साली कोलकात्यात मोठी दंगल उसळली व सर्व महाविद्यालये बंद पडली. वर्षभर तेथेच शिकवण्या करून ते अहमदाबाद येथे परत आले. त्या वेळी बडोद्याच्या संगीत विद्यालयात त्यांना उपप्राचार्याची नोकरी मिळाली; पण एक-दोन वर्षांतच काही मतभेदांमुळे ती सोडावी लागली. ‘आता संगीत पुरे, इतर काही बघ,’ असे वडिलांनी सांगितले; पण विनायक आठवले आपल्या ध्येयापासून मागे हटले नाहीत.

अहमदाबाद येथेच १९४९ साली नवीन आकाशवाणी केंद्र उभारण्यात आले व तेथे खर्‍या अर्थाने त्यांची कारकीर्द सुरू झाली. सहा वर्षांनंतर त्यांना जयपूर आकाशवाणी केंद्रावर निर्माता म्हणून बढती मिळाली. जयपूरला दोन-अडीच वर्षे काम केल्यावर त्यांची दिल्ली आकाशवाणी केंद्रावर निर्माता म्हणूनच बदली झाली व दिल्लीतील वास्तव्याचा काळ हा त्यांच्या दृष्टीने सुवर्णकाळ ठरला.

येथील वास्तव्यातच विनायकरावांना उ. विलायत हुसेन खाँ यांची आग्र घराण्याची तालीम मिळाली. आग्रा घराण्याचे बोल अंग, लयकारी यांतील सौंदर्य उमगत गेले. त्यांना अनेक अनवट व जोडराग शिकायला मिळाले. ग्वाल्हेरबरोबर आग्रा घराण्याची वैशिष्ट्येही त्यांना आत्मसात करता आली. त्यांनी १९७० नंतर दिल्ली विद्यापीठाच्या संगीत विभागाचे प्रमुख म्हणून काम केले. त्याचबरोबर त्यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे सचिव व ‘संगीत कला विहार’ या मासिकाचे संपादक म्हणून काम केले.

गोवा कला अकादमीचे संचालक म्हणून काम करताना आठवल्यांनी अनेक नवीन प्रयोग केले व तेथेच संगीताचे रसग्रहण, घराण्याचे विश्लेषण, ठुमरीचे रंग इ. विषयांची जाहीर व्याख्याने दिली. कला अकादमीचा अभ्यासक्रम ठरवण्यापासून विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना शिकवण्याचेही काम त्यांनी केले. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळासाठी वाशी येथे जागा खरेदी करून तेथे विद्यालय सुरू करण्याचे नक्की झाले. जागा ताब्यात आल्यावर १९८८ साली वास्तूचा तळमजल्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला तेव्हापासून त्यांनी विद्यार्थ्यांना तेथे संगीत शिकवणे सुरू केले. हेच विद्यार्थी प्राथमिक वर्गांना शिकवत व विशारदनंतरचे शिक्षण स्वत: घेत. याप्रमाणे ‘कमवा व शिका’ ही पद्धतही तेथे विनायकरावांनी सुरू केली. शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, वाद्यसंगीत, नृत्य या सर्व कलांचे शिक्षण या ठिकाणी दिले जाते. तेथे असताना आठवल्यांनी सतत नवीन कल्पना कार्यक्रमांतून लोकांसमोर मांडल्या.

त्यांना १९९७ साली मेंदूतील रक्तस्रावाचा मोठा आजार झाला. पुढे त्यातून ते सावरले. त्यांना मराठी साहित्य परिषद, गोवा येथील ‘लता मंगेशकर’ पुरस्कार (२००१), अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाने दिलेला ‘महामहोपाध्याय’ पुरस्कार, चतुरंगचा ‘चैत्रपालवी’ पुरस्कार (२००९) व मधला पं. विनायकबुवा पटवर्धन यांच्या नावाचा पुरस्कार (२०१०), इत्यादी मोठे पुरस्कार मिळाले. त्यांचे ‘तरंगनाद’ हे संगीतावरील वैचारिक निबंधाचे पुस्तक आहे, तर ‘नादवैभव’ हे स्वरचित बंदिशींचे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. त्यांच्या ‘रागवैभव’ या पुस्तकात पारंपरिक बंदिशी दिल्या आहेत.

       — लीना हर्डीकर

आठवले, विनायक रामचंद्र