Skip to main content
x

पाटील, गुलाबराव रघुनाथ

हकार क्षेत्राला अधिक व्यापक व लोकाभिमुख स्वरूप देण्यासाठी ज्यांनी अथक प्रयत्न केले त्यामध्ये गुलाबराव रघुनाथ पाटील यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. त्यांचा जन्म म्हैसूर राज्यातील बेनाडी या गावी सामान्य मराठा कुटुंबात झाला. त्यांचे शालेय शिक्षण कोल्हापूर येथे झाले. त्यांनी कोल्हापूर येथील कायदा महाविद्यालयातून एलएल.बी.चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी सातारा येथे वकिलीचा व्यवसाय सुरू केला. पुढे ते सांगली येथे आले आणि स्थानिक राकारणात सक्रिय होण्याच्या उद्देशाने त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तेव्हा त्यांचा यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, केशवराव जेधे यांसारख्या नेत्यांशी संपर्क आला व त्यांच्या विचारांनी ते प्रभावित झाले. त्यानंतर त्यांनी वकिलीचा व्यवसाय सोडला व ते सामाजिक कार्याकडे वळले.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पाटील यांनी सामाजिक समस्यांवर आपले लक्ष केंद्रित केले. त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या शेतीविषयक अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच तेथील शेतकर्‍यांचा आर्थिक दर्जा सुधारवण्यासाठी सहकारी संस्थांची स्थापना करण्याचे ठरवले. त्यांनी 1952 मध्ये सांगली जिल्हा सहकारी बोर्डाचे सदस्यत्व स्वीकारून सहकारी चळवळीत प्रवेश केला. तेव्हा त्यांचा डॉ. धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता यांच्याशी संबध आला. त्यांच्या विचाराने प्रभावित झालेल्या पाटील यांनी सहकारी संस्थांच्या स्वायत्ततेवर भर दिला. सहकारी संस्था संपूर्ण स्वायत्त असल्याशिवाय खर्‍या अर्थाने त्या समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना, मागासवर्गीयांना आणि सामान्य जनतेला लाभदायी सेवा देऊ शकणार नाहीत, अशी त्यांची भूमिका होती. सहकारी संस्थांच्या स्वायत्ततेसाठी संस्थेचे सभासद जागृत असणे आवश्यक असते, हे लक्षात घेऊनच पाटील यांनी सहकारी तत्त्वांच्या प्रबोधनाचे कार्य जाणीवपूर्वक केले. त्यामुळेच सहकारी चळवळीच्या गुणात्मक आणि निकोप वाढीच्या दृष्टिकोनातून राज्यातील सहकारी शिक्षण, प्रशिक्षण, प्रचार व प्रसिद्धीचे कार्य भारतात अनुकरणीय ठरले. ते 1954 ते 1955 या काळात सांगली नगरपालिकेच्या अध्यक्षस्थानी निवडून आले व त्यांनी जिल्हा विकास मंडळाच्या सचिवपदाची जबाबदारीही स्वीकारली. नगराध्यक्ष असताना त्यांनी सांगली शहराच्या नगर नियोजनाची योजना करून ती यशस्वीपणे राबवली. कृष्णा खोरे दूध सहकारी संघ, भूविकास बँंक, शेतकरी सहकारी साखर कारखाना, सहकारी बँंक, जिल्हा सहकारी मुद्रणालय या संस्था उभारणीत त्याचा सिंहाचा वाटा आहे. पाटील यांची 1957 मध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. तसेच या बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. ते 1969 पर्यंत या बँंकेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात बँकेच्या ठेवी 4 लाखांवरून 15 कोटींपर्यंत गेल्या होत्या. कर्जे व ठेवी यांचे आकडे हे फक्त कागदावरच मांडण्यासाठी नसून प्रत्येक कर्जातून एक नवा उद्योजक व ठेवीदार जोडला जात असतो, हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले. तसेच त्यांनी शेतकर्‍यांचा आर्थिक स्तर उंचवण्यासाठी त्यांना द्राक्षाचे पीक घेण्यास प्रवृत्त केले. त्यासाठी कर्ज मिळवून देण्यातही त्यांनी पुढाकार घेतला. म्हणूनच द्राक्ष पिकांच्या उत्पादनामध्ये सांगली जिल्हा अग्रेसर असलेला दिसतो. त्यांनी 1960 मध्ये सहकार क्षेत्राचे प्रशिक्षण देण्यासाठी गुलाबराव पाटील सहकार प्रशिक्षण केंद्र, यांसारख्या संस्था सांगली जिल्हयात सुरू केल्या व सहकारी चळवळींना पुढे नेण्याचे काम केले. तसेच त्यांनी सहकारच्या माध्यमातून शेतीसाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करण्याचा पायंडाही पाडला. त्यांनी 1959 ते 1966 या काळात पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक सहकारी मंडळाचे अध्यक्षस्थान भूषविले. ते 1963 ते 1969 महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष होते. त्यानंतर 1973 ते 1976 या काळात ते नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सहकारी संघ, या संस्थेचेही सहसचिव व नंतर सरचिटणीस म्हणून कार्यरत होते. ते महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही कार्यरत होते. तसेच सदर बँकेचे अध्यक्ष या नात्यानेही त्यांनी काम पाहिले. या काळात त्यांचा चुनीलाल मेहता, सर जनार्दन मदन, वैकुंठभाई मेहता, जी.एम.वर्दे, डॉ. धनंजयराव गाडगीळ, पद्मश्री विखे-पाटील, फिरोदिया यांसारख्या सहकारातील ज्येष्ठ नेत्यांशी संबंध आला.

पाटील यांची 1966 मध्ये राज्यसभेवर निवड झाली. ते 1978 पर्यंत राज्यसभेत होते. या काळात त्यांनी देशभर प्रवास केला व सहकारी  चळवळींचा अभ्यास केला. शेती व सहकार या विषयावर राज्यसभेत बोलणारे एक अभ्यासू खासदार म्हणून ते ओळखले जात. पाटील संसदीय कामकाजाच्या निमित्ताने रशिया, अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स या देशांच्या अभ्यास दौर्‍यांमध्ये सहभागी झाले होते.

पाटील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय)चे अध्यक्ष होते. या काळात त्यांनी पक्षसंघटना मजबूत व कार्यशील करून सहकार व पक्ष यात सुसंवाद निर्माण करण्यावर विशेष भर दिला. पाटील यांच्या स्मरणार्थ सांगली आणि मिरज या शहरांमध्ये सेवाभावी संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. सांगली येथे 1981 मध्ये गुलाबराव पाटील लोकसेवा विश्वस्त निधी स्थापन झाली. गुलाबराव पाटील मेमोरिअल ट्रस्टची स्थापना 1991 मध्ये केली गेली. या संस्थांमार्फत सहकार क्षेत्रांमध्ये काम करणार्‍या संस्थांना ‘गुलाबराव पाटील सहकार गौरव पुरस्कार’ देण्यात येतो.

- अर्चना कुडतरकर

पाटील, गुलाबराव रघुनाथ