Skip to main content
x

माहुलीकर, गौरी

     डॉ. गौरी माहुलीकर यांनी संस्कृतच्या प्रेमापोटी बँकेतील कायमस्वरूपी अधिकारीपदाची नोकरी सोडली व त्या अध्यापिका म्हणून मुंबई विद्यापीठात १९९० साली रुजू झाल्या.

     डॉ. माहुलीकर या संस्कृत विषयातच स्नातक व स्नातकोत्तर अशा दोन्ही परीक्षांमध्ये मुंबई विद्यापीठात सर्वप्रथम आल्या. त्यांनी सुवर्णपदकांसह अनेक पारितोषिके पटकावली होती. वेदकाळातील मूलतत्त्वेच पुराणकालात धार्मिक विधी व मंत्रांतून कशी दिसून येतात, थोडक्यात ‘श्रुति-स्मृति पुराणोक्त’ हे प्रत्येक धार्मिक विधीच्या आधी म्हटले जाणारे वचन कसे सत्य आहे या हेतूने  त्यांनी ‘वेदिक एलिमेन्ट्स इन पुराणिक मन्त्रज अ‍ॅण्ड रिच्युअल्स’ या विषयात संशोधन केले. या संशोधनामुळे वैदिक संस्कृती आजपर्यंत कशी अखंडपणे प्रवाहित आहे ते सहज लक्षात येते.

     अफाट विस्तार असलेल्या संस्कृतसाहित्याचा थोडक्यात आढावा घेणे हा हेतू डोळ्यापुढे ठेवून लिहिलेल्या ‘अभिजात संस्कृत साहित्याचा इतिहास’ या पुस्तकाच्या त्या सहलेखिका आहेत. मुंबई विद्यापीठात ‘फॅसेट्स ऑफ फेमिनिटी’ या विषयावर झालेले चर्चासत्र व त्यातील शोधनिबंधांचे त्यांनी संपादन केले (२००५). मुंबईतील ‘हेरास’ या संस्थेद्वारे प्रकाशित होणार्‍या ‘इंडिका’ या शोधपत्रिकेतून व एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकांतून त्यांच्या पुस्तकांची परीक्षणे प्रसिद्ध झालेली आहेत. याशिवाय, विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांत सादर केलेल्या शोधनिबंधांना उत्कृष्ट निबंध म्हणून पारितोषिके मिळाली आहेत.

     त्यांनी अनेक विद्वत्सभा व चर्चासत्रांतून अध्यक्षपदे भूषविली आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या नियतकालिकांमधून व आकाशवाणीवर विविध विषयांवर लेख व कार्यक्रम सादर केले आहेत. प्राचीन लिप्यांच्या प्रचार व प्रसाराच्या ध्येयाने त्यांनी ‘सर्टिफिकेट कोर्स इन मॅन्युस्क्रिप्टॉलॉजी’, अर्थात हस्तलिखित शास्त्राचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम व पुढे पदविका व प्रगत पदविका हे अभ्यासक्रम सुरू केले. यातून विद्यार्थ्यांना संशोधन व अर्थप्राप्तीचीही संधी प्राप्त होते. ‘वेदान्त’ या विषयात संशोधन करण्याकरिता विद्यार्थ्यांना प्रवृत्त करण्यासाठी त्यांनी शंकरमठम्, माटुंगा यांजकडून २.१२ लाखांची देणगी मिळवली. त्यातून दरवर्षी दोन विद्यार्थ्यांना दरमहा ५०० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.

     संस्कृतचे स्वतःचे भवन असावे या ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी भवनाच्या निर्मितीसाठी अनेकांकडे अर्थसाहाय्यासाठी विचारणा केली. त्याचे फलित म्हणजे, त्यांची तळमळ जाणवून जमनालाल बजाज फाउण्डेशन यांनी सव्वा कोटीचे आर्थिक साहाय्य केले व आज ‘रामकृष्ण बजाज संस्कृत भवन’ ही संस्कृत भाषेची स्वतःची वास्तू दिमाखात उभी आहे.

     आतापर्यंत दहा विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे पीएच.डी.च्या अभ्यासक्रमासाठी मार्गदर्शन प्राप्त केले आहे. डॉ. माहुलीकरांचा कुठल्याही विषयाचा तौलनिक अभ्यास करून प्राचीन भारतीयांची त्या विषयातील प्रगती शोधण्याचा नेहमी प्रयत्न असतो. यादृष्टीने त्यांनी केलेल्या ग्रीक नाटके व भरताचे नाट्यशास्त्र यांच्या तौलनिक अभ्यासाला ‘लिमजी’ सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले आहे (१९७७). संस्कृत भाषेच्या प्रचारासाठी केलेल्या योगदानाबद्दल त्यांना कॅनडियन एज्युकेशन फाउण्डेशनतर्फे दिला जाणारा आंतरराष्ट्रीय ‘रामकृष्ण’ पुरस्कार (२००३) प्राप्त झाला आहे.

     तसेच त्यांना कांची कामकोटी पीठम् शंकर मठम्चा ‘आदि शंकरा’ पुरस्कार, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ (पुणे)चा ‘इंदिराबाई बेहेरे’ पुरस्कार व महाराष्ट्र राज्य सरकारचा ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना’ पुरस्कार आदी पुरस्कारही मिळालेले आहेत.

डॉ. आसावरी बापट

माहुलीकर, गौरी