Skip to main content
x

मांजरेकर, वासुदेव विष्णू

           वास्तववादी शैलीतील व्यक्तिशिल्पांसोबतच भारतीय व पाश्चिमात्य शैलीच्या संयोगातून शिल्पे साकारणारे आणि पाषाणात शिल्पकाम करणारे शिल्पकार म्हणून वासुदेव विष्णू मांजरेकर प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील आकेरी या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव चंद्रभागा होते. त्यांचे शालेय शिक्षण वेंगुर्ले गावातील मिशन हायस्कूलमध्ये झाले.

           मांजरेकरांच्या घरी गणपती बनविण्याचा परंपरागत व्यवसाय होता. त्यामुळे गणपतीच्या मूर्ती घडविण्याची कला त्यांच्या अंगी होती व लहानपणापासून त्यांचा ओढा शिल्पकलेकडे राहिला. शालेय शिक्षणानंतर कलाशिक्षणासाठी त्यांनी मुंबई गाठली आणि सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टला १९४१ मध्ये त्यांनी ‘स्टोन कार्व्हिंग’ या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आणि त्यांनी हा अभ्यासक्रम आपल्या कलानैपुण्याने शिष्यवृत्ती मिळवून अवघ्या दोन वर्षांत पूर्ण केला. लगेच त्यांना गिरगाव चौपाटीवरील सुप्रसिद्ध शिल्पकार वाघ यांच्या स्टूडिओमध्ये काम करण्याची संधी मिळाली. तेथे ते तीन वर्षे कार्यरत होते.

           मांजरेकरांची १९४७ मध्ये जे.जे.त नव्याने निर्माण झालेल्या ‘कार्व्हर’ ह्या पदावर नियुक्ती झाली. त्याच दरम्यान त्यांनी शिल्पकलेच्या पाच वर्षांच्या पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आणि हा अभ्यासक्रम दोन वर्षांत प्रथम वर्ग मिळवून पूर्ण केला. १९५७ मध्ये त्यांचा विवाह वेंगुर्ला तालुक्यातील म्हापण गावाच्या सुशीला खोत यांच्याशी झाला. पहिले भारतीय कला संचालक अडूरकर यांच्या इच्छेनुसार त्यांनी नटराजाची मूर्ती तयार केली. त्यातून प्रेरणा मिळून त्यांनी वनवासी राम व सीता यांची भारतीय पुनरुज्जीवनवादी शैलीची कलातत्त्वे अंतर्भूत असलेली मूर्ती घडविली. रेखीवपणा, लयपूर्ण प्रमाणबद्धता व भारतीयत्व हे या मूर्तीचे वैशिष्ट्य असून बॉम्बे स्कूलच्या इतिहासातील हे एक महत्त्वाचे शिल्प आहे. मांजरेकरांची कारकीर्द कला शिक्षक आणि व्यावसायिक कलाकार या दोन्ही नात्यांनी गाजली. आपल्या विद्यार्थिदशेत अंगी बाणवलेल्या शिस्तीचे धडे आपल्या विद्यार्थ्यांनीही अंगी बाणवावेत असा त्यांचा आग्रह असे. कार्व्हर या पदापासून शिक्षकी पेशाला सुरुवात करून पुढील २९ वर्षे प्राध्यापक, विभागप्रमुख आणि शेवटी त्याच संस्थेत अधिष्ठाता या पदापर्यंत ते पोहोचले आणि १९७६ मध्ये ते निवृत्त झाले.

           दगड कोरताना अनावश्यक दगड तासून काढावा लागतो आणि शिल्लक ठेवलेला दगड शिल्पकाराच्या कौशल्यामुळे एका सुंदर शिल्पामध्ये रूपांतरित होतो हे तंत्र मांजरेकरांना जेवढे अवगत झाले होते, तेवढेच मातीमध्ये शिल्प घडविण्याचे तंत्रही त्यांनी विकसित केले होते. मातीमध्ये काम करताना आवश्यक तेवढीच माती लेपून शिल्प घडवावे लागते. उगाचच अनावश्यक माती लेपून पुन्हा ती काढून टाकणे त्यांना मान्य नव्हते. यासाठी लागणारे कौशल्य त्यांनी मिळवले होते, आणि असे निर्णायक कौशल्य विद्यार्थ्यांच्याही अंगी असावे, असा त्यांचा आग्रह असे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ते भरपूर वेळ देत. एवढे व्यस्त असूनही त्यांनी व्यावसायिक कलाकार या नात्याने अनेक शिल्पे घडविली.

           शिल्पकार करमरकरही मांजरेकर यांना प्रथितयश शिल्पकार मानत. अर्थात, मांजरेकरांचे कामही तसे बहुविध प्रकारात मोडणारे होते. माती, प्लास्टर, पाषाण आणि कांस्यधातू यांमध्ये त्यांनी घडविलेली शिल्पे याची साक्ष देतात. त्यांच्या काही खास शिल्पांचा आढावा घ्यायचा म्हटला, तरी ती यादी मोठीच आहे. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीमध्ये घडविलेली ‘वनवासी राम आणि सीता’, तसेच ‘नटराज’ या प्लास्टरमधील शिल्पांचा उल्लेख अवश्य करावा लागेल. यापैकी ‘विजनवासी राम आणि सीता’ या शिल्पाला १९५६ मध्ये झालेल्या पहिल्या मुंबई राज्य कला प्रदर्शनामध्ये प्रथम पारितोषिक व सुवर्णपदक मिळाले होते. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनीही या शिल्पाची स्तुती केली होती. याशिवाय मुंबईच्या ताजमहाल हॉटेलसाठी केलेला जमशेटजी टाटा यांचा संगमरवरी पुतळा, बजाज हाउससाठी जमनालाल बजाज यांचा पुतळा, गोव्याचे प्रथम मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांचा कांस्य धातूतील नऊ फूट उंचीचा पुतळा अशी मांजरेकरांची अनेक शिल्पे महत्त्वपूर्ण आहेत. याशिवाय कांस्य धातूतील भव्य शिल्पे गणेशपुरी, दिल्ली, तसेच अमेरिका, हवाई, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, जपान व इंग्लंडमधील प्रमुख शहरांतील मठांमध्ये स्थापिलेली आहेत.

           छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ पुतळे आणि सरदार वल्लभभाई पटेल, यशवंतराव चव्हाण, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी इत्यादी व्यक्तिशिल्पे, स्वामी समर्थ, महात्मा फुले, वाडिया खुसरो, मुक्तानंद अशी मांजरेकरांनी निर्मिलेली अनेक शिल्पे विविध ठिकाणी स्थापिलेली आहेत.

           छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील स्थानकाच्या इमारतीवरील देवतेची अत्यंत भव्य दगडी मूर्ती १९७१ च्या दरम्यान वीज कोसळल्यामुळे विद्रूप झाली होती. या मूर्तीची दुरुस्ती करणे हे मोठेच आव्हान होते. जे.जे.त शिल्पकला विभागाचे विभागप्रमुख असताना मांजरेकरांनी ते आव्हान स्वीकारले व ती मूर्ती अल्प खर्चात हुबेहूब पूर्वीसारखी दगडात तयार करून दिली. आजही ती स्थानकाच्या सर्वोच्च जागी स्थानापन्न आहे.

           मांजरेकरांनी व्यावसायिक कामाव्यतिरिक्त केवळ आपल्या हौसेखातरही सातत्याने अनेक लहान-मोठी शिल्पे घडविली. त्यामध्ये गणपतीसारख्या देवदेवता, भारतीय परंपरेतील नृत्यांगना, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, बाल शिवाजी आणि जिजामाता, घोडे व अन्य व्यक्तिशिल्पांचा समावेश आहे. वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षी वासुदेव मांजरेकर यांचे निधन झाले.

- अनंत बोवलेकर

मांजरेकर, वासुदेव विष्णू