Skip to main content
x

कँडी, थॉमस

प्राचार्य, लेखक, व्यवस्थापक

थॉमस कँडी हा ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात काम करत होता. सन १८२२ मध्ये कंपनीच्या लष्करात तो भरती झाला व मुंबईस आला त्याने महाराष्ट्रातील विविध शैक्षणिक कार्यात सहभागी झाला. विशेषतः शब्दकोश, मराठी क्रमिक पुस्तकांचे लेखन, इंग्रजी पुस्तकांचे व इंग्रजी कायद्यांचे मराठीत भाषांतर, शिक्षण संस्थांचे व्यवस्थापन, शिक्षणासंबंधी नवीन उपक्रम या क्षेत्रातील कँडीचे योगदान मोठे आहे. मराठी इन टू इंग्लिश व इंग्लिश इन टू मराठी या दोन शब्दकोशांच्या निर्मितीत त्याने मोल्सवर्थ यास मदत केली. कॅप्टन कँडी हा मुळात लष्करी अधिकारी असल्याने तो फार शिस्तप्रिय होता व ही शिस्त संस्थांचे व्यवस्थापन व लेखन यामध्ये तो कसोशीने पाळे.

सन १८२१ मध्ये पुण्यातील विश्रामबागवाडा येथे  महाराष्ट्रातील पहिले महाविद्यालय सुरू झाले. संस्कृत महाविद्यालय किंवा हिंदू महाविद्यालय वा पुना महाविद्यालय या नावाने त्याचा उल्लेख केला जातो. ह्या महाविद्यालयाचे सुरुवातीचे प्राचार्य  राघवाचार्य ह्यांनी १८२१ - ३८ या काळात महाविद्यालयाचे प्रमुखपद भूषविले. त्यांच्या रजेच्या काळात अनंताचार्य, नारायणाचार्य, नरसिंहाचार्य इत्यादींनी कार्यभार सांभाळला. महाविद्यालयव्यवस्थेवर देखरेख ठेवण्यासाठी एक समिती होती. जिल्हाधिकारी, आयुक्त इत्यादी ब्रिटीश अधिकारी समितीचे सभासद असत. त्यांच्या इतर कामामुळे ते महाविद्यालयांच्या दैनंदिन कारभारात फारसे लक्ष घालत नसत. पण काही काळानंतर महाविद्यालयाच्या व्यवस्थापनात लक्ष घालावे असे ब्रिटीश शासनास वाटू लागले. परंतु त्यात फारसे यश मिळाले नाही. महाविद्यालयाच्या दैनंदिन कारभारात इंग्रज अधिकार्‍यांनी लक्ष घालू नये असे महाविद्यालयातील प्राध्यापकांना वाटे. प्राध्यापक ब्रिटीश अधिकार्‍यास वर्गात येताना त्यांनी आपली पादत्राणे बाहेर काढावीत अशा अनेक अटी घालत असत. ब्रिटीश अधिकारी वर्गाशेजारी आला वा वर्गात आला तर प्राध्यापक शिकवणे बंद करी. आपल्या धर्मग्रंथांचे शब्द परक्यांच्या कानावर पडू नयेत याची ते काळजी घेत. काही ब्रिटीश अधिकार्‍यांना हे फारच खटकले. आपण राज्यकर्ते असूनही महाविद्यालयातील प्राध्यापक आपल्याला मान देत नाहीत, शासनाविरोधी मत व्यक्त करतात व तसा विरोधी प्रचार करतात हे ब्रिटीश राज्यकर्त्यांच्या संतापाचे कारण होते, ब्रिटीश विरोधी वातावरण मोडून काढण्याच्या उद्देशाने ब्रिटीशांनी महाविद्यालय व्यवस्थापनात बदल केला.

संस्कृत जाणणारा कोणी ब्रिटीश नागरिक उपलब्ध नव्हता त्यामुळे महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कोणा ब्रिटीश माणसाची नेमणूक करता येईना. तेव्हा ब्रिटीश शासनाने अधीक्षक  हे पद निर्माण केले व कॅप्टन थॉमस कँडी या लष्करी अधिकार्‍याची त्या पदावर नेमणूक केली. (१८३८) कँडी हा शिस्तप्रिय अधिकारी होता. त्याने त्याच्याविरूद्ध कार्य करणारे प्राचार्य नारायणाचार्य व दोन प्राध्यापक यांना काढून टाकले. निमित्त झाले होते एक टेबल. शिकविताना गुरू जमिनीवरील आसनावर बसत असत व समोर विद्यार्थी बसत. कँडीला ही पद्धत गैरसोयीची वाटे म्हणून त्याने एके दिवशी टेबल खुर्ची वर्गात पाठवली. परंतु टेबल खुर्ची ही भारतीय संस्कृतीला छेद देणारी आहे म्हणून वर्गातील गुरूने टेबलखुर्ची स्वीकारण्यास नकार दिला व ती परत पाठविली. कँडीला मराठी येत होते पण संस्कृत येत नव्हते. त्याला संस्कृत शिकायची फार इच्छा होती. पण संस्कृत प्राध्यापकांचे त्यास सहकार्य मिळत नसे. कँडी वर्गात आल्यावर प्राध्यापक संस्कृत शिकवणे बंद करत. यामुळेच त्याने प्राचार्य व दोन प्राध्यापकांना निलंबित केले. त्यातील दोन प्राध्यापकांनी दिलगिरी व्यक्त केल्यावर त्यांना परत घेतले पण प्राचार्यांना परत कामावर घेतले नाहीच; शिवाय त्यांचा पगारही त्यांना दिला नाही.

कँडीने परीक्षा पद्धतीतही बदल केला. परीक्षेला सार्वजनिक स्वरूप दिले. परीक्षेच्या वेळेला विद्यार्थ्यांचे गुरू, गावातील विद्वान व युरोपियन अधिकारी हजर असत. परीक्षा उत्तीर्ण होणार्‍यांच्या तीन श्रेणी ठरवल्या. विद्यार्थ्यांना विद्यावेतन मिळे. पण ते काहींनाच मिळे. कँडीच्या लिखाणात अनेक विद्यार्थी भीक मागून उपजिविका करत असा उल्लेख आहे. माधुकरी मागून विद्यार्थ्याने शिक्षण पुरे करायचे अशी ब्राह्मणसमाजात पूर्वापार चालत आलेली पद्धत  होती. त्याची माहिती कँडीला नसल्याने तो विद्यार्थी भिकारी असल्याचा उल्लेख कँडीच्या लिखाणात आढळतो. सर्व विद्यार्थ्यांना सुरवातीस विद्यावेतन मिळे. विद्यावेतन बंद करावे असे त्यास वाटे, पण हे पैसे दक्षिणा फंडातून दिले जात असल्याने ते बंद करता आले नाहीत. सर्वांना समान वेतन न देता ते त्रिस्तरीय पद्धतीने द्यावेत अशी त्याने योजना केली. उत्तम, माध्यम व कनिष्ट अशा तीन श्रेण्यांची योजना सुचवली. ज्यांना कनिष्टपेक्षा कमी श्रेणी मिळेल. त्यांना महाविद्यालयातून काढून टाकावे असे त्याने सुचवले.

महाविद्यालयात सुरुवातीला फक्त संस्कृत शिकवले जाई. चार वेद व इतर सहा शास्त्रे ह्यांचे शिक्षण दिले जाई. कँडीला वेदशिक्षण देणे पसंत नव्हते. वेदशिक्षक हे ब्रिटीशविरोधी आहेत असा कँडीचा समज होता. वेद शिक्षण घेतलेले ब्रिटीशांच्या नोकरीत येत नसत. त्याचप्रमाणे त्या शिक्षणाचा शासकीय कामात उपयोग नाही असे त्याचे म्हणणे होते. महाविद्यालयाचे शिक्षण पूर्ण केले तरी त्या विद्यार्थ्यांना मराठीत साधे पत्रही लिहीता येत नाही हे योग्य नाही. तरी महाविद्यालयात वेदशिक्षणाचे महत्त्व कमी करावे व त्याऐवजी मराठी विषयाचे शिक्षण द्यावे असे त्याने सुचवले. पण मराठी भाषेत पुस्तके नव्हती. तेव्हा ती पुस्तके निर्माण करण्यासाठी लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी दक्षिणा प्राईज देण्यास सुरूवात झाली. मेजर कँडी हा या दक्षिणा प्राईज समितीचा बराच काळ सभासद होता. परीक्षक म्हणून तो पुस्तके स्वतः अभ्यासत असे व त्यात सुधारणा सुचवे. अशुद्ध लिखाण त्यास पसंत नसे व पुस्तक व्याकरणदृष्ट्या शुद्ध असावे यावर त्याचा कटाक्ष होता. त्याने स्वतः मराठी व्याकरणावर पुस्तक लिहिले आहे. मराठीतील विरामचिन्हांचा जनक कँडी आहे.कँडी पूर्वकाळात स्वल्पविराम, अर्धविराम, पूर्णविराम, उद्गारचिन्ह, प्रश्‍नचिन्ह, अवतरणचिन्ह यांचा मराठी लेखनात उपयोग होत नसे. कँडीने त्याचा प्रसार केला.

कँडीने मराठी पुस्तके छापण्यासाठी महाविद्यालयात छापखाना सुरू केला. व त्यासाठी यंत्रसामग्री व कौशल्यप्राप्त कारागीर मिळविले. वेद शिकवणे बंद झाल्यामुळे वैदिक शिक्षणावर होणारा खर्च वाचला याचा विनियोग छापखाना उभारण्यासाठी व चालवण्यासाठी करण्यात आला.

महाविद्यालयात प्राचार्य आणि अधीक्षक असे दोन अधिकारी महाविद्यालय व्यवस्थापन पहात. दोन अधिकार्‍यांचे एकमेकाशी पटत नव्हते. विष्णुशास्त्री बापट हे प्राचार्य होते. कँडी व बापट हे दोघेही तापट व मानी होते. शास्त्रीमंडळी कँडीशी फटकून वागत व अध्यापन कार्यात त्यास सहभागी करून घेत नसत. त्यामुळे मेजर कँडीने बापटांना पदावरून हटवले व स्वतःच प्राचार्य झाला.

१८५३ ते १८५७ ह्या काळात तो प्राचार्य  म्हणून कार्यरत होता. कॉलेजचा प्राचार्य  व अधीक्षक ह्याच्या पगारातही फरक असे. कँडीला जास्त पगार होता (रू. १२०) तर देशी प्राचार्य (रू. १००) कमी पगार होता. कँडी हा परदेशी होता. पण त्याचा पगारही दक्षिणा फंडातून देण्यात येई. याला समाजातून विरोध होता.

पेशवाईच्या काळात विश्रामबागवाड्यात व्यासपुजा, होळी, गणेशचतुर्थी, संक्रांत व दिवाळी हे सण साजरे होत. पेशवाईचा अंत झाल्यावर विश्रामबागवाड्यात संस्कृत महाविद्यालय सुरू झाले. त्यामुळे वाड्यात चालू असलेले हिंदू सण पुुढेही चालू राहिले. सुरूवातीच्या काळात लोकक्षोभ होऊ नये म्हणून ते जरूरीचेही होते. पुना कॉलेजात म्हणजेच, सरकारी संस्थेत, हिंदू सण साजरे व्हावेत हे ब्रिटीश मंडळींना खटकत होते.

कँडी सन १८५७ मध्ये पुना कॉलेजचा प्राचार्य  म्हणून निवृत्त झाला व तो इंग्लंडला जाऊन स्थायिक झाला. मराठी भाषेवर प्रेम करणारा, मराठी-इंग्रजी कोशकार, मराठी पुस्तकांना उत्तेजन देणारा, कायद्याची पुस्तके मराठीत भाषांतर करणारा, मराठी व्याकरणावर पुस्तक लिहिणारा, मराठीत विरामचिन्हांचा प्रसार करणारा, एक शिस्तप्रिय शिक्षण व्यवस्थापक म्हणून मराठी माणसाला त्याची नेहमीच आठवण राहील.

- डॉ. नीलकंठ बापट

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].