Skip to main content
x

मुजुमदार, गणेश गंगाधर

     सायनशास्त्रातील ‘विद्या-वाचस्पती’ ही सर्वोच्च पदवी प्राप्त झाल्यानंतर गणेश गंगाधर मुजुमदार ह्यांनी पुरातत्त्वशास्त्र हे संशोधन कार्यक्षेत्र व पुण्यातील डेक्कन कॉलेज ही कर्मभूमी निवडली व ते शेवटपर्यंत त्यातच रमले. प्राचीन पर्यावरण आणि भाजलेल्या मातीच्या भांड्यांच्या विविध रंगांचा त्यांनी सखोल शास्त्रीय अभ्यास केला. या संशोधनातून प्राचीन हवामानातील बदलांवर आणि कुंभारांच्या भांडी भाजण्याच्या प्राचीन तंत्रकौशल्यावर नवीन प्रकाश टाकणे शक्य झाले. बाळासाहेब या नावाने निकटवर्तीयांना परिचित असलेले डॉ. गणेश गंगाधर मुजुमदार यांचा जन्म पुण्याच्या  ऐतिहासिक सुप्रसिद्ध सरदार मुजुमदार यांच्या घराण्यात झाला. त्यांचे वडील आबासाहेब मुजुमदार हे त्या काळातील अत्यंत लोकमान्य व्यक्तिमत्त्व होते. राजकारण, समाजकारण, संगीत आणि इतिहास ह्यांचा आबासाहेबांचा सखोल अभ्यास होता. त्यामुळे बालपणापासूनच बाळासाहेबांना शिक्षणातील विविध पैलूंचे दर्शन घडत गेले.

      स्वातंत्र्यपूर्वकाळात, १७७२ साली बांधलेल्या पुण्यातील प्रसिद्ध मुजुमदार वाड्यात त्यांचे वास्तव्य असल्यामुळेच इतिहासाचे आणि जुन्या वास्तूंबद्दल त्यांना आकर्षण होते. त्या काळात त्यांच्या वाड्यात ब्रिटिश गव्हर्नर येत असत, तसेच गणेशउत्सवात भारतातील प्रसिद्ध संगीतकार मैफल करीत असत.

      बाळासाहेबांचे शालेय शिक्षण नूतन मराठी प्रशाळा व महाविद्यालयातील शिक्षण फर्गसन महाविद्यालयात झाले. १९४९ मध्ये त्यांना बॉम्बे युनिव्हर्सिटीची ‘कायिक रसायनशास्त्रातील डॉक्टरेटची पदवी प्राप्त झाली. त्यांचे मार्गदर्शक डॉ. दिनकर धोंडो कर्वे, प्रसिद्ध धोंडो केशव कर्वे यांचे चिरंजीव, होते. त्यांचा संशोधनाचा विषय ‘हायड्रोलिसिस ऑफ नायट्राइल्स’ असा होता. ह्या संशोधनात त्यांनी ‘नायट्राइल’ आणि ‘सल्फ्युरिक आम्ल’ यांमध्ये होणार्‍या रासायनिक प्रक्रियांचा वेग याबाबत अभ्यास केला होता.

     बाळासाहेबांच्या या मूलभूत संशोधनाचा उपयोग भावी काळात काही सेंद्रिय पदार्थ (अ‍ॅमाइड्स) कमी वेळात करण्याकरिता होणार होता. परंतु, हे मूलभूत शास्त्रीय संशोधन त्या काळात महाराष्ट्रात औद्योगिकीकरण झालेले नसल्यामुळे मागे पडले. डॉ. मुजुमदारांनी त्यानंतर आयुर्वेदातील च्यवनप्राशामध्ये वापरण्यात येणारे वंशलोचन (बांबूत मिळणारे सिलिका जेल, अर्थात कठीण पांढरा गारेसारखा खडा) ह्यावर संशोधन केंद्रित केले होते. ह्या संशोधनासाठी त्यांनी सह्याद्री पर्वत, कोकण आणि कर्नाटकाच्या किनारपट्टीत बरीच भटकंती केली. त्या दरम्यान त्यांनी निरनिराळे बांबू गोळा करून त्यांतील वंशलोचनाचे रासायनिक पृथक्करण करून त्यांच्या रासायनिक गुणधर्मांची माहिती मिळविली. मात्र, त्यांचे हेही संशोधन प्रसिद्धीपासून दूर राहिले. आयुर्वेद महाविद्यालयात, तसेच फर्गसन महाविद्यालयात त्यांनी या काळात मानद व्याख्याता म्हणून काम केले.

     त्यांची १९५९ मध्ये डेक्कन महाविद्यालयात, पुणे येथे पुरातत्त्व विभागात रासायनिक पुरातत्त्व शिकविण्यासाठी, तसेच संशोधनासाठी व्याख्याता म्हणून नेमणूक झाली. १९५९ ते १९७८ ह्या काळात त्यांनी पुरातत्त्व विभागात पुरातत्त्व शास्त्राशी निगडित रासायनिक प्रयोगशाळा उभारली आणि त्या प्रयोगशाळेत प्राचीन नाणी, वस्तू, शिलालेख, पाषाणमूर्ती, खापरे, धातूंची हत्यारे, दागिने यांवर रासायनिक प्रक्रिया करून त्या वस्तूंची जडणघडण, वापरलेले तंत्रज्ञान आणि जतन करण्याच्या विविध पद्धतींबाबत विपुल संशोधन केले. त्यांच्या विविध क्षेत्रांतील संशोधनाचा मागोवा येथे घेणे शक्य नाही; मात्र राष्ट्रीय पातळीवर मान्यता पावलेल्या केवळ दोन संशोधनांबद्दल इथे माहिती दिली आहे.

     महाराष्ट्रात आणि मध्यप्रदेशात ‘काळी माती’ सर्वत्र मिळते. ह्या मातीबाबत शास्त्रीय संशोधन करून डॉ. मुजुमदार यांनी असे दाखवून दिले, की ही माती सहा ते चार हजार वर्षे पूर्वीच्या काळात, चांगल्या हवामानात तयार झाली. त्या काळी येथे आजच्यापेक्षा दहा ते पंधरा टक्के जास्त पाऊस पडत असावा, असे अनुमान केले. अशा या सुपीक काळ्या मातीवर पश्चिम महाराष्ट्राच्या आजच्या दुष्काळी प्रदेशात शेतकीप्रधान जोर्वे या नावाने ओळखली जाणारी ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीची सुरुवात सुमारे ३८०० ते ३५०० वर्षांपूर्वी झाली.

    डॉ. मुजुमदारांचे दुसरे महत्त्वाचे संशोधन प्राचीन काळातील तांबडी व काळी (इश्ररलज्ञ । ठशव थरीश), तसेच राखी चित्रित (झरळिींशव ॠीरू थरीश) या वैशिष्ट्यपूर्ण मृद्भांड्यांच्या तंत्रज्ञानाविषयी होते. याबाबत सखोल संशोधनातून त्यांनी असे दाखविले, की ही भांडी सुमारे ३००० ते ७००० सेल्सियस तापमान निर्माण केलेल्या भट्टीत भाजली गेली असावीत. शेण, गवत, राख यांचे भांड्यावर लेप देऊन, तसेच विशिष्ट तापमानावर नियंत्रण ठेवून ही मृद्भांडी तयार केली असावीत, असे अनुमान काढले. डॉ. मुजुमदार डेक्कन कॉलेजमधून १९७८ मध्ये रासायनिक पुरातत्त्वाचे प्रपाठक म्हणून निवृत झाले, तरी त्यांचे प्राचीन भांड्यांच्या तंत्रज्ञानाविषयीचे संशोधन पुढील पंधरा वर्षे अखंड चालू होते. त्यांना नवीन शिकण्याचा ध्यास होता. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यातही ते संगणक शिकत होते. ते उत्कृष्ट छायाचित्रकार होते. आवडीचे संशोधन, सतत नवीन करण्याचा ध्यास यांकरिता त्यांनी आपले जीवन समर्पित केले. त्याकरिता त्यांनी अविवाहित राहणे पसंत केले. डेक्कन महाविद्यालयामध्ये त्यांनी उभारलेली प्रयोगशाळा हे त्यांचे महत्त्वाचे योगदान मानले जाते. त्यांनी शून्यातून पुरातत्त्वशास्त्राशी निगडित रसायनशास्त्राची प्रयोगशाळा सुरू केली. आज डेक्कन कॉलेजमध्ये पुरारसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेव्यतिरिक्त पुराभूशास्त्र, पुराप्राणिशास्त्र, पुरावनस्पतिशास्त्र, पुरामानव्यशास्त्र, पुराजीवशास्त्र आणि संगणकशास्त्र अशा विविध अद्ययावत प्रयोगशाळा असण्याचे भाग्य डेक्कन महाविद्यालयाच्या पुरातत्त्वशास्त्र या विभागाला लाभले आहे. अशा तर्‍हेच्या शास्त्रीय संशोधनाची सोय असलेले भारतातील विद्यापीठ पातळीवरचे हे एकमेव ठिकाण आहे. याचे बरेचसे श्रेय डॉ. मुजुमदारांना जाते.

   डॉ. मुजुमदारांचे, संशोधनावर आधारित लिखाण मात्र खूपच कमी झाले आणि त्यामुळेच ते प्रसिद्धीच्या झोतात कधीच आले नाहीत. त्यांची काही महत्त्वाची प्रकाशने खालीलप्रमाणे आहेत :

    १. मुजुमदार, ग.गं. आणि राजगुरू, शरद न.; ‘कॉमेंट्स ऑन सॉइल्स अ‍ॅज एन्व्हायर्नमेन्टल अ‍ॅण्ड क्रॉनॉलॉजिकल टूल, इन इंडियन प्रिहिस्टरी’ (व्ही.एन. मिश्र आणि एम.एस. माटे : संपादक), डेक्कन महाविद्यालय, पुणे; १९६४.

२. मुजुमदार, ग.गं. आणि राजगुरू, शरद न.; ‘एस्कॅव्हेशन अ‍ॅट कुपगल’, डेक्कन महाविद्यालय, पुणे १९६६.

३. मुजुमदार, ग.ग.; ‘प्रॉब्लेम ऑफ ब्लॅक अ‍ॅण्ड रेड वेअर : अ टेक्नॉलॉजिकल अप्रोच’, इन सेमिनार पेपर्स ऑफ द मेगॅलिथिक प्रॉब्लेम ऑफ इंडिया (नारायण, ए.के. : संपादक), पृष्ठे ९०-९३; बनारस हिंदू विश्वविद्यालय, बनारस; १९६९

डॉ. श.न. राजगुरू

मुजुमदार, गणेश गंगाधर