Skip to main content
x

कुलकर्णी, अनंत रामचंद्र

         शिवकालीन महाराष्ट्राचा राजकीय इतिहास हा सर्वांच्याच आस्थेचा आणि अभिमानाचा विषय आहे. जेम्स कनिंगहॅम ग्रँट पासून या कालखंडाच्या राजकीय इतिहासावर पुन्हा पुन्हा चांगल्या रितीने लिहिले गेले आहे किंबहुना आजही लिहिले जात आहे. डॉ. . रा. कुलकर्णी यांनी मात्र शिवकालीन महाराष्ट्राचा सामाजिक आणि आर्थिक अंगाने विशेष अभ्यास केला आहे. डॉ. कुलकर्णी यांचे वेगळेपण असे आहे की, त्यांना उपलब्ध असणारी साधनसामग्री त्यांच्या पूर्वीच्या इतिहास संशोधकांपेक्षा अधिक होती. अपरिहार्यपणे उपरोक्त कालखंडाची त्यांनी केलेली मांडणी अधिक परिपूर्ण झाली आहे. म्हणूनच ‘Maharashtra in the Age of Shivaji’ (१९६९) आणि शिवकालीन महाराष्ट्र’(१९७८) हे कुलकर्णी यांचे ग्रंथ अत्यंत वस्तुनिष्ठ आणि मौलिक ठरले आहेत.

उपलब्ध साधनांचा समर्पक उपयोग आणि साधार विवेचन करणारे अनंत रामचंद्र कुलकर्णी यांचा जन्म १९ एप्रिल १९२५ रोजी दड्डी, ता. निपाणी, जि. बेळगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव बनाबाई, तर  वडिलांचे नाव रामचंद्र होते. .रा. कुलकर्णी नावाने पुढे ते ख्यातकीर्त झाले.

.रा. कुलकर्णी राणी पार्वतीदेवी महाविद्यालय बेळगाव, अमेरिकन मराठी मिशन्स कॉलेज अहमदनगर, दयानंद कॉलेज सोलापूर, मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद इत्यादी ठिकाणी प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी इ.. १९६४ मध्ये ‘Maharashtra in the Age of Shivaji’ हा प्रबंध मराठवाडा विद्यापीठात सादर केला. मराठवाडा विद्यापीठाचे इ.. १९६४ अखेर ते डॉक्टरझाले. डॉक्टरेट मिळाल्यानंतर काही काळ डेक्कन कॉलेज, पुणे येथे आणि पुढे पुणे विद्यापीठात ते इतिहासाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. निवृत्तीनंतर इ.. १९९३ ते १९९६ या काळात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे मानद कुलगुरू झाले.

महाराष्ट्र इतिहास परिषदेची आणि अखिल भारतीय इतिहास परिषदेची अध्यक्षपदे त्यांनी भूषवली. . . १९६९ मध्ये मराठ्यांचा आद्य इतिहासकार जेम्स कनिंगहॅम ग्रँट डफ यावर त्यांनी न.चिं. केळकर व्याखानमालेत एकूण सहा व्याखाने दिली. त्यांची व्याख्याने इ. . १९७१ मध्ये पुणे विद्यापीठाने ग्रंथरूपाने प्रकाशित केली. कीर्तने, राजवाडे आणि खरे शास्त्री या सर्वांनी डफच्या इतिहासातील दोष दाखवले होते. त्याचा इतिहास कालबाह्य ठरवण्यात आला होता. . रा. कुलकर्णी यांनी ज्या परिस्थितीत डफने इतिहासलेखन केले त्याचा विचार केला पाहिजे, असे सैद्धान्तिक विवेचन केले. त्याच्या इतिहासाची घडण कशी झाले हे स्पष्ट केले. कुलकर्णी यांच्या विवेचनामुळे ग्रँट डफची वेगळी प्रतिमा निर्माण झाली, याची आवर्जून नोंद घेणे गरजेचे आहे. ग्रँट डफ संदर्भातील कुलकर्णी यांचा पूर्वग्रहविरहित निकोप दृष्टीकोन इतिहास अभ्यासकांसाठी वस्तुपाठ आहे.

.रा.कुलकर्णी यांनी विपुल इतिहासलेखन केले आहे. शिवकालीन महाराष्ट्र’, ‘पुण्याचे पेशवे’, ‘कंपनी सरकार’, ‘अशी होती शिवशाही’, ‘जेम्स कनिंगहॅम ग्रँट डफ्’, मराठे आणि महाराष्ट्र’, ‘मराठ्यांचे इतिहासकारआदी त्यांचे प्रसिद्ध ग्रंथ आहेत इंग्लिशमध्ये‘Maharashtra in the Age of Shivaji’, ‘The Marathas’, ‘Medieval Maharashtra’, ‘Medieval Maratha Country’, ‘ Maharashtra Society and Culture’, “James Cunningham Grant Duff’, ‘Maratha Historiography’ आदी त्यांच्या ग्रंथांमुळे मराठा इतिहास लेखनाचे क्षेत्र संपन्न झाले आहे. सामाजिक आणि आर्थिक इतिहास लेखनासाठी बारीकसारीक माहिती कणाकणाने गोळा करावी लागते. सामाजिक आर्थिक इतिहास हा मुख्यत्वे लोकांचा इतिहास असतो. शिवकालीन महाराष्ट्र सामाजिक, आर्थिक अभ्यासहा कुलकर्णी यांच्या प्रबंधाचा विषय होता. त्यामुळे शिवकालीन महाराष्ट्राचा अभ्यास हाच त्यांच्या संशोधनाचा केंद्रबिंदू होता. त्यांनी शिवकालीन महाराष्ट्रया विषयावर शिवाजी विद्यापीठाच्या मराठा इतिहास व्याख्यानमालेत जानेवारी १९७७ मध्ये तीन व्याख्याने दिली. शिवकालीन समाजाचे सामाजिक आणि आर्थिक समग्र विवेचन यापूर्वी एवढे साधार आणि सखोल झाले नव्हते. मराठी, फार्सी, डच, पोर्तुगीज आणि इंग्लिश कागदपत्रांच्या आधारे केलेली ही मांडणी परिपूर्ण आणि इतिहासनिष्ठ आहे.

तत्कालीन शेती, गावगाडा, उद्योगधंदे, बाजारपेठा, समाजजीवन, दुष्काळ, अर्थव्यवस्था, लोकसंख्या, प्रशासन खर्च आदीबाबत तपशीलवार माहिती नंतर शिवकालीन महाराष्ट्रया ग्रंथाद्वारे शिवाजी विद्यापीठ प्रकाशनाने प्रकाशित केली आहे. शिवकालीन लोकजीवनाचा अभ्यास करून अ.रा.कुलकर्णी यांनी काढलेला श्री शिवछत्रपती यांच्या संदर्भातील निष्कर्ष अधोरेखित करण्यासारखा आहे. डॉ.कुलकर्णी यांनी म्हटले आहे की, ‘नूतन मराठी राज्य निर्माण करूनच ते थांबले नाहीत, तर हे राज्य सुजलाम सुफलामहोण्यासाठी त्याचा आर्थिक पाया बळकट कसा होईल याचाही त्यांनी विचार केला. म्हणून शिवाजी महाराज म्हणजे, मध्ययुगातील एक थोर रचनात्मक काम करणारा प्रशासक होय.शिवकालीन महाराष्ट्राचा सामाजिक आणि आर्थिक अंगाने प्राध्यापक डॉ. कुलकर्णी यांनी घेतलेला हा वेध महत्त्वाचा आणि म्हणून मौलिक स्वरूपाचा आहे. डॉ. कुलकर्णी यांच्या इतिहास लेखनाची मौलिकता स्पष्ट करताना इरफान हबीब म्हणतात, ‘प्रा.कुलकर्णी यांनी मराठ्यांच्या राजकीय इतिहासाच्या स्वरूपाचे योग्य आकलन व्हावे यासाठी सामाजिक व आर्थिक परिस्थितीचा वेध घेण्याच्या परंपरेला चालना दिली.या संदर्भात पुढे त्यांनी नमूद केले आहे की, ‘मराठ्यांच्या विद्यमान इतिहासकारांमध्ये त्यांचे कार्य पायाभूत म्हणावे लागेल.

डॉ. ओमप्रकाश समदाणी

कुलकर्णी, अनंत रामचंद्र