Skip to main content
x

शेणॉय,कमलाक्ष मुदलगिरी

मुंबईच्या जहांगीर कला-दालनाबाहेरील पदपथावर असलेल्या ‘आर्ट प्लाझा’ या खुल्या कलादालनाचे प्रवर्तक चित्रकार कमलाक्ष मुदलगिरी शेणॉय यांचा जन्म कर्नाटकातील उडुपी येथे झाला. त्यांच्या आईचे नाव सीता होते. शेणॉय यांचे शालेय शिक्षण उडुपी येथेच झाले. लहानपणापासून त्यांना चित्रकलेचा ध्यास होता.

        घरात चित्रकलेला पोषक वातावरण नसल्यामुळे १९५२ मध्ये शेणॉय मुंबईस त्यांचे मामा पुरुषोत्तम शेणॉय यांच्याकडे आले. त्यांची चित्रकलेतील गती व आवड पाहून मामांनी त्यांना दंडवतीमठ यांच्या नूतन कलामंदिरात प्रवेश घेण्यास सांगितले. परंतु प्रत्यक्षात कमलाक्ष शेणॉय विद्युत जोडणीची साधने बनविणार्‍या एका कंपनीत फिरता विक्रेता म्हणून नोकरीस राहिले. कंपनीच्या कामानिमित्त कलकत्ता येथे गेले असता त्यांच्या चित्रकलाप्रेमाने उचल खाल्ली व नोकरी सोडून त्यांनी तेथील शासकीय आर्ट अ‍ॅण्ड क्राफ्ट महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यांचे ड्रॉइंग व पेंटिंग चांगले होते व रेषेवर हुकमत होती. परंतु चित्रकलेविषयी त्यांच्या मनात असलेल्या अभिनव कल्पनांना तेथील रीतसर कलाशिक्षणात वाव मिळेना. म्हणून त्यांनी काहीशा उद्वेगाने महाविद्यालयास रामराम ठोकला व स्वतंत्रपणे कलासाधना सुरू केली.

कलकत्त्यात प्रतिष्ठित समजल्या जाणार्‍या ‘अकॅडमी ऑफ फाइन आर्ट्स’ला १९५९ मध्ये त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्याची त्यांना अनुमती मिळाली होती. पण कलकत्त्यात त्यांचे मन रमेना म्हणून ते पुन्हा मुंबईस आले. त्यांनी १९६० ते १९७९ या काळात जहांगीर कलादालन व आर्टिस्ट सेंटर येथे प्रदर्शने भरविली; परंतु त्यांत त्यांना फारसे यश लाभले नाही.

प्रस्थापित कलादालनांमध्ये प्रदर्शने भरविणे सामान्य कलाकारांसाठी परवडणारे नाही आणि तेथील चित्रे खरेदी करणे सर्वसामान्य रसिकांच्या आवाक्याबाहेरचे आहे याची जाणीव शेणॉय यांना या काळात स्वानुभवाने झाली होती. मग त्यांनी स्वतःच्या चित्रांच्या कृष्णधवल व रंगीत झेरॉक्स प्रती अत्यल्प दरात जहांगीर कलादालनाच्या बाहेर उभे राहून विकण्याचा यशस्वी प्रयोग केला.

याच काळात शेणॉय यांच्या असेही लक्षात आले, की आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या कलाकारांना, तसेच नवोदित चित्रकारांना त्यांची चित्रे प्रदर्शित करण्यासाठी सहजपणे कलादालन उपलब्ध होत नाही. या संदर्भात काहीतरी करायला हवे असे त्यांना वाटू लागले. त्यातूनच जहांगीर ऑर्ट गॅलरीबाहेर पदपथावर त्यांनी एक चित्रप्रदर्शनही भरविले. परंतु कायमस्वरूपी काही उपाययोजना करायला हवी या विचारातून जहांगीर-बाहेरील पदपथावर लोखंडी स्टॅण्ड्स उभारून एक नि:शुल्क किंवा अत्यल्पशुल्क खुले कलादालन सुरू करावे अशी योजना त्यांनी तयार केली व तत्कालीन महानगरपालिका आयुक्त सदाशिव तिनईकर यांना ती सादर केली. त्याचा पाठपुरावा करून ती त्यांच्याकडून मंजूरही करून घेतली आणि १९८८ मध्ये ‘आर्ट प्लाझा’ सुरू झाले. ज्येष्ठ चित्र-शिल्पकार डी.जी. कुलकर्णी यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ करण्यात आला.

शेणॉय यांनी तन-मन-धन अर्पून उर्वरित आयुष्य आर्ट-प्लाझासाठी दिले. आत्ममग्न चित्रकार होण्यापेक्षा नवोदित, उपेक्षित व आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या चित्रकार समाजाचा त्यांनी विचार केला व अशा कलाकारांची मोठी सोय करून ठेवली. आज प्रस्थापित झालेल्या कितीतरी चित्रकारांच्या कारकिर्दीची सुरुवात आर्ट-प्लाझापासून झालेली आहे.

खुल्या कलादालनाचे प्रवर्तक म्हणून कमलाक्ष शेणॉय कलाजगतात ओळखले जातात. नवोदित व आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या कलावंतांना आपली चित्रे प्रदर्शित करण्यासाठी हक्काची जागा मिळवून देण्याचे कार्य कमलाक्ष शेणॉय यांनी स्वत: चित्रकार असूनही केले हे विशेष होय. दुर्दैवाने जीवनाच्या अखेरच्या टप्प्यात शेणॉय यांचे आर्ट-प्लाझा आर्टिस्ट्स असोसिएशनच्या इतर सभासदांशी मतभेद होऊन त्यांना आर्ट-प्लाझा सोडणे भाग पडले. त्यानंतर ते मनाने व प्रकृतीने खचत गेले.

अशा या इतरांच्या समस्यांचा विचार करणार्‍या क्रियाशील चित्रकाराला पनवेल येथील राजीव रंजन लाड ट्रस्टच्या आधारगृहात डी.जी. कुलकर्णींच्या स्मरणार्थ बांधलेल्या व चित्र-शिल्पकारांसाठी प्राधान्य असलेल्या खोलीत जाऊन राहावे लागले. ते जन्मभर अविवाहित राहिले. नातेवाइकांपासून व मित्रमंडळींपासून दूर, एकाकी अवस्थेत, तेथेच त्यांचा अंत झाला.

- डॉ. गोपाळ नेने

शेणॉय,कमलाक्ष मुदलगिरी