कुरुंदकर, नरहर अंबादास
नरहर अंबादास कुरुंदकर मराठवाड-महाराष्ट्रभर ‘गुरुजी’ या नावाने परिचित होते. हाडाचे शिक्षक असणाऱ्या नरहर कुरुंदकरांचा जन्म परभणी जिल्ह्यातील नांदापूरला झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण वसमतला झाले. मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण त्यांनी हैद्राबादच्या सिटी हायस्कूलमधून पूर्ण केले. त्यांनी उच्च शिक्षणासाठी हैद्राबादच्याच सिटी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला.
हैद्राबाद येथे शिकत असताना तिथल्या स्टेट लायब्ररीत बसून त्यांचे अखंड वाचन सुरू झाले. संस्कृती, धर्म, तत्त्वज्ञान, शिक्षण, वाङ्मय, राजकारण, इतिहास, अर्थशास्त्र अशी हाती पडतील ती पुस्तके त्यांनी वाचून काढली. मार्क्सवादी विचारसरणीने त्यांना अधिक प्रभावित केले होते. सुरुवातीपासून नरहर कुरुंदकर पूर्ण जडवादी, मार्क्सवादी होते. त्यांचे पहिले पुस्तक ‘रूपवेध’ इ.स. १९६३ मध्ये प्रकाशित झाले. महाराष्ट्र शासनाने ‘उत्कृष्ट साहित्यकृती’चा पुरस्कार देऊन या पुस्तकाला गौरविले आहे. या पुस्तकात सौंदर्यशास्त्र, साहित्य सिद्धान्त, वाङ्मय समीक्षा आदींशी संबंधित लेखांचा समावेश आहे. ‘रूपवेध’पूर्वी डॉ. शिवाजी गऊळकर यांच्या समवेत त्यांनी ‘रिचडर्सची कलामीमांसा’ (इ.स. १९६२) हे पुस्तक लिहिले होते.
इ.स. १९६७ मध्ये ‘मागोवा’ हा त्यांचा ऐतिहासिक लेखांचा संग्रह प्रसिद्ध झाला. या ग्रंथामध्ये ‘भारतीय संगीत : एक आढावा’, ‘शाकुंतल : इतिहास, पुराण व काव्य’, ‘बेंद्रे यांचा संभाजी’, ‘कै. त्र्यं.शं. शेजवलकर’, ‘लोकायत’ हे विविध प्रकारचे संदर्भमूल्य असणारे लेख समाविष्ट आहेत. ‘गाजर’ (१९६९) या पुस्तकामध्ये विविध विषयांवर चिकित्सक, संशोधनपर लेख आहेत. इ.स. १९७० मध्ये ‘शिवरात्र’ हे त्यांचे आणखी एक पुस्तक प्रसिद्ध झाले. कुरुंदकरांचे ‘धार आणि काठ’ (१९७१) हे मराठी कादंबरीचा आढावा घेणारे, ‘पायवाट’ (१९७४) हे वाङ्मयसमीक्षेचे पुस्तक प्रसिद्ध झाले. ‘छायाप्रकाश’ (१९७९), ‘भजन’ (१९८१), ‘आकलन’ (१९८२) ही त्यांची आणखी काही गाजलेली पुस्तके. कुरुंदकर समाजवादाचे पुरस्कर्ते होते. समाजवाद, इहवाद, उदारमतवाद, लोकशाही यांविषयी ते कायम बोलत राहिले. सर्वांना समजेल अशा भाषेत बोलणारा, विचार प्रसृत करणारा कृतिशील विचारवंत ही त्यांची खरी ओळख होती.
‘मनुस्मृती’ (१९८२) हे कुरुंदकरांचे विवाद्य विषयावरचे मूलगामी विवेचन करणारे पुस्तक होय. या ग्रंथाव्यतिरिक्त विविध विषयांवर त्यांच्या काही पुस्तिका प्रकाशित झाल्या आहेत. यात ‘वर्ण-वर्ग निराकरणाचा लढा’, ‘आरक्षणाचा प्रश्न’, ‘हमीद दलवाई’, ‘लोकशाही : अन्वय आणि अर्थ’, ‘छत्रपती शिवाजी महाराज जीवन रहस्य’, ‘राष्ट्रवाद आणि समाजवाद’ इत्यादी प्रदीर्घ व्यासंगपूर्ण लेखांचा उल्लेख करावा लागेल. हैद्राबादच्या स्वातंत्र्यसंग्रमाच्या संदर्भात कुरुंदकरांनी लिहिलेल्या स्फुट लेखांचा आणि याच विषयावर भांगडीया स्मारक व्याख्यानमालेतील तीन व्याख्यानांचा ‘हैद्राबाद विमोचन आणि विसर्जन’ हा ग्रंथ इ.स. १९८५ मध्ये प्रकाशित झाला आहे. या ग्रंथामध्ये हैद्राबाद मुक्तिसंग्रमाव्यतिरिक्त इतर आनुषंगिक घटना व व्यक्ती यांचे निर्देश आणि चर्चा आहे.
कुरुंदकरांच्या मृत्युपश्चात त्यांची महत्त्वाची अशी काही पुस्तके प्रकाशित झालेली आहेत : ‘वाटचाल’ (१९८८), ‘अभयारण्य’ (१९८५), ‘अन्वय’ (१९८६), ‘परिचय’ (१९८७), ‘वारसा’ (१९८७), ‘अभिवादन’ (१९८७), ‘रंगशाळा’ (१९९४) इत्यादी पुस्तकांचा येथे उल्लेख करता येऊ शकेल. ‘रूपवेध’ या पुस्तकाप्रमाणे ‘शिवरात्र’ आणि ‘धार आणि काठ’ या त्यांच्या ग्रंथांना महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वाङ्मय- निर्मितीचे पुरस्कार मिळाले. मराठवाडा साहित्य परिषदेचे ते अनेक वर्षे अध्यक्ष होते. आकाशवाणी, भारतीय साहित्य अकादमी, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आदी प्रतिष्ठित संस्थांचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले. त्यांना महाराष्ट्र शासनाचा ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार मिळाला होता. इतिहासकार किंवा इतिहास संशोधक या संदर्भात काही विशिष्ट संकल्पना रूढ आहेत. या रूढ चौकटीत कुरुंदकर बसतात किंवा नाही हा मुद्दा महत्त्वाचा नाही. सामाजिक संवेदना अत्यंत प्रखर असणारा विचारवंत भोवतालच्या समाजजीवनात घडणार्या घटनांचे सूक्ष्म निरीक्षण करीत असतो. त्यामुळे मराठी विषयाचे प्राध्यापक असणाऱ्या कुरुंदकरांचे समाजकारण, राजकारण, इतिहास यांसारखे विषयसुद्धा चिंतन, मननाचे असतात.
अशा समाजहितैषी विचारवंतांना समाजजीवनाचा वेध घेत असताना वर्तमानकालीन प्रश्नांचे धागेदोरे भूतकाळात कुठेतरी गुंतलेले असतात याची जाणीव असते आणि म्हणून इतिहासाचा अभ्यास त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. समाजाच्या स्थिती-गतीचा हा अभ्यास समाजाच्या उन्नती-प्रगतीसाठी आणि विशिष्ट वैचारिक दिशा देण्याच्या प्रेरणेने केलेला असतो. आयुष्यभर पत्करलेल्या जीवननिष्ठांच्या प्रेरणा अशा प्रकारच्या चिंतन, मनन आणि लेखनाच्या मुळाशी असतात.
कुरुंदकरांच्या इतिहास मीमांसेची मौलिकता लक्षात घेऊनच महाराष्ट्र इतिहास परिषदेचे (धुळे, १९८२) विभागीय अध्यक्षपद भूषविण्याचे भाग्य त्यांना लाभले. इतिहासतज्ज्ञ किंवा संशोधक असण्याच्या संदर्भात स्वत:विषयी कुरुंदकरांनी असे म्हटले आहे की, ‘इतिहास हा माझ्या वाचन, चिंतनाचा आणि अभ्यासाचा अल्प प्रमाणात भाग असला, तरी मी कोणत्याही कक्षेत बसू शकेल असा इतिहास संशोधक नाही, याची मला जाणीव आहे. इतिहास तज्ज्ञ किंवा इतिहास संशोधक या उपाधीवर कोणत्याही प्रकारचा अधिकार मी सांगणार नाही.’
इतिहास अभ्यास आणि संशोधन यांची नवी-नवी क्षितिजे शोधण्यासाठी कुरुंदकर सातत्याने कार्यरत राहिले. महाकाव्य, नाटके, जैन वाङ्मय, बौद्ध वाङ्मय, वैदिक वाङ्मय, प्राचीन मराठी वाङ्मय इत्यादींची त्यांनी काळजीपूर्वक तपासणी केली. महाभारत, भगवद्गीता, मनुस्मृती, नाट्यशास्त्र इत्यादी ग्रंथांवरील त्यांच्या लिखाणामधून भारताचा प्राचीन इतिहास, पुराणे आणि संस्कृती यांचे अपूर्व दर्शन घडते. महाकाव्यकालीन साधनांचे महत्त्व स्पष्ट करताना रामायणाची व महाभारताची अधिकाधिक चर्चा होण्याची व्यापक भूमिका त्यांनी मांडली आहे. महाभारत हा सातत्याने प्रक्षेप होत गेलेला ग्रंथ आहे याची अभ्यासकांनी कायम जाणीव ठेवली पाहिजे, अशी त्यांची आग्रही भूमिका होती. प्राचीन भारतातील विसंवादांनी भरलेल्या वर्णव्यवस्थेचा कुरुंदकरांनी अत्यंत सम्यक दृष्टीने अभ्यास केला. त्यांनी असे म्हटले आहे, की वर्णव्यवस्था कधी अस्तित्वात नव्हती. अस्तित्वात होती ती जातीव्यवस्था. धर्मग्रंथातील संदर्भाशिवाय वर्णव्यवस्थेचे प्रत्यक्ष व्यवहारात कुठेही अस्तित्व नव्हते. वर्णव्यवस्थेच्या नावाने जातिव्यवस्थेचे समर्थन होते म्हणून वर्णव्यवस्थेचा विरोध करावा लागतो. बौद्ध धर्माच्या मर्यादा स्पष्ट करून त्या धर्माचे ऐतिहासिक श्रेष्ठत्व कुरुंदकर स्पष्टपणे नमूद करतात. या अनुषंगाने ते असे म्हणतात, की जगाच्या संस्कृतीला भारताने दिलेली बौद्ध धर्म ही सर्वांत मोठी देणगी आहे. बौद्ध धर्म इतर धर्मांपेक्षा वेगळा असून तो केवळ धर्म नाही, तर ते अखंड त्याग व सेवाभावाचे वलय असलेले एक अभियान आहे...
तुलनात्मक विचार करता सर्वसमावेशक जागतिक धर्म असे हिंदू धर्माचे स्वरूप नव्हते. प्रसरणशीलता धर्माचे वैशिष्ट्यपूर्ण कार्य आहे. परंतु हिंदू धर्मास हे तत्त्व लागू पडत नाही. कुरुंदकर पुढे असे म्हणतात, की चित्र, शिल्प, मूर्ती ह्या कलांच्या क्षेत्रात सगळी भारतीय संस्कृती बौद्धांची अनुयायी आहे. ज्ञानाच्या क्षेत्रातही हेच सत्य आहे. हे ऐतिहासिक सत्य कोणताही पूर्वग्रह न ठेवता कुरुंदकर निर्भीडपणे मांडतात. भारतीय इतिहासातील अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांचा त्यांनी तटस्थपणे शोध घेतला आहे. सांख्य, चार्वाक तत्त्वज्ञानाचासुद्धा त्यांनी शोध घेतला. प्रा.डी.डी. कोसंबींच्या भगवद्गीतेवरील लेखावर त्यांनी भाष्य केले आहे. या सर्व लिखाणामधून कुरुंदकरांच्या विचारावरील मार्क्सवादाचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो.
कुरुंदकरांनी इतिहास मीमांसा करीत असताना वि.का.राजवाडे, द.वा.पोतदार आणि शेजवलकर यांचे इतिहासचर्चा घडविण्याचे कार्य पुढे चालविले. हे करताना कुरुंदकर मार्क्सवादाची जोड देतात; कारण त्यांच्या दृष्टीने मार्क्सचे दर्शन कुणावर काही लादण्यासाठी नसून माणसाच्या मुक्ततेची खात्री देणारे दर्शन आहे.
कुरुंदकरांच्या मराठ्यांच्या इतिहासविषयक भूमिकेचा विचार शेजवलकरांवरील लेख,बेंद्रे यांचा संभाजी,‘श्रीमान योगी’ या कादंबरीची प्रस्तावना, महाराष्ट्र इतिहास परिषदेतील भाषण, ‘शिवराजमुद्रा’तील लेख, लाड स्मृती व्याख्यानमालेतील त्यांनी दिलेली व्याख्याने, छत्रपती शिवाजी महाराज जीवन रहस्य, अकबर इत्यादी वेळोवेळी लिहिलेल्या लेखांमधून दृग्गोचर होतो.
मराठ्यांच्या इतिहास लेखनामध्ये राजवाडे, शेजवलकर या दोन ठळक प्रवाहांपेक्षा कुरुंदकर वासुदेवशास्त्री खरे यांच्या इतिहासमीमांसेला अधिक इतिहासनिष्ठ मानतात. या संदर्भात ते असे म्हणतात की, वासुदेवशास्त्री खरे यांच्या विवेचनाची वारसदारी आपणांला अजून पचविता आलेली नाही. या प्रवाहांपेक्षा कुरुंदकरांचे लेखन स्वातंत्र्योत्तर कालखंडातले आणि म्हणून काही बाबतींत वेगळे आहे. स्वातंत्र्यलढ्याची गरज संपून नव्या जाणिवा आणि नव्या समस्या निर्माण झाल्या होत्या. वर्तमानकालीन वास्तवाशी सुसंगत, सत्याच्या शोधासाठी नजीकच्या भूतकाळाची संपूर्ण छाननी करण्यासाठी ते उत्सुक होते.
ही छाननी करताना कुरुंदकरांनी मराठ्यांच्या इतिहासासंबंधी दोन बाबी आग्रहाने नोंदविल्या आहेत. त्यांतील पहिली बाब म्हणजे शिवाजी महाराज, संभाजी महाराज अथवा बाजीराव पेशवे यांची शौर्यगाथा सांगताना व गुणवर्णन करताना भारतात रेनेसान्स झालेला नाही हे ध्यानात घेतले पाहिजे, आणि दुसरी बाब म्हणजे या व्यक्तींची मूल्यमापने त्यांच्या चरित्र व चारित्र्यावर न करता त्यांचे सामाजिक कर्तृत्व व हिंदूंच्या इतिहासातील स्थान यांकडे पाहिले पाहिजे.
शिवाजी महाराजांचे कार्य कोणते आहे? त्यांचे मोठेपण कशात आणि कशासाठी आहे? छत्रपतींच्या मर्यादा कोणत्या? आदी प्रश्नांची छाननी कुरुंदकरांनी केली आहे. ही छाननी करताना ते नमूद करतात, की अजूनही शिवाजी महाराज खर्या अर्थाने इतिहासाचा भाग झालेले नाहीत. ऐतिहासिक व्यक्तींविषयी ज्या निर्विकारपणे चर्चा व्हावयाला पाहिजे, ती निर्विकारता आजही महाराष्ट्रीय मनाला शक्य नाही. छत्रपतींच्या राज्यनिर्मितीच्या खटाटोपाची चर्चा करताना कुरुंदकर म्हणतात, की छत्रपतींचा प्रयत्न नवे राष्ट्रच जन्माला घालण्याचा आहे. या नव्या राष्ट्रात हिंदू धर्माला सन्माननीय स्थान, त्याचबरोबर इतरांचे न्याय्य हक्क जतन करण्याचाही विचार आहे. प्रजेच्या सुखाचा, त्याचप्रमाणे राज्य टिकविण्याचाही विचार आहे. हा युगप्रवर्तक विचार करणारी सत्ता सतराव्या शतकातील राजेशाही सत्ता आहे. राज्याची दुसरी पर्यायी पद्धत त्या वेळेच्या भारताला उपलब्ध नाही. सतराव्या शतकातील राजेशाही असणे यात काही गैर आहे, असे कुरुंदकरांनी म्हटलेले नाही.
मराठ्यांच्या इतिहासाची कुरुंदकरांनी केलेली मीमांसा अतिशय तर्कशुद्ध व प्रभावी आहे. मुस्लिम राजे आणि सरदार यांनी दगा देणे यात नाविन्य काय होते? परंतु, छत्रपतींनी त्यांचे तंत्र आत्मसात करून त्याचा शत्रूवर यशस्वी उपयोग करणे ही छत्रपतींची महत्ता वाढविणारी आणि इतिहासप्रवाह बदलून टाकणारी घटना आहे. या अंगाने शिवछत्रपतींच्या मोठेपणाचा घेतलेला हा वेध नाविन्यपूर्ण स्वरूपाचा आहे. मराठ्यांच्या इतिहास मीमांसेचे क्षेत्र दुबळे आहे या पार्श्वभूमीवर आपल्या मूलगामी, मर्मग्रही आणि तर्कसुसंगत विवेचनाने हे दुबळे क्षेत्र त्यांनी संपन्न केले आहे याची आवर्जून नोंद घेतली पाहिजे.
— डॉ. ओमप्रकाश समदाणी