Skip to main content
x

कुलकर्णी, कृष्णाजी भीमराव

           बेळगावसारख्या एका आड-गावात राहून कलानिर्मिती, कलाध्यापन व कलाविषयक चिंतन करणारे कलावंत म्हणून के.बी. कुलकर्णी यांची प्रसिद्धी होती. बेळगावहून दीड-दोन मैलांवर असलेल्या हिंडलगे या गावात कृष्णाजी भीमराव कुलकर्णी यांचा जन्म झाला. लहानपणीच पित्याचे छत्र हरपलेल्या के.बी. कुलकर्णी यांनी शालेय शिक्षण सतराव्या वर्षी पूर्ण केले. चित्रकलेची आवड त्यांना लहानपणापासून होतीच. नजरेत येणार्‍या प्रत्येक गोष्टीचे रेखाटन करण्याकडे त्यांचा कल होता. या सोबतच पाश्‍चिमात्य चित्रकारांच्या पुस्तकांतील चित्रे बघून व तत्कालीन सुप्रसिद्ध भारतीय चित्रकारांची चित्रे अनुभवून त्यांनी ‘आपणही चित्रकार व्हायचे’, हा निश्‍चय केला. अखेरपर्यंत ते अविवाहित राहिले.

त्यांनी १९४३-४४ या काळात मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्टची चित्रकला प्रशिक्षण पदविका घेऊन  बेळगावच्या मराठा मंडळ व सेंट्रल हायस्कूलमध्ये चित्रकला शिक्षक म्हणून कार्य सुरू केले. परंतु चित्रनिर्मितीची ओढ त्यांना स्वस्थ बसू देईना. बेळगावसारख्या ठिकाणी कलाविषयक जागृती व वातावरण निर्माण करण्याचा विचार त्यांना अस्वस्थ करीत होता. त्यामुळे स्वत:च्या चित्रनिर्मितीसोबतच केवळ शाळेत कलाशिक्षक म्हणून काम करून हे कार्य होणार नाही हे त्यांना जाणवले. खडे बाजारात विठ्ठल मंदिराजवळ दोन चित्रकार मित्र आजगावकर व आर.बी. पवार यांच्या मदतीने कृष्णाजी कुलकर्णी यांनी ‘कला निकेतन’ ही पहिली संस्था स्थापन केली व त्यामार्फत विद्यार्थ्यांना चित्रकलेचे ज्ञान द्यायला सुरुवात केली.

त्यांनी १९४७ मध्ये जे.जे.मधून ‘आर्ट मास्टर’ ही पदविका मिळवली. याच काळात ते एस.एल. हळदणकर यांच्या ‘हळदणकर्स फाइन आर्ट इन्स्टिट्यूट’मध्ये काही काळ शिकले; पण चित्रकलेचे रीतसर शिक्षण ते घेऊ शकले नाहीत. ही कसर पाश्‍चात्त्य कलाकारांची पुस्तके, नियतकालिके व रस्त्यावर मिळणारी पुस्तके, वृत्तपत्रे यांतून छापल्या जाणाऱ्या चित्रांचा अभ्यास करून त्यांनी भरून काढली. निसर्गासोबतच मानवाकृतीचा अभ्यासही ते करू लागले. लिओनार्दो दा व्हिंची व मायकेलेंजेलो ही त्यांनी दैवते मानली. हळूहळू त्यांची कलासंस्था प्रसिद्धीस येऊ लागली. पण त्यांचे मित्र आजगावकर नोकरीनिमित्त मुंबईला गेले व पवार तब्येतीच्या अस्वास्थ्यामुळे कला निकेतनमध्ये येईनासे झाले. अर्थार्जनासाठी स्वत: के.बी. कुलकर्णी सेंट पॉल हायस्कूलमध्ये १९४९ पासून कलाशिक्षक म्हणून रुजू झाले. साहजिकच कला निकेतनमध्ये जाणे-येणे कमी झाले व थोड्याच दिवसांत कला निकेतन १९५० च्या दरम्यान बंद पडली. पण के.बी. कुलकर्ण्यांमधील कलाशिक्षक कायमच कार्यरत राहिला.

स्वत: खूप काम करणे हाच उद्देश सतत त्यांच्या डोळ्यांपुढे होता. या काळात चित्र काढताना ते अचूक रेखाटन, बाह्य आकार यांना खूप महत्त्व देत असत. त्यामुळे चित्रनिर्मिती खूप चांगली होते अशी त्यांची श्रद्धा होती. यातूनच त्यांची डोळ्यांना सुखावणारी आकर्षक अशी चित्रशैली तयार होत गेली व याच शैलीत त्यांनी आयुष्यभर व्यक्तिचित्रे व निसर्गचित्रे रंगविली.

तरुण वयातच कृष्णाजींना ‘मी कोण? कोठून आलो? कशाला आलो? माझे काय काम? मी काय करावे?’, असे अनेक प्रश्‍न पडत व मन ‘स्व’शोधाकडे वळे. त्यातूनच अध्यात्म व तत्त्वज्ञानाची पुस्तके वाचली, असे ते सांगत. शिवाय बेळगावात उच्च कलाशिक्षणाची सोय नव्हती. ती व्हावी या हेतूने त्यांनी १९५१ मध्ये त्यांनी ‘कलामंदिर’ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेत अनेक विद्यार्थी शिकून तयार झाले. रवी परांजपे, जॉन फर्नांडीस, बिन्दुमाधव कुलकर्णी हा त्यांचा पुतण्या, मारुती पाटील असे अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले. यातून बेळगावची अशी एक खास आकर्षक व मोहक चित्रपरंपरा निर्माण झाली.

के.बी. कुलकर्णी यांच्यावर जे. कृष्णमूर्ती व आचार्य रजनीश यांचा प्रभाव होता. निसर्गाच्या विविध रूपांचे त्यांना आकर्षण होते व त्यातही सकाळचे कोवळे उन्ह, रम्य सायंकाळ असे निसर्गाचे मोहक आविष्कारच त्यांना भावत. किंबहुना, निसर्गाच्या भीषण रूपापासून त्यांच्यातील कलावंत नेहमीच फटकून असे. त्यामुळेच की काय, त्यांच्या चित्रातील मानवाकृतीही कायमच तरुण असत व त्यातही विशेषत: ते तरुणींचीच चित्रे रंगवत; मुग्ध, आपल्याच स्वप्नात दंग असलेली, पाठमोरी पहुडलेली! सौंदर्याचे आपण उपासक व पूजक असल्याचे कृष्णाजी प्रतिपादन करीत व आपले विद्यार्थीही त्या मार्गावर जावेत यासाठी मन:पूर्वक प्रयत्नशील असत. सकाळच्या कोवळ्या उन्हात आणि नुकत्याच तारुण्यात आलेल्या तरुणीच्या शरीरात त्यांना विलक्षण साम्य वाटे, आणि नवल म्हणजे आयुष्यभर त्यांना तेच विषय रंगवावेसे वाटले. दररोज ते समोर मॉडेल बसवून स्केचेस करत व त्यात नग्न मॉडेल बसवून काढलेली अनेक स्केचेस आहेत.

त्यांनी १९६० ते २००३ या ४३ वर्षांच्या काळातील स्केचेसबद्दल आपल्या वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी आठवणी व मते लिहून ठेवली. गंमत म्हणजे, त्यांच्यासमोर नग्न बसणाऱ्या तरुणींना त्यांनी ‘ए’, ‘ई’, ‘के’ अशी इंग्रजी मुळाक्षरांची नावे ठेवली होती. विशेष म्हणजे, बेळगावसारख्या ठिकाणी त्यांना तरुणपणीच नव्हे, तर वृद्धापकाळीही अनेक तरुणी मिळत. त्यांचे चित्र हे व्यक्तीचे नसे, तर ते त्या व्यक्तीच्या मनोवस्थेचे असे. त्यातून ते मोहक वातावरण निर्माण करीत आणि त्यातील व्यक्तीला चेहराच नसे. त्यासाठी ते कधी तोंडावर मोकळे सोडलेले केस दाखवत, तर कधी पाठमोरे झोपवीत.

ते म्हणत, ‘‘न्यूड आणि न्यूडिटीत फरक आहे. ‘न्यूड’ केवळ उघडं-नागडं शरीर असतं, ‘न्यूडिटी’ हे चिरंतन सत्य. असं सत्य म्हणजे नित्यनूतन निसर्ग व निसर्गानं दिलेलं तारुण्य.’’ त्यांची सौंदर्यपूजक वृत्ती त्याच परिघात फिरत राहिली व त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांवर त्याचाच संस्कार अशा काही प्रभावी पद्धतीने केला, की आजही त्या पद्धतीने मोहक चित्र काढण्याची परंपरा जॉन फर्नांडीस या त्यांच्याच विद्यार्थ्याच्या कलानिर्मितीतून महाराष्ट्रभर पसरली व आज अनेक चित्रकार तरुण- तरुणी ती अनुसरत आहेत.

ते आयुष्यभर अविवाहित राहिले. त्यांनी स्वत:च्या पेंटिंग्सचे प्रदर्शन कधीच भरवले नव्हते; परंतु त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन १९८६ मध्ये मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवले. त्यांच्या मृत्यूनंतर २००८ मध्ये त्यांचे एक प्रदर्शन नेहरू सेंटरने भरविले होते. चित्रकला, संगीत, अध्यात्म व कलाविषयक चर्चा, वाचन, चित्रकलेचे प्रशिक्षण देणे, चांगले चित्रपट पाहणे, सतत ज्ञान संपादन करणे व ज्ञान देत राहणे यांतच त्यांनी आपले आयुष्य व्यतीत केले. नवनीत प्रकाशनातर्फे  के.बी. कुलकर्णी यांचे एक पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.

- श्रीकांत कशेळकर

कुलकर्णी, कृष्णाजी भीमराव